‘कल्याण मेट्रो’ लालचौकी मार्गेच न्या : श्रेयस समेळ

07 Mar 2025 16:26:52

Kalyan Metro 
 
कल्याण: ( Kalyan Metro  via Lalchowki  ) कल्याणमधील प्रस्तावित ‘मेट्रो’च्या मार्गाबाबत वेगवेगळे मतप्रवाह असताना आताही ‘मेट्रो’ खडकपाडामार्गे नव्हे, तर पूर्वीच्याच लालचौकीमार्गे नेण्याची मागणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी केली आहे.
 
या संदर्भात समेळ यांनी कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत ही मागणी केली आहे. सहा वर्षांपूर्वी कल्याणमधील ‘मेट्रो’ प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. ठाणे-भिवंडी आणि मग भिवंडीतून कल्याणमध्ये येणारी ही मेट्रो दुर्गाडी-लालचौकी मार्गे पुढे कल्याण-तळोजा या ‘मेट्रो’ 12 प्रकल्पाला जोडण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, लालचौकीऐवजी ही ‘मेट्रो’ दुर्गाडी-आधारवाडी-खडकपाडा मार्गे नेण्याची आग्रही मागणी एमसीएचआय कल्याण-डोंबिवलीचे तत्कालीन अध्यक्ष आणि शिवसेना पदाधिकारी रवी पाटील यांनी लावून धरली.
 
त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत ही ‘कल्याण मेट्रो’ आधारवाडी-खडकपाडामार्गेच होईल, असे एमसीएचआय प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये जाहीर केले आणि त्यानुसार मग नव्या ‘मेट्रो’ मार्गाचा डीपीआर ही तयार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
  
मात्र, शिवसेनेचेच माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी या नव्या मार्गावर आक्षेप घेत यामुळे ‘मेट्रो’च्या खर्चात तब्बल एक हजार कोटींची वाढ तर होईलच तसेच कल्याण-तळोजा या ‘मेट्रो’ 12 प्रकल्पाला जोडण्याच्या कामातही अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
परिणामी, नागरिकांच्या कररूपी पैशांची बचत होण्यासह ‘मेट्रो’ प्रकल्पाची योग्य कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल तर जुन्या म्हणजेच लालचौकी मार्गेच ही ‘मेट्रो’ नेण्याची आग्रही मागणी श्रेयस समेळ यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यावर खा. डॉ. शिंदे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत अभ्यास करून यातून मार्ग काढू, असे आश्वासन दिल्याचे समेळ यांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0