कास पठारावर दुर्मीळ 'लेपर्ड कॅट'चा वावर

06 Mar 2025 11:12:09

leopard cat
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - सातारा जिल्ह्यातील कास पठाराला लागून असलेल्या जंगलात दुर्मीळ 'लेपर्ड कॅट'चे दर्शन घडले आहे (leopard cat). साताऱ्यातील वन्यजीव निरीक्षक सागर कुलकर्णी यांनी या प्रजातीची नोंद केली आहे (leopard cat). यानिमित्ताने सह्याद्रीतील मार्जार कुळातील 'लेपर्ड कॅट'सारख्या दुर्मीळ आणि दुर्लक्षित असलेल्या छोट्या मांजरांच्या संवर्धनाची गरज अधोरेखित झाली आहे. (leopard cat)
 
 
 
मांर्जार कुळातील वाघ आणि बिबट सोडल्यास इतर प्रजाती या दुर्लक्षित आहेत. यामधील रानमांजर, 'रस्टी स्पॉटेड कॅट' आणि 'लेपर्ड कॅट' या तीन प्रजाती प्रामुख्याने सह्याद्रीत आढळतात. यापैकी 'रस्टी स्पॉटेड कॅट' आणि रानमांजर या जंगलसोबतच उसाच्या शेतात आढळतात आणि उसाच्या शेताच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना त्या सहजपणे दिसूनही येतात. मात्र, 'लेपर्ड कॅट' ही प्रजात फारच लाजाळू असून ती घनदाट जंगलात अधिवास करते. पश्चिम महाराष्ट्रात या प्रजातीला वाघाटी असे संबोधले जात असले तरी महाराष्ट्रातील इतर भागात 'रस्टी स्पॉटेड कॅट' या प्रजातीला वाघाटी म्हणून ओळखले जाते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, राधनगरी वन्यजीव अभयारण्यात 'लेपर्ड कॅट'चा अधिवास असला तरी, याठिकाणी देखील तिचे दुर्मीळ दर्शन घडते. अशा दुर्मीळ जंगली मांजरीच्या प्रजातीचा अधिवास कास पठार आणि त्याला लागून असलेल्या जंगलात आढळून आला आहे.
 
 
साताऱ्याचे वन्यजीव निरीक्षक सागर कुलकर्णी हे दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी वन्यजीवांच्या निरीक्षणासाठी कास पठार परिसरात गेले होते. त्यावेळी 'लेपर्ड कॅट' त्यांना कारवीच्या जंगलात बसलेली दिसली. त्यामुळे त्यांनी लागलीच या मांजरीची छायाचित्र टिपली. एकंदरीत सह्याद्रीत अधिवास करणाऱ्या मार्जार कुळातील छोट्या जंगली मांजरीच्या प्रजातींवर फार कमी अभ्यास झालेला आहे. यानिमित्ताने छोट्या जंगली मांजरीच्या प्रजातीवर संशोधनाच्या कामाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
 
 
कोट सातऱ्यातील जंगल जैवसंपन्न अत्यंत लाजाळू असल्याने माणसाची चाहूल लागताच पसार होते. मात्र, मी ज्यावेळी तिचे निरीक्षण केले तेव्हा तिने शिकार करुन खाल्ले असल्याने आरामाकरिता ती कारवीच्या जंगलात बसून होती. म्हणून मला तिचे छायाचित्र टिपता आले. साताऱ्यातील जंगल है जैवसंपन्न असून सस्तन प्राण्यांच्या अनुषंगाने याठिकाणी अभ्यास होणे गरजेचे आहे. - सागर कुलकर्णी, वन्यजीव निरीक्षक
 
 
 
 
'लेपर्ड कॅट'विषयी
 
- लेपर्ड कॅटच्या शरीरावर बिबट्याप्रमाणेच ठसे असल्याने तिला लेपर्ड कॅट, असे म्हटले जाते.

- छोटे पक्षी किंवा छोटे सस्तन प्राणी हे तिचे प्रमुख खाद्य आहे.
- या प्रजातीची लांबी ४६-६५ सेमी असून वजन पाच किलो भरते.
- जंगलात ही प्रजात साधारण १० ते १२ वर्षांपर्यंत जगते.
Powered By Sangraha 9.0