साक्षीस चंद्र आणि...

    05-Mar-2025   
Total Views |

firefly aerospace
 
 
चंद्रावर पोहोचणे एकेकाळी केवळ अमेरिका आणि सोव्हिएत रशियासारख्या बलाढ्य देशांनाच शक्य होते. हळूहळू इतर देशांनीही चंद्रस्वारीचे स्वप्न पाहिले. यात भारत, चीन आणि जपानलाही यशही आले. २०१९ साली ‘इस्रो’ची ‘चांद्रयान-२’ ही मोहीम काही तांत्रिक कारणास्तव अपयशी ठरली होती. मात्र, भारताने कधी हार मानली नाही. तो ‘चांद्रयान-३’ मोहिमेसाठी सज्ज झाला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ तिरंगा फडकवण्यात एकाअर्थी भारताला यश आले. हे होत नाही तोच भारताने ‘आदित्य एल १’ लॉन्च केले, जे सूर्याचा अभ्यास करणारे पहिले अंतराळ आधारित भारतीय मिशन होते. या अंतर्गत ते सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळे आणि पृथ्वीभोवतीच्या पर्यावरणावर त्यांचा प्रभाव यांचा अभ्यास करण्यात यशस्वी झाले. सार्‍या जगाने त्याचे कौतुकही केले. आता जगाचे लक्ष लागले आहे, ते ‘नासा’च्या ‘मिशन ब्लू घोस्ट’कडे.
 
‘ब्लू घोस्ट’ हे टेक्सासच्या ‘फायरफ्लाय एरोस्पेस’ने विकसित केलेले अंतराळ यान. चंद्रावर वैज्ञानिक पेलोड वितरीत करण्यासाठी हे यान तयार करण्यात आले आहे. दि. ३ मार्च रोजी लॅन्डरने चंद्राच्या ईशान्य भागात असलेल्या मैरे क्राईसिअमवर यशस्वी लॅन्डिंग केले. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आणि पुढील वैज्ञानिक शोधासाठी विविध उपकरणे तैनात करण्यासाठी ‘ब्लू घोस्ट लॅन्डर’ विशिष्टरित्या डिझाईन केलेले आहे. हे लॅन्डर ‘नासा’च्या ‘लुनर सरफेस ऑपरेशन्स प्रोग्राम’ आणि ‘आर्टेमिस मिशन’चा भाग आहे. साधारण ३ लाख, ६० हजार किमी अंतरावरून ‘फायरफ्लाय एरोस्पेस’ या संपूर्ण प्रवासावर नजर ठेऊन होते.
 
‘ब्लू घोस्ट’च्या थेट आणि स्थिर लॅन्डिंगमुळे ‘फायरफ्लाय एरोस्पेस’ ही पहिली खासगी कंपनी ठरली, जिचे अंतराळयान चंद्रावर उतरताना आदळले नाही किंवा उलटले नाही. लॅन्डिंगनंतर अवघ्या ३० मिनिटांत, ‘ब्लू घोस्ट’ने चंद्राच्या पृष्ठभागावरून छायाचित्रे पाठवण्यास सुरुवात केली. पहिला फोटो सेल्फीचा होता, जो सूर्याच्या प्रखरतेमुळे काहीसा अस्पष्ट दिसत होता, तर दुसर्‍या चित्रात पृथ्वी अंतराळाच्या काळेपणात दूरवरच्या निळ्या बिंदूच्या रूपात दिसत होती. ‘ब्लू घोस्ट’ हा ‘नासा’च्या ‘कमर्शियल लूनर पेलोड सर्व्हिस’चा (सीएलपीएस) भाग आहे. ज्याचा उद्देश खासगी क्षेत्रातील स्पर्धेद्वारे ‘लूनर कॉमर्स’ला प्रोत्साहन देणे असा आहे. ‘नासा’ने लॅन्डरवरील दहा वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगांसाठी तब्बल १०१ दशलक्ष डॉलर्स दिल्याची माहिती आहे. उपकरणांसाठी अतिरिक्त ४४ दशलक्ष डॉलर्सदेखील दिले गेले आहेत. ‘ब्लू घोस्ट मिशन’ किमान दोन आठवडे चालेल, अशी अपेक्षा ‘फायरफ्लाय एरोस्पेस’कडून व्यक्त करण्यात आली आहे.
 
‘ब्लू घोस्ट मिशन’च्या लॅन्डरचे वैशिष्ट्य काय तर, लॅन्डरमध्ये चंद्राच्या मातीचे नमुने गोळा करण्यासाठी एक ‘व्हॅक्यूम’ आहे आणि पृष्ठभागाच्या खाली दहा फूट (तीन मीटर)पर्यंत तापमान मोजण्यास सक्षम ड्रिल आहे. त्यामुळे या लॅन्डरच्या साहाय्याने चंद्राविषयी मानवी समज वाढण्यास आणखी मदत होईल, यात शंकाच नाही. ‘मिशन ब्लू घोस्ट’ अवकाश संशोधनात, विशेषत: चंद्र मोहिमांमध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. त्याच्या यशस्वी ऑपरेशनमुळे भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी, वैज्ञानिक आणि व्यावसायिक दोन्ही, विशेषत: स्थायी चंद्र अन्वेषण पायाभूत सुविधांच्या विकासासह पाया घालता येईल.
 
तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर ‘ब्लू घोस्ट’मध्ये एकूण दहा यंत्रे आहेत, जी चंद्रावर वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जातील. यामध्ये चंद्रावरील मृदा विश्लेषक, रेडिएशन टॉलरन्स कॉम्प्युटर आणि चंद्रावर नेव्हिगेशनसाठी विद्यमान जागतिक उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली वापरण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी एक प्रयोग समाविष्ट आहे. वास्तविक ‘फायरफ्लाय एरोस्पेस’ने जून २०१९ साली इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजसोबत करार करून ‘जेनेसिस’ नावाचे लूनर लॅन्डर विकसित केले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर पेलोड वितरीत करण्यासाठी ‘नासा’च्या ‘कमर्शियल लूनर पेलोड सर्व्हिसेस’ (सीएलपीएस)साठी ‘जेनेसिस’चा प्रस्ताव होता. मात्र, बदलत्या ‘सीएलपीएस’ वैशिष्ट्यांमुळे ‘फायरफ्लाय’ने निर्धारित केले की, ‘जेनेसिस’ यापुढे ‘नासा’च्या आवश्यकतांमध्ये बसत नाही आणि २०२१ साली ‘ब्लू घोस्ट’वर काम करण्यास सुरुवात केली आणि ‘फायरफ्लाय’ने मिशन यशस्वी करून दाखवले आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक