देव पंचायतन म्हणजे काय? (आध्यात्मिक विवेचन)

    06-Mar-2025
Total Views |

Devpanchayatan Puja method
 
( Devpanchayatan Puja method ) प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतेच. त्या देवघरातील देवाची नैमित्तिक पूजा सगळेच नित्यनेमाने करतात. मात्र, त्यामध्ये कोणते देव असावेत? त्यांचे स्थान कसे असावे? असे अनेक प्रश्न प्रत्येकालाच कधीतरी पडलेले असतातच! यासाठीच आदि शंकराचार्य यांनी देव पंचायतन पद्धतीचे महत्त्व सांगितले आहे. त्यामध्ये त्यांनी पंचमहाभूतांना केंद्रस्थानी ठेवलेले दिसून येते. या देवपंचायतन पूजा पद्धतीचे केलेले आध्यात्मिक विवेचन...
  
पूर्ण ब्रह्मांड हे भौतिकदृष्ट्या, पंचमहाभूतांच्या संमिलनातून निर्माण झालेले आहे. ही पंचमहाभूते म्हणजे आकाश, वायु, अग्नी, जल आणि पृथ्वी. मानवी शरीरसुद्धा भिन्न नाही, त्याची निर्मितीसुद्धा याच पंचतत्त्वांपासून झालेली आहे. यादृष्टीने मानवी देहाचे विश्वातील प्रत्येक जड आणि चैतन्याशी, पंचमहाभूतांच्या पातळीवर अद्वैत आहे. पंचमहाभूतांचे पूजन म्हणजे, ब्रह्मांडातील प्रकृती तत्त्वाची उपासना आहे. आपल्या संस्कृतीमध्ये, ईश्वरी शक्तीची पाच मुख्य कार्ये मानली जातात. उत्पत्ती, स्थिती, लय, तिरोधान आणि अनुग्रह अर्थात सृष्टी, स्थिती, संहार, अदृश्य रूपाने कार्य करणे आणि पुनर्निर्मितीसाठी आशीर्वचन प्रदान करणे. या पाचही रूपात, ईश्वरी तत्त्व उपास्य आहे. ईश्वराच्या या पाच स्वरूपांनासुद्धा आपल्या संस्कृतीने, तत्त्व म्हणून जाणून मूर्तत्व आणि उपास्यत्व प्रदान केलेले आहे.
 
 
प्रकृति आणि पुरुष तत्त्व यांच्या संमिलनातून ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली आहे, असे आपण मानतो. विश्वउत्पत्तीसाठी कारक असणार्‍या या तत्त्वांची उपासना करणे, हेच विश्वातील भौतिक आणि चेतना रूपाची उपासना करणे आहे. या पंचतत्त्वांच्या पुरुष, प्रकृति ऐक्य रूपाची उपासना म्हणजे, आपल्याच भौतिक शरीराने परिपूर्ण आणि निरोगी असावे, या कामनेने केलेली उपासना आहे. या पंचमहाभूतांना कार्यप्रवण करणार्‍या चेतनास्वरूपाची उपासना म्हणजेच, आपल्या प्राणशक्तीची उपासना आहे. ही पंचमहाभूते, पृथ्वी वगळता निराकार आहेत. म्हणून त्यांना मूर्त स्वरूप प्रदान करण्यासाठी, आपल्या संस्कृतीमध्ये प्रतीके विकसित झाली. त्या प्रतीकांच्या मूर्तींना आपण आपल्या देवघरात स्थान देऊन, त्यांची नित्य पूजा करू लागलो, तीच देवपंचायतन पूजा होय.
 
 
या पूजापद्धतीचे जनक आदि शंकराचार्य मानले जातात. ही पूजा कोणतीही हिंदू व्यक्ती करू शकते, जी स्मार्त आहे. स्मार्त म्हणजे स्मृतींचे पालन करणारा. मनुशिवाय अन्य स्मृतिग्रंथसुद्धा आहेत. जसे की नारायणस्मृति, स्मार्तस्मृति, शुक्रस्मृति, बृहस्पतिस्मृति, देवलस्मृति आणि पराशरस्मृति. कोणत्याही स्मृतीला प्रमाण मानून, जीवन जगणारी व्यक्ती देवपंचायतन पूजा करतेच.
 
 
देवपंचायतन पूजापद्धती :
 
 
देवपंचायतन पूजा आपण शास्त्रोक्त पद्धतीने करायची असेल, तर आपल्या देवघरात काय काय असायला पाहिजे?
सूर्य प्रतिमा, शिवलिंग किंवा दत्तात्रेय मूर्ती, विष्णू किंवा त्याचे प्रतीक म्हणून, दशावतारातील कोणताही एक, बहुतांशी बाळकृष्ण, शक्ती अर्थात महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती किंवा दुर्गेची मूर्ती आणि गणेशमूर्ती. याशिवाय, शंख आणि घंटा असणेही आवश्यक आहे. याखेरीज आपल्या देवघरात गंगेचे प्रतीक म्हणून, एक गंगाजल असलेला गडू असतो आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते. या पंचमहाभूतांना, आपण उपासनेच्या दृष्टीने मूर्त स्वरूपात कल्पिले आहे. मग त्याची मूर्त प्रतीके म्हणजे सूर्य, शिव, शक्ती, विष्णू आणि गणेश. या पाच देवतांची आपल्या देवघरात स्थापना करून नित्य उपासना करणे, म्हणजेच देवपंचायतनाचे पालन करणे आहे. या ठिकाणी आदर्श पंचायतन सांगितले आहे. परंतु, या पाच ईश्वरी शक्तींपैकीच एक शक्ती, आपल्या कुटुंबाची कुलस्वामिनी किंवा कुलदेव असते. त्यामुळे त्या कुलस्वामिनीची किंवा कुलदेवाची मूर्ती मध्यभागी, त्या ईश्वरी तत्त्वाचे प्रतीक म्हणून ठेवणे अभिप्रेत आहे आणि अन्य चार देवी-देवतांची छायाचित्रात दिलेल्या रचनेप्रमाणे मांडणी करणेही अपेक्षित आहे. या रचनेचे सामान्य रेखाटन दिलेले आहे.
 
 
उपासनेत हेच पाच देव का ठेवले जातात?
 
 
शिव :
 
शिव याला निर्गुण ब्रह्म समजले जाते. ज्ञानघन असा शिव, हा महादेव किंवा आदिदेव म्हणून ओळखला जातो. विश्वातील संहार तत्त्वाचे प्रतीक म्हणजे शिव आहे. शिवाच्या दक्षिणामूर्ती रुपाला ,आदिगुरू समजले जाते. त्यामुळे गुरूस्वरूप, ज्ञानघन, निर्गुण ब्रह्म शिव ही, पंचायतनातील उपास्य देवता आहे. शिव हा शक्ती अर्थात पार्वतीचा पती म्हणून ज्ञात आहे. पंचायतन पूजेत, शिव हे आकाशतत्त्व मानले जाते.
 
शिव गायत्री मंत्र
 
॥ॐ पञ्चवक्त्राय विद्महे, महादेवाय धीमहि। तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥
 
 
देवी/शक्ती :
 
शिवाची पत्नी, शुद्ध चेतना, सगुण ब्रह्म आणि विश्वाला व्यापून असणारी ऊर्जा, स्त्रीतत्त्व अर्थात प्रकृति म्हणजेच शक्ती आहे. सर्व चराचरांना व्यापून असलेल्या शक्ती तत्त्वाची उपासना, हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. सूर्याची उपासना करतानासुद्धा आपण जो गायत्री मंत्र म्हणतो, तो सवितृ गायत्री अर्थात, सूर्याच्या शक्ती तत्त्वाचे केलेले आवाहन आहे. भारतीय संस्कृतीला जगातील अन्य सर्व संस्कृती आणि धर्मविचारांपासून वेगळी करणारी गोष्ट म्हणजेच, आपल्या संस्कृतीमधील शक्ती तत्त्वाची उपासना आहे. शक्तीचे हे रूप मातृस्वरूप आहे. त्यामुळे ती कुलस्वामिनी या रूपात पुजली जाते. शक्तीची उपासना करणार्‍या संप्रदायाला, ‘शाक्त’ किंवा ‘श्रीविद्याउपासक’ असे संबोधले जाते. पंचमहाभूतात शक्ती ही वायु रूपाने, उपास्य मानली गेली आहे.
 
शक्ती गायत्री मंत्र
 
॥ॐ कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी धीमहि। तन्नो दुर्गे प्रचोदयात्॥
 
 
सूर्य :
 
सूर्य हे पंचमहाभूतातील दृश्य तत्त्व आहे. सूर्य हा आपल्या जीवनाचा कारक आहे. सूर्याशिवाय मानवाचे किंवा पृथ्वीवरील जीवसृष्टीचेच अस्तित्व अशक्य आहे. आपण प्रथमतः निसर्गउपासक होतो. वैदिक संस्कृती, ही निसर्ग उपासकांनी विकसित केलेली संस्कृती आहे. त्या संस्कृतीमधील मुख्य उपास्य देवता म्हणजे सूर्य होय. म्हणून सूर्य प्रतिमा, आपण आपल्या पंचायतनमध्ये उपास्य देवता म्हणून समाविष्ट केलेली आहे. ज्यांच्या उपासनेत, सूर्य किंवा त्याचे रूप ही मुख्य उपास्य देवता असेल किंवा सूर्य अथवा त्याचे रूप हे ज्यांच्या कुटुंबात कुलदेव किंवा कुलस्वामिनी म्हणून असेल, त्यांनी सूर्य प्रतिमा मधोमध ठेवून अन्य चार मूर्ती चार बाजूंना ठेवून पूजा करणे अभिप्रेत आहे. हे आदित्य पंचायतन झाले. पंचायतन पूजेत, सूर्य हे अग्नी तत्त्व मानले जाते.
सूर्य गायत्री मंत्र
 
सूर्य गायत्री मंत्र
 
॥ॐ भास्कराय विद्महे, दिवाकराय धीमहि। तन्नो सूर्यः प्रचोदयात्॥
 
 
विष्णू :
 
विष्णू हा पालनकर्ता देव म्हणून प्रिय आहे. समस्त विश्वातील सर्वांच्या पालनाचे कार्य विष्णू करतो, म्हणून तो उपास्य आहे. विश्वाचे पालन करणे, सत्प्रवृत्तीचे रक्षण करणे आणि दुष्प्रवृत्तीचा संहार करणे, धर्माला आलेली ग्लानी नष्ट करणे आणि सज्जनांना आश्वस्त करणे, हे विष्णूचे कार्य आहे. यासाठी तो वारंवार अवतार धारण करतो. विष्णू आणि त्याचे दशावतार हे सर्वच वंदनीय, उपास्य आणि पूज्य आहेत. विष्णूचे मूळ स्वरूप आणि त्याचे अवतार यांनुसार, भिन्न भिन्न संप्रदाय तयार झाले आहेत. विष्णू आणि त्याची रूपे, हे ईश्वराचे सर्वाधिक लोकप्रिय अवतरण आहे. पंचायतनमध्ये विष्णू हा जल तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. पूजेमध्ये विष्णू मूर्ती किंवा त्यांच्या अवतारांची मूर्ती, ही उपास्य असते.
 
विष्णू गायत्री मंत्र
 
॥ नारायणाय विद्महे, वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णुः प्रचोदयात्॥
 
 
गणेश :
 
ॐकार गणेश ही देवपंचायतनमधील पाचवी देवता आहे. गणेश हा ‘शब्दब्रह्म’ किंवा ‘अक्षरब्रह्म’ म्हणून ओळखला जातो. ‘ॐ’ हा विश्वातील प्रथम नाद किंवा अनाहत नाद म्हणून उपास्य आहे. गणेशाची उपासना, ही विघ्नहर्ता म्हणून केली जाते. ज्ञानाचे प्रतीक म्हणून, गणेश उपास्य आहे. पंचमहाभूतात गणेश हा पृथ्वी तत्त्वाचे प्रतीक किंवा स्वामी म्हणून उपास्य आहे. गणेशाची पूजा करणारा संप्रदाय, हा ‘गाणपत्य’ म्हणून ओळखला जातो.
 
 
गणेश गायत्री मंत्र
 
॥ॐ एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो बुद्धिः प्रचोदयात्॥
 
 
या पाच देवतांशिवाय, नित्य पूजेत अन्नपूर्णा देवी ठेवली जाते. घरातील गृहिणीचे ते ईश्वरी स्वरूप मानले गेले आहे. याशिवाय नित्य पूजनात, आपण शंख आणि घंटा ठेवतो. हे देवपंचायतन पूजनपद्धतीचे आध्यात्मिक विवेचन आहे. यानंतर आपण सामाजिक आणि धार्मिक विवेचनसुद्धा जाणून घेणार आहोत.
 
- सुजीत भोगले
9370043901