मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bhaiyyaji Joshi Ghatkopar News) राजयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग असे एकुण चार मार्ग आहेत. केवळ भारत मातेची साधना करायचा ज्यांचा संकल्प होता, ज्यांच्या भक्तीमध्ये संघ आणि भारतभूमी होती, ते जामसाहेब मुकादम संघसमर्पित योगीपुरुष होते", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोवंडी (जि. मुंबई उपनगर) चा नामांतर सोहळा बुधवार, दि. ५ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता संपन्न झाला. भैय्याजींच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे नामांतर 'जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोवंडी' असे करण्यात आले. त्यासोबतच कुर्ला आयटीआय येथील मोकळ्या मैदानाचेही 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रीडांगण' असे नामकरण करण्यात आले. त्याचाही भूमिपूजन सोहळा यावेळी संपन्न झाला.
उपस्थितांना संबोधत भैय्याजी जोशी पुढे म्हणाले, "हल्ली काही ठिकाणी दानदात्यांची नावे चिकित्सालय किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी लिहायची परंपरा आहे. म्हणजेच त्या संस्थेला किंवा प्रकल्पाला नाव दिल्याने त्या व्यक्तीचा परिचय होतो. इथे मात्र व्यक्तीच्या नावाने संस्थेचा परिचय होणार आहे. समाज परिवर्तनाचे कार्य पुस्तकातून किंवा ग्रंथामधून कळणार नाही, ते जामसाहेबांसारख्या व्यक्तीचे जीवन पाहिल्यास त्यातून निश्चितच कळेल."
पुढे ते म्हणाले, "जामसाहेबांसारख्या व्यक्तीचे जीवन अर्थपूर्ण आणि सफलतापूर्ण राहिले आहे. असं म्हणतात सफलतेच्या मापदंडावर व्यक्तीचे मूल्यांकन होते. मात्र जामसाहेबांच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांच्या विचारांनी एखादा संकल्प घेऊन चालणारी झाली आणि संघसमर्पित जीवन जगू लागली."
पन्नास वर्ष अधिवक्ता म्हणून जामसाहेब यांनी हिंदुत्व आणि भारतीय संस्कृतीची वकिली केली. त्यांच्या स्मरणार्थ या संस्थेचे नामांतर भैय्याजींच्या हस्ते होणे ही मोठी गोष्ट आहे. आज प्रत्येक क्षेत्रात निरनिराळ्या ठिकाणी संघाच्या मुशीत घडलेली व्यक्ती काम करताना दिसून येतेय. त्यामुळे एका अर्थी संपूर्ण भारत संघमय होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे, असे मत राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले
कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर मुंबई महानगर संघचालक सुरेश भगेरिया, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (महाराष्ट्र राज्य) संचालक माधवी सरदेशमुख (भा.प्र.से), जामसाहेब याचे सुपुत्र दीपकभाई मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान भैय्याजींच्या शुभहस्ते मुख्य प्रवेशद्वारावरील नामफलक, शासकीय इमारतीमधील जामसाहेबांचा जीवनपट तसेच त्यांच्या पुतळ्याचेही अनावरण करण्यात आले.
पारंपारिक भारतीय खेळांना प्राधान्य
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रीडांगणावर कबड्डी, खो-खो, लंगडी, मलखांब, कुस्ती, लगोरी, लेझीम, विटी-दांडू, पंजा लढवणे, दंड बैठक, दोरीच्या उड्या, पावनखिंड दौड, रस्सीखेच, फुगडी, सुरपाट्या, उंचउडी, पकडा-पकडी, सूरपारंब्या, भोवरा फिरवणे, आंधळी कोशिंबीर, लंपडाव यांसारख्या पारंपारिक भारतीय खेळांना प्राधान्य दिले जाणार आहे. स्थानिक खेळाडूंना तसेच युवा पिढीला या खेळांसाठी दर्जेदार सुविधा आणि नियमित सरावाची संधी मिळणार आहे. हा उपक्रम भारतीय पारंपारिक खेळांना चालना देण्यासाठी आणि नव्या पिढीला या खेळांचे महत्त्व पटवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जामसाहेब मुकादम यांच्या थोडक्यात परिचय :
* दि. २७ ऑगस्ट १९३१ रोजी जन्म
* घाटकोपर येथे वास्तव्य
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक
* घाटकोपर भाग संघचालक म्हणून दोन दशक जबाबदारी सांभाळली.
* निस्वार्थ समाजसेवी, प्रतिबद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळख,
* समाजसेवेसाठी जीवन समर्पित
* दि. १९ मार्च २०२१ रोजी निधन