मानवी स्थलांतर ही खरं तर मानवी उत्क्रांतीपासूनचीच निरंतर सुरु असलेली प्रक्रिया. अशा स्थलांतरातून नवीन प्रदेशात प्रत्येक धार्मिक समुदायाची तेथील स्थानिक समाजांशी जुळवून घेण्याची प्रक्रियाही वेगवेगळी असते. काही गट नव्या देशांत गेल्यावरही आपली वेगळी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोकसंख्येच्या बळावर स्थानिक संस्कृतीत मोठे बदल घडवण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. मात्र, हिंदू समाजाचा दृष्टिकोन प्रारंभीपासूनच यापेक्षा पूर्णतः वेगळा राहिला आहे. हिंदू जिथे जातो, तेथील स्थानिक संस्कृतीशी तो समरस होतो, त्या समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीत लक्षणीय योगदान देतो. त्याच वेळेस शक्य तितक्या आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचे जतन करण्याचाही कसोशीने प्रयत्न करतो.
नुकत्याच ‘इन्स्टिट्यूट फॉर द इम्पॅक्ट ऑफ फेथ इन लाईफ’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या एका संशोधन अहवालानुसार, ब्रिटनमधील हिंदू समाज हा सर्वाधिक पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणार्या धार्मिक गटांपैकी एक आहे. शाकाहाराचे मोठे प्रमाण, वस्तूंच्या पुनर्वापरावर असलेला भर, तसेच धार्मिक परंपरांमध्ये निसर्गपूरक तत्त्वांचा अंतर्भाव ही हिंदू धर्मीयांच्या जीवन पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये. अहवालात नमूद ही निरीक्षणे दर्शवतात की, हिंदू हा केवळ भौगोलिक स्थलांतर करणारा समुदाय नाही, तर तो नव्या समाजाचा अविभाज्य भाग असून, त्या समाजाच्या विकासात सक्रिय योगदानही देतो.
इतर स्थलांतरित समुदायांच्या सामाजिक समायोजनाचा अभ्यास करताना असे आढळते की, काही समुदाय आपल्या धार्मिक वैशिष्ट्याला अधिक बळकट करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करतात. काहीवेळा हा प्रयत्न, लोकसंख्येच्या बळावर स्थानिक व्यवस्थेत मूलभूत बदल घडवण्याचाही असतो. त्यातूनच आज अनेक पाश्चात्य देशांमध्ये, धार्मिक कायद्यांमध्ये बदल करण्याचा दूराग्रह धरला जातो, स्थानिक सण किंवा परंपरांना बाजूला सारले जातात. तर काही वेळा स्थानिक कायद्यांच्या चौकटीत राहूनही, सांस्कृतिक व्यवस्थांवर अप्रत्यक्ष दबाव टाकला जातो. आज युरोप इस्लामी स्थलांतराचे परिणाम भोगतो आहे. आज बहुतांशी युरोपमध्ये ‘शरिया कायदा’ लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे, ती लोकसंख्येच्या बळावरच!
मात्र, हिंदू धर्माची मूलतत्त्वे सहिष्णुता, सर्वसमावेशकता यावर आधारित असल्यामुळे, हिंदू धर्मीय कोणत्याही नव्या सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थेशी संघर्ष न करता, सर्व नियमपालन करत त्या समाजाचा एक भाग होण्याचा प्रयत्न करतो. भारताबाहेर विशेषतः कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले आहेत. मात्र, या स्थलांतरित हिंदू समाजाचा इतिहास पाहता, त्यांनी कधीही त्या देशांमध्ये वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा अवाजवी प्रयत्न केलेला नाही. हिंदू समाज नेहमीच सौहार्दपूर्ण सहअस्तित्वाच्या तत्त्वावर विश्वास ठेवतो. परंतु, काही ठिकाणी याच सौहार्दशील वृत्तीचा गैरफायदा घेतला जातो. काही ठिकाणी मंदिर बांधण्यावर अनावश्यक निर्बंध लादले जातात. काही ठिकाणी त्यांच्या सण-परंपरांकडे दुर्लक्ष केले जाते. काही ठिकाणी हिंदू धर्माच्या वैचारिक संकल्पनांविषयी गैरसमज पसरवले जातात, तर काही ठिकाणी हिंदूंच्या श्रद्धांना उपहासाने पाहिले जाते.
युरोपीय देशांमध्ये हिंदूंवर अनेक वेळा हल्लेदेखील झाले आहेत. मात्र, हल्लेखोरांवर कारवाई करण्यात पाश्चात्य सरकारे दुर्लक्ष करताना दिसतात. स्थलांतरित हिंदू समाजाने केवळ आपली धार्मिक ओळख राखली नाही, तर त्याने संबंधित देशाच्या प्रगतीसाठीही सक्रिय योगदान दिले. अमेरिका आणि कॅनडामध्ये तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात हिंदूंचे योगदान मोठे आहे. ब्रिटनमध्ये वैद्यकीय आणि व्यवसाय क्षेत्रातही हिंदू समाज आघाडीवर आहे. अशाप्रकारे हिंदू समाजाने कायमच विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेनुसार, त्या त्या देशाच्या समाजात समरस होण्याचा प्रयत्न केला. सध्या स्थलांतरणामुळे वेगवेगळ्या धार्मिक आणि सांस्कृतिक गटांमध्ये संघर्षही वाढले आहेत. काही समूह नव्या समाजाच्या व्यवस्थेत मूलभूत बदल घडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात, तर काही पूर्णपणे त्यात विलीन होतात. मात्र, हिंदू समाज या सार्यापासून भिन्न असून, इतरांना आदर्श असल्याची पोचपावतीच या अहवालाने दिली आहे.
कौस्तुभ वीरकर