भारत-न्यूझिलंड सामन्यापूर्वी काँग्रेसी झाले रामभक्त
07 Mar 2025 13:51:35
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rajiv Shukla Luv Samadhi Lahore) जो काँग्रेस पक्ष प्रभू श्रीरामांचे अस्तित्व मानत नाही, त्या काँग्रेसचे नेते आता रामभक्त बनून फिरु लागले आहेत. याची प्रचिती पाकिस्तानच्या लाहोर येथे आली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव शुक्ला पाकिस्तानात पोहोचले आहेत. दरम्यान त्यांनी लाहोरमध्ये श्रीरामांचे पुत्र लव यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळची छायाचित्रेही राजीव शुक्ला यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये शेअर केली आहेत.
पाकिस्तानात सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने सुरु होते. रविवार, दि. १० मार्च रोजी भारत आणि न्यूझिलंड यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. तत्पूर्वी राजीव शुक्ला लाहोर येथील लव यांच्या समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेल्याचे दिसले. राजीव शुक्ला यांनी याबाबत आपल्या पोस्टमध्ये लिहिले की लाहोरच्या म्युनिसिपल रेकॉर्डमध्ये नोंद आहे की शहराचे नाव भगवान रामचा मुलगा लव यांच्या नावावर आहे. तर कसूर हे नाव त्याच्या दुसऱ्या मुलाच्या कुशच्या नावावर ठेवण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारचाही यावर विश्वास आहे. सध्या पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्या नेतृत्वात समाधीस्थळाचा जीर्णोद्धार होत आहे.
अमृतसरपासून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर असलेले लाहोर भारत आणि पाकिस्तानच्या सामायिक इतिहासाचे साक्षीदार आहे. फाळणीपूर्वी हे शहर हिंदू आणि शीख लोकसंख्येने भरलेले होते आणि आजही काही खुणा शिल्लक आहेत.