हिंदू हिंदूशी जोडण्यासाठी ‘विश्व हिंदू परिषदे’च्या ‘मातृशक्ती आयामा’तर्फे मुंबईतील पवई, विक्रोळी येथे सेवा वस्तीतील महिलांसाठी शिलाई केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले. स्वयंरोजगारातून आता महिलाशक्ती एकवटली आहे. या हिंदूहितैषी उपक्रमाचा आढावा घेणारा हा लेख...
उपेक्षित वर्गातील महिलांना आर्थिक दृष्टीने सबळ करावे, या हेतूने पवई येथील चैतन्य नगर कार्यालयात अलीकडेच दहा महिलांचे शिलाई प्रशिक्षण पूर्ण होऊन त्यांना घरच्या घरी करता येईल, असे काम मिळवून देण्यात ‘विश्व हिंदू परिषदे’चा ‘मातृशक्ती आयाम’ यशस्वी झाला आहे. सध्या या महिला दररोज प्रत्येकी ५०० कमावत आहेत. आगामी काळात कोकण प्रांतातील ३५ जिल्ह्यांमध्ये शिलाई प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे.
महिलांचे सबलीकरण झाले, तर संपूर्ण कुटुंबाची आणि देशाची प्रगती होईल. आर्थिक दृष्टीने मातृशक्ती सक्षम झाली, तर त्या आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण, चांगली आरोग्य सेवा आणि संस्कार देऊ शकतात. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील, तर त्या अनेक सामाजिक संकटांना बळी पडताते. बर्याचदा प्रलोभनांद्वारे होणारे धर्मांतरण आणि ‘लव्ह जिहाद’च्या सापळ्यात त्या अडकतात. मात्र त्या सर्वार्थाने सक्षम असतील तर अन्यायाचा प्रतिकार त्या समर्थपणे करू शकतात.
आज शहरी भागांतील सेवावस्त्या धर्मांतरणाचे आणि ‘लव्ह जिहाद’चे अड्डे बनत चालले आहेत. यातून कोणत्याही जाती-पंथातील मुली-महिला सुटलेल्या नाहीत. अशा स्थितीत चिन्हीत वस्त्यांमध्ये शिलाई केंद्रांच्या साखळीतून महिलांचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीने ‘विश्व हिंदू परिषदे’ने एक पाऊल टाकले आहे.
अलीकडेच विक्रोळीच्या ‘महिला कौशल विकास केंद्रा’त प्रशिक्षित झालेल्या पहिल्या तुकडीला प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने सुप्रसिद्ध उद्योगपती गोविंद पटेल उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “येत्या एका वर्षात पाच हजार महिलांना आर्थिक दृष्टीने आम्ही स्वावलंबी करणार आहोत. प्रत्येक महिला आपले घर-दार सांभाळून दिवसाला केवळ तीन ते चार तास काम करून आपल्या कुटुंबासाठी महिन्याला १२ ते १५ हजार रुपये कमावू शकेल. गोविंद पटेल यांचे सहा राज्यांमध्ये तयार कपड्यांचे कारखाने आहेत आणि अनेक देशांमध्ये ते तयार कपड्यांची निर्यात करतात.
आज अनेक व्यवसायांत हिंदू कारागीर अत्यल्प होत आहेत. त्यामुळे हिंदू उद्योजकांना नाईलाजाने अल्पसंख्य समाजातील कारागिरांना काम द्यावे लागते. ‘विश्व हिंदू परिषदे’च्या पुढाकारामुळे जिहाद्यांच्या मुजोरीला आळा बसेल. ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरणाच्या संख्येत घट होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हिंदू हिंदूशी जोडला जाईल, असे स्पष्ट मत या उपक्रमाचे मार्गदर्शक आणि परिषदेचे प्रांतमंत्री मोहन सालेकर यांनी व्यक्त केले आहे. रोजगार प्रशिक्षणाच्या माध्यमातून संघटन आणि त्याद्वारे समाजशक्ती संवर्धित करण्याचा हा ‘विश्व हिंदू परिषदे’चा उपक्रम समाजाने स्वतःचा उपक्रम म्हणून स्वीकारला आहे.