( mystery of death ) अपसव्य गतीचे विज्ञान सर्व दृश्यमान वस्तू ओतप्रोतांच्या सापेक्ष संघात गतीमुळे उत्पन्न होतात, हे आपण पाहिले आहे. सर्व वस्तूजाताचे मूळ, अवस्तू वा अजड असणार्या ओतात आहे. ओताच्या असल्या संघातामुळे वस्तूधारणा उत्पन्न होऊन पलीकडे अशीच धारणा जर सतत कायम राहिली, तर त्या वस्तूजातात चैतन्याची जाणीव उत्पन्न होऊन प्राणशक्ती उत्पन्न होते. प्राणशक्तीचा व्यापार सुरू झाला, की कर्मबंधनाने भारित जीव त्या प्राणशक्तीला त्या जडदेहाद्वारे राबवून घेतो. अशा तर्हेने जडात चैतन्य व चैतन्यात जीवभाव उत्पन्न होतो. जीवाची अशी उत्पत्ती, साम्यवादी रशियन लेखकांनीसुद्धा मानली आहे. भगवद्गीता या महान सिद्धांताचे वर्णन, एका श्लोकात करते,
‘इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः॥६.अ.१३।’
ओतांच्या सापेक्ष गतीमुळे असला संघात उत्पन्न होऊन, जडसृष्टी व जीवसृष्टीचा आभास उत्पन्न होतो. यालाच ‘माया’ असे म्हणतात. नाही (मा) ते आहे (या) असे वाटणे, याला ‘माया’ असे नामाभिधान आहे. सिनेमात चाकावरून रील फिरत असते. परंतु, चित्रांच्या संघातामुळे पडद्यावर प्रत्यक्ष जीवनचित्रे साकारतात. पडद्यावर काहीच नसते, पण रील चालू असेपर्यंत सर्व काही आहे, असे वाटते. आता हीच रील जर उलट गतीने फिरविली, तर विरुद्ध घटना दिसू लागतील. ओताच्या सापेक्ष सव्य गतीमुळे वस्तूजातांचा आभास होऊन, प्रत्यक्ष जग उत्पन्न झाल्याचा अनुभव येतो. त्या ओताची गती कुंठित म्हणजे बंद केल्यास, जगोत्पत्तीचा अनुभव येणार नाही. रीलच फिरली नाही, तर सिनेमा कसा दिसणार? पण ती रील जर उलट गतीने फिरविली, तर घटनांचा आभास न होता, विघटनांच्या आभासामुळे वस्तूजाताचे प्रत्यक्ष विघटन म्हणजे विद्ध्वंस होईल. जारणमारण विद्येत, वस्तूजाताला धारण करणारी ओतप्रोत गती वा शरीराभोवती प्रकाशमान असणार्या तेजोवलयाची गती उलट करतात, त्यातूनच विनाश उत्पन्न होतो. विश्वाच्या कोपर्यात कृष्णविवर (इश्ररलज्ञ केश्रशी) आहेत. प्रत्येक वस्तूजाताची, प्रकाशाचीसुद्धा गती उलट करून त्यांना ते स्वतःकडे आकर्षून घेतात, त्या भयानक कालउदरात सर्व वस्तूजात दरक्षणी गडप व नष्ट होत आहे. त्या कृष्णविवरात काय आहे? मृत्यू, काल, शून्य! ओतांच्या उलट गतीचा परिणाम म्हणजे विद्ध्वंस, शून्यावस्था होय.
चक्रव्यूह व अभिमन्यू
व्यासरचित महाभारतातील द्रोणपर्वात, चक्रव्यूह कथाभाग आला आहे. अधिकांश लोक केवळ कथा मानून, त्यातील गहन योगरहस्यांकडे पाठ फिरवतात. कोणत्या गोष्टीला काय मानावे, हा व्यक्तिगत धारणेचा व बुद्धिशक्तीचा प्रश्न आहे. परंतु, त्या कथेतील दिव्य योगानुभवाकडे जाणत्यांचे लक्ष गेल्यास, तदनुसार श्रेष्ठ साधकाने कशी साधना करावी? कसे वागावे असा बोध घेता आल्यास, अधिक योग्य होऊन अखिल मानव समाजास उपकारक होईल. त्यातील यौगिक रहस्य पाहू. प्रथम कथा जशी दिली आहे, तशीच पाहू. कथा मोठी रोचक व अवीट आहे.
कौरवांचे सेनापती द्रोणाचार्य होते. भीष्मांनंतर ते सेनापती झाले. पांडवांना कोंडीत आणून जेरीस आणण्याकरिता, द्रोणाचार्यांनी आपल्या सैन्याची रचना अद्भुत चक्रव्यूहात केली. त्या चक्रव्यूहाला एकाच बाजूने द्वार होते. बाहेर निघायलासुद्धा एकच द्वार असून, अशी चक्रव्यूहात एकामागे एक सात द्वारे होती. द्रोणाचार्यांनी संधी साधून, पांडवपक्षातील वीरांना ते चक्रव्यूहभेदन करून विजय मिळविण्यास सांगितले आणि ते जमत नसल्यास,सरळ सरळ पराजय कबूल करण्यास आव्हान केले. त्याचवेळी दुर्दैवाने चक्रव्यूहाचा भेद करण्याची किमया जाणणारा अर्जुन, श्रीकृष्णासह कौरवपक्षीय संसप्तकांशी युद्ध करण्यात गुंतला होता. युद्ध तीन अहोरात्र चालू होते. ते युद्ध सोडून, अर्जुनास चक्रव्यूहभेद करण्यास येणे शक्य नव्हते. अर्जुनाशिवाय चक्रव्यूहभेदन करणारा कोणीच वीर पांडवांमध्ये नव्हता. आता कठीण प्रसंग आला होता.
काय करावे ते धर्मराजाला सूचेना. धर्मराज चिंताग्रस्त होऊन बसले असल्याची वार्ता पांडवसैन्यात पसरली. अर्जुनाचा सुभद्रेपासून झालेला अभिमन्यू नामक पुत्र होता. तो त्यावेळेस अगदी किशोर वयाचा होता. त्याने आपल्या चुलत्याची चिंता जाणून, चक्रव्यूहभेद करण्याची तयारी दाखविली. परंतु, अभिमन्यू केवळ चक्रव्यूहात शिरणे जाणत होता, त्यातून बाहेर पडण्याचे ज्ञान त्याला नव्हते. चुलत्याजवळ जाऊन अभिमन्यूने चक्रव्यूहभेद करून, पांडवपक्षाची प्रतिष्ठा सांभाळण्याची तयारी दर्शविली. अभिमन्यू किशोर वयाचा आणि कौरवपक्षातील अतिरथी, महारथी त्या चक्रव्यूहाच्या रक्षणार्थ ठेवले होते. एक किशोर बालक द्रोण, कृप, जयद्रथ, कर्ण, दुर्योधनादि महान योद्ध्यांशी एकटा कसा लढेल? शिवाय, अभिमन्यू चक्रव्यूहात शिरणेच जाणत होता; तो त्यातून बाहेर पडणार कसा? परंतु, अभिमन्यूने काका धर्मराजाला परोपरीने समजावले व चक्रव्यूहभेदन करण्यास भीमासह निघाला.
चक्रव्यूहाच्या प्रथम द्वारावर जयद्रथ होता. त्याने चक्रव्यूहात अभिमन्यूला जाऊ दिले, पण पराक्रमी भीम मात्र चक्रव्यूहात जाऊ शकला नाही. एकटा अभिमन्यू चक्रव्यूहात शत्रूशी शर्थीने लढत होता.
पराक्रमी बापाचाच मुलगा तो! त्याने थोड्याच वेळात सहाही द्वारे भेदून त्या द्वाररक्षकांचा पराभव करून, सातव्या द्वारात प्रवेश केला. आता मात्र प्रसंग बिकट होता. सातव्या द्वाराचा रक्षक स्वतः दुर्योधन होता. आपण हरतो असा रंग पाहून, दुर्योधनाने उर्वरित सहा द्वाररक्षकांना आपल्या साहाय्यार्थ बोलावून, सात महान योद्ध्यांनी एकट्या किशोर वयीन निःशस्त्र अभिमन्यूवर एकदम हल्ला केला आणि त्याला भूमीवर लोळवले. पण तो वीर बालक शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूशी लढत राहिला.
धारातीर्थी पडलेल्या अभिमन्यूच्या मस्तकावर जयद्रथाने लाथ मारून, त्याचा अपमान केला. बाहेर उभा असलेला भीम, हे सर्व असाहाय्यपणे पाहात होता. वीर बालक अभिमन्यू सातजणांकडून मारला गेला, लत्ताप्रहाराचा अपमान सहन करून! पांडवसैन्यात शोककळा पसरली. धर्मराजाला तोंड दाखविणे कठीण झाले. अर्जुनाला आता काय सांगावे? असा प्रश्न धर्मराजासमोर पडला. तीन अहोरात्र संसप्तकाशी युद्ध करून त्यांना पराजित करून, अर्जुन मोठ्या उत्साहाने आपल्या छावणीत परत आला, तो त्याने अभिमन्यूवधाची दुःखद वार्ता ऐकली. अभिमन्यूच्या वधापेक्षा अभिमन्यूला मारताना जयद्रथाने लत्ताप्रहार करावा, ही गोष्ट अर्जुनासारख्या वीर क्षत्रियाला सहन करणे शक्य नव्हते. त्याने तत्काळ प्रतिज्ञा केली की, सूर्यास्तापूर्वी त्याने जर जयद्रथाचा वध न केला, तर तो आत्मदहन करेल. प्रतिज्ञा तर केली, पण ती पार कशी पाडायची? कारण अर्जुनाची घोर प्रतिज्ञा ऐकून द्रोणांनी जयद्रधाचे रक्षण करण्याकरिता, आणखी एका जटिल अशा सहस्त्रदलकमल व्यूहाची रचना करून, त्याच्या मध्यभागी जयद्रथाला सुरक्षित ठेवले.
शब्दांकन : राजेश कोल्हापुरे
9702937357