‘मूठभर खाऊ’ तसा म्हणायला गेले, तर साधाच पण तितकाच पौष्टिक आणि कॅल्शिअम, लोहाची कमतरता पूर्ण करून उत्साह आणणारा विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम. आमच्या या ‘मूठभर खाऊ’ने बराच सकारात्मक बदल घडवून आणला. अशा या पौष्टिक उपक्रमाचा आढावा घेणारा हा लेख...
“ताई, ‘मूठभर खाऊ’ हा उपक्रम खरेच खूप छान आहे. यामध्ये चिक्की, शेंगदाणे, चणे, खजूर अशा प्रकारचा खाऊ मुलांना मिळाला. मुलांना सगळाच खाऊ खूप आवडला. त्यामध्ये चणे, शेंगदाणे हा खाऊ घेताना मुले बरोबर ते ‘मूठभर’ घेऊनच वाटत होती.. मुलांनाच विचारले होते की, “तुम्हाला काय घ्यायचे? चणे की शेंगदाणे?” मुलांनी पहिल्या दिवशी शेंगदाणे सांगितले.” शाळेतील शिक्षिका सुनीताताईंनी हा निरोप पाठवला. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही हा ‘मूठभर खाऊ’ उपक्रम वाद आणि विक्रमगडमधील जि. प. शाळेतील मुलांना द्यायला सुरू केला. खरे तर याची सुरुवात झाली, ती वाड्यातील वरई बुद्रुक शाळेतील मुलांपासून. गेल्या वर्षी या शाळेतील जवळपास १२ मुलांचा आम्ही सहा महिन्यांचा जेवणाचा खर्च केला. का, तर ती मुले आपल्या आईबाबांबरोबर कामानिमित्त स्थलांतरित होऊ नयेत आणि त्यांची शाळा सुटू नये. याबरोबर हेही लक्षात आले की, या मुलांना सोबत पोषक आहारही हवा आहे. जो पौष्टिक असेल आणि लवकर खराब होणारा नसेल. मग वरई बुद्रुकच्या गुरुंजींसोबत चर्चा करून एकमताने ठरले आणि त्यांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास पौष्टिक अशी राजगिरा चिक्की, दाणे चिक्की, चणे, शेंगदाणे आणि खजूर असा ’मूठभर खाऊ’ द्यायला सुरुवात केली.
याचा परिणाम असा झाला की, मुले पूर्ण वेळ शाळेत बसू लागली. दुपारी ४ वाजता मिळणार्या ‘मूठभर खाऊ’मुळे शाळा सुटेपर्यंत आनंदी आणि उत्साही राहू लागली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वैद्यकीय तपासणीत वरई बुद्रुकची सर्व मुले कुपोषित रेषेच्या वर होती. याचे सर्व श्रेय शाळेतील गुरुजी, जे वेळेवर रोज मुलांना खाऊ देतात आणि आमचे देणगीदार यांना जाते. यानंतर मोज, कशिवाली, रडे पाडा, तुसे, वडवली या जि. प. शाळांनापण ‘मूठभर खाऊ’ द्यायला सुरुवात केली. तुसेच्या शिक्षिका शर्मिलाताईंनी सांगितले की, “तुम्ही दिलेला ‘मूठभर खाऊ’ हा नुसता खाऊ नाही, तर पौष्टिक आहार आहे. त्याचा विद्यार्थी उपस्थितीवर सकारात्मक फरक पडला.”
सुनीताताईंनी एक प्रसंग सांगितला की, “आमच्याकडे एक प्रसंग असा घडला की, आमच्याकडे जे चणे आणि शेंगदाणे थोडे शिल्लक राहिले होते, ते एका बरणीत भरून ठेवले होते. त्यादिवशी मीटिंगसाठी बाहेर गेले होते. माझ्या वर्गात चौथी आणि पाचवीची मुले आहेत आणि त्यांना समजते की, हा आपलाच खाऊ आहे. तो जेव्हा वाटला जातो, तेव्हाच घ्यायचा असतो. त्या दिवशी पहिलीचा एक विद्यार्थी आमच्या वर्गात आला आणि त्याला चणे शेंगदाणे एवढे आवडले होते की, त्याने एकट्यानेच चणे-शेंगदाणे भरपूर खाल्ले. नंतर त्याच्या ड्रेसच्या खिशामध्येही भरून त्याने घरी नेले. त्याला नंतर समजावून सांगितले की, अरे तो आपलाच खाऊ आहे. आपण सगळ्यांनी मिळून खायचा खाऊ आहे तो.” ‘मूठभर खाऊ’सोबत आम्ही आतापर्यंत जवळपास आठ शाळांना गोष्टींची पुस्तके म्हणजेच ग्रंथालय भेट म्हणून दिले आहे. यावेळी तर भूषण आणि गौरीने त्यांच्या बाबांच्या म्हणजेच एकनाथ मोहिते यांच्या स्मरणार्थ चार शाळांना ग्रंथालय भेट दिले. खाऊ खाता खाता गोष्टीचे पुस्तकही वाचले जाते. वाचनाची आवड लागते. एवढेच नाही, तर शाळेतील मुले लिहिती झाली. मोजमध्ये तर कवी संमेलनाचा कार्यक्रमही झाला. मुलांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.
विक्रमगडमधील दुर्गम भागात असलेल्या रडे पाडा जि. प. शाळेच्या ठाकरे गुरुजींचा अनुभव तर खूपच वेगळा आणि कार्याला अधिक प्रोत्साहन देणारा आहे. गुरुजींनी सांगितले. ‘लेट्स इमॅजिन’च्या ‘मूठभर खाऊ’ आणि ‘ग्रंथालय भेट’ या उपक्रमांनी आमच्या शाळेत खूप चांगला आशावादी बदल घडून आणला आहे. पालक रोजंदारीसाठी दूरवर कामाला जातात. त्यामुळे शाळेत मुले लवकर येतात. शाळेत मिळणारे जेवण हे दुपारी सुमारे १.३० वाजेच्या सुमारास मिळते. तोपर्यंत मुले पार भुकेली असतात. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. पण या ‘मूठभर खाऊ’ने मात्र कमाल केली. आम्ही मुलांना हा खाऊ शाळा भरल्यावर ११ वाजता द्यायला सुरुवात केली. त्यामुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागू लागले. शाळेची उपस्थिती वाढली. वाचायला हातात विविध विषयांवरील रंगीबेरंगी चित्राची पुस्तकही मिळाली. भुकेल्या पोटासाठी पौष्टिक आहार आणि बुद्धीसाठी पुस्तकांचा खुराक मिळाला. आता मुलांनी गोष्टी वाचून त्या चित्रावरून स्वतःला सूचलेली गोष्ट लिहून काढली आहे.आमच्या ‘लेट्स इमॅजिन’ संस्थेचा हाच हेतू. मुलांचे आरोग्य जपायचे आणि सोबत शाळेची गोडीही लावायची. तुम्हीही आमच्या या उपक्रमात सहभागी होऊ शकता. मुलांना ‘मूठभर खाऊ’सोबत वाचनीय अशी पुस्तके भेट म्हणून देऊ शकता.
पूर्णिमा नार्वेकर
९८२०००३८३४