मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणाला लागून असणाऱ्या शिरंगे खजिन उत्खननाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. हे उत्खनन बंद करण्यासाठी ग्रामसभेने ठराव केलेला असताना देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने गुरुवार दि. ६ मार्च पासून खानयाळे ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यासंपूर्ण परिसरात 'L4' असा सांकेतिक क्रमांक असणाऱ्या नर वाघाचा वावर असल्याचे 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने सावंतवाडी-दोडमार्ग संवेदनशील क्षेत्रासंबंधी तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. (shrirange villagers)
तिलारी धरणाच्या जलाशयाला लागून असलेल्या शिरंगे गावात काळ्या दगडाचे गौण खनिज उत्खनन सुरू आहे. या उत्खनन बंद करण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी ग्रामसभेने ठराव केला होता. मात्र, या ठरावाची कोणत्याही प्रकारे दखल न घेता प्रशासनाने हे उत्खनन सुरू ठेवले. यासंदर्भातील निवेदन खानयाळे ग्रामस्थांनी प्रशासनाला दिले होते. या निवेदनात म्हटले होते की, धरण बुडीत क्षेत्रालगत असलेल्या या दगड खाण उत्खनन क्षेत्राची अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी करुन परवाना दिलेले भूमापन क्रमांक आणि सध्या उत्खनन चालू असलेले भूमापन क्रमांक याची खातर जमा करावी. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने ग्रामस्थांनी गुरुवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
शिरंगे,खानयाळे या गावातील परिसरामध्ये 'L4' असा सांकेतिक क्रमांक असणाऱ्या नर वाघाचा अधिवास आहे. यासंदर्भातील माहिती 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने सावंतवाडी-दोडमार्ग संवेदनशील क्षेत्रासंबंधी तयार केलेल्या अहवालात दिली आहे. या वाघाचे छायाचित्र देखील संस्थानने आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. गावकऱ्यांनुसार उत्खननामुळे गावातील लोकांच्या घरांना हानी पोहोचत आहे. याशिवाय दगड वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे.