_202503051652576431_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर समुद्री कासवाच्या मादीने मंगळवार दि. ४ मार्च रोजी अंडी घालण्याचा प्रयत्न केला (sea turtle juhu beach). मात्र, किनाऱ्यावरील माणसांचा वावर पाहून अंडी न घालताच ती समुद्रात निघून गेली (sea turtle juhu beach). मुंबईसारख्या किनाऱ्यावर समुद्री कासवाने अंडी घालण्याचा केलेला हा प्रयत्न अधोरेखित करण्यासारखा आहे. (sea turtle juhu beach)
राज्याच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमधील काही प्रमुख किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची घरटी आढळतात. रायगडमधील चार, रत्नागिरीतील २३ आणि सिंधुदुर्गमधील ३० किनाऱ्यांवर आॅलिव्ह रिडेल प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. मात्र, मुंबईत सागरी कासवाची घरटी आढळत नाहीत. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची घरटी १९८५ सालापर्यंत आढळत होती. तसेच २०१८ साली वर्सोवा किनाऱ्यावर समुद्री कासवाची पिल्लं आढळली होती. मात्र, मंगळवारी रात्री साधारण ९ च्या सुमारास जुहू किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवाची मादी अंडी घालण्यासाठी आली होती. मात्र, अंडी न घालताच ती समुद्रात निघून गेली.
याविषयी 'कोस्टल कॉन्झर्वेशन फाऊंडेशन'चे शौनक मोदी यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले की, "रात्री मादी किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आली असता, तिच्याभोवती माणसांचा गराडा पडला. त्यामुळे घाबरलेली मादीने अंडी न घालताच समुद्रात निघून गेली. त्यामुळे पुढील काही दिवस आम्ही किनाऱ्यावर गस्त घालून सागरी कासव अंडी घालण्यासाठी येत आहेत का याची पाहणी करणार आहोत." जुहू किनाऱ्यावरील प्रकाश दिवे आणि मानवी वावरामुळे घाबरेली मादी किनाऱ्यावर अंडी घालू शकली नाही. सागरी कासवांच्या माद्या या प्रामुख्याने रात्री आणि लोकांचा वावर नसताना किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. अशा प्रकारे जर मुंबईच्या कुठल्याही किनाऱ्यावर सागरी कासवांची मादी अंडी घालण्यासाठी आलेली दिसल्यास वन विभागाला १९२५ या क्रमांकावर किंवा आम्हाला ७७१०००००३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मोदी यांनी केले आहे.
मुंबईतील पूर्वीच्या नोंदी
'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'च्या (सीएमएफआरआय) १९८३ सालच्या प्रसिद्ध झालेल्या संशोधन पत्रिकेनुसार 'माॅसन' नामक संशोधकाने, १९२१ साली प्रकाशित केलेल्या संशोधन पत्रिकेनुसार साष्टी (साॅलसेट) बेटावर (आताच्या मुंबई शहराच्या उत्तरेस असलेला व्रांदे ते मीरा-भाईंदरचा भाग) सागरी कासवाची विण होत होती. त्यानंतर १९७६ सालच्या नोंंदीनुसार मुंबईतील बॅकबे आणि फोर्ट किनाऱ्यावर कासवाची घरटी आढळून आल्याची नोंद आहे. ठाण्याच्या उपवनसंरक्षकांनी मार्च, १९८३ साली केलेल्या सर्वेक्षणानुसार गिरगाव चौपाटी, राजभवन किनारा, शिवाजी पार्क, जूह, वर्सोवा, मढ, गोराई, मार्वे, डहाणू, पालघर, आगर, सातपाटी या किनाऱ्यांवरुन कासवांच्या घरट्यांची नोंद करण्यात आली होती.