आजही बहुसंख्य प्रवासवर्णने लिहिली जातात. अशी प्रवासवर्णने माहिती देणार्या वृत्तपत्रीय लेखनाच्या पातळीवरच राहतात. पण याला छेद देऊन प्रवासवर्णनपर ग्रंथांचे लेखन करून वाचकांना जगप्रवास घडवणार्या डॉ. मीना प्रभु यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. नुकतेच डॉ. मीना प्रभु यांचे निधन झाले. मात्र, त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने आणि साहित्य अजरामर आहे. त्यांच्या साहित्यकृतींचा, सर्जनशीलतेचा घेतलेला मागोवा...
'प्रवासवर्णनकार’ म्हणून ज्यांचे नाव वाचकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे, त्या म्हणजे मीना प्रभु यांचे पहिले ’माझे लंडन’ हे पुस्तक वाचकांमध्ये अफाट लोकप्रियता मिळवून देणारे ठरले. डॉ. मीना प्रभु या मूळच्या पुण्याच्या, विवाहानंतर लंडनमध्ये स्थायिक झाल्या. पेशाने भूलतज्ञ असलेल्या मीना यांनी आपल्या लेखनाने प्रवासवर्णनाला एक वेगळाच आयाम प्राप्त करून दिला. गोव्यातील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले, तर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. दि. बा. मोकाशी पारितोषिक, गो. नी. दांडेकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कार, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
जगाच्या पाठीवर कोणताही देश पाहात असताना तेथील संस्कृतीबरोबर भारताच्या आठवणी त्या जागवतात व त्याचा अभिमानाने उल्लेखही करतात. ‘माझं लंडन’ या पुस्तकात लंडन येथील प्रसिद्ध ठिकाणांचे प्रत्ययकारी चित्रण, त्यांचा इतिहास, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, सामाजिक, राजकीय या दृष्टिकोनातून त्या वर्णन करतात. कारण मीना अनेक वर्षे लंडन येथे राहात असल्याने तेथील रस्ता आणि रस्ता, अगदी लहान-लहान गल्लीही त्यांनी जवळून पाहिलेली असल्याने त्यांनी त्या महानगराचे केलेले सूक्ष्म निरीक्षण हे त्या लेखनातून आलेले आहे. प्रवासाच्या अनिवार ओढीतून डॉ. मीना यांनी अनेक देशांत भ्रमंती केली. तेथील संस्कृतीविषयी असणार्या कुतुहलातून प्रवास केला. इंचाइंचाला सौंदर्य, नावीन्य ज्या देशात, संस्कृतीत त्यांनी पाहिले, तो देश म्हणजे रोम. ’रोमराज्य’ भाग-१ आणि भाग-२ यांमध्ये त्यांनी वर्णन केला आहे. रोम राज्यावर दोन खंडात्मक लेखन करण्याइतका विस्तृत आवाका त्यातून त्यांनी मांडला आहे.
‘दक्षिणरंग’ या पुस्तकात दक्षिण अमेरिका हा एक संपूर्ण खंड त्यांनी जिवंत केला आहे. विशेष म्हणजे हा प्रवास त्यांनी आपल्या दोन मुलांसह केला. हा खंड पूर्णपणे वेगळा, वेगळी संस्कृती त्याचा इतिहास-भूगोलासकट शब्दांत मांडण्याचे अवघड शिवधनुष्य त्यांनी पेलले आहे. ’दक्षिणरंग’ या प्रवासवर्णनाचा उत्तरार्ध म्हणजे त्यांनी लिहिलेले ’मेक्सिको पर्व’ हे पुस्तक आहे. उत्तर अमेरिकेत वसलेला मेक्सिको उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेश. तिथे नांदणार्या नाना संस्कृती, त्यांची जीवनशैली वर्णन करणारे पुस्तक म्हणजे ’मेक्सिको पर्व’ असे म्हणता येईल.इराणमधील अनुभवावर लिहिलेले ’गाथा इराणी’ हे पुस्तक. यातील काही प्रसंग वाचताना लेखिकेने घेतलेली जीवाची जोखीम सुरुवातीपासूनच जाणवते.
विमानप्रवासापासूनच त्यांना हिजाब वापरण्याची सक्ती होती. त्या देशात वावरताना त्यांना त्या देशानुसार वेश, भाषा, देहबोली या सर्वांमध्ये बदल करावा लागत होता, तर ’तुर्कनामा’ या पुस्तकाचे वेगळेपण त्यांच्या मुखपृष्ठावरील शीर्षकाच्या लेखनशैलीतूनच उठून दिसते. ’गाथा इराणी’ यामध्ये इराणी संस्कृती आहे, तर ’तुर्कनामा’ या पुस्तकामध्ये तुर्की संस्कृतीचा आलेख त्या प्रदेशानुसार त्यांनी मांडला आहे. इस्रायल, जॉर्डन, इजिप्त या तीन देशांच्या भ्रमंतीवरील ’इजिप्तायन’ या पुस्तकात तेथील भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टीने एकमेकांत गुंतलेल्या विषयांची उकल करीत त्या देशांचा प्रवास त्यांनी घडवला आहे. प्राचीन अशा ग्रीक संस्कृतीच्या कुतुहलातून ग्रीक देशाचा प्रवास ’ग्रीकांजली’ या प्रवासवर्णनातून उलगडत नेला आहे. प्रवासाची आवड प्रचंड असल्यानेच पायावर शस्त्रक्रिया झाली असताना त्या दुखण्यावर मात करून लेकीबरोबर केलेला प्रवास म्हणजे ’चिनीमाती’ हे पुस्तक. यात चीनमधील प्राचीन संस्कृती, शांघाय, बिजींग, चीनगंगा यांगत्से यांच्या तपशीलाच्या केलेल्या वर्णनाने तो प्रदेश वाचकांना गुंतवून ठेवतो आणि थक्क करतो.
भारताचा शेजारी असणारा देश तिबेट. ’वाट तिबेटची’ यातून वाचकाला भेटतो. श्रीलंका भारताच्या अगदी जवळचा देश. या देशाची भेट ’अपूर्व रंग’ यातून होते. श्रीलंकेनंतर अंदमान, म्यानमार, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, फिलीपिन्स, दक्षिण कोरिया आणि जपान या लहान मोठ्या देशांनासुद्धा त्यांनी भेटी दिल्या. न्यूयॉर्कचे एक वेगळे अत्याधुनिक जग ’न्यूयॉर्क न्यूयॉर्क’ यातून समोर येते.
जलप्रवास करण्याच्या हेतूने नॉर्वेचा पश्चिम किनारा, उन्हाळ्यात दिसणारा मध्यरात्रीचा सूर्य आणि हिवाळ्यात दिसणारे नॉर्दन लाईट्स, साऊथॅम्टन, ओस्लो करत दि नॉर्दन केपर्यंतचा केलेला प्रवास ’उत्तरोत्तर’ या पुस्तकात आहे. उन्हाळा आणि हिवाळा अशा दोनही ऋतूंतील निसर्ग पाहण्यासाठी त्यांनी दोनवेळा प्रवास केला. या सगळ्याच प्रवासवर्णनाचा मोठा ठळक विशेष, वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये असलेले अतिशय उत्तम फोटो, नकाशे, तक्ते, मुखपृष्ठ, मलपृष्ठ, काही पुस्तकांत आडव्या आकाराच्या मुखपृष्ठाची मांडणी, सर्वच अतिशय उत्तम, आकर्षक त्या त्या देशाच्या संस्कृतीला नेमकेपणाने मांडणारे आहेत. त्या त्या देशाच्या प्रवासापूर्वी आणि नंतर केलेला अभ्यास, संदर्भ सापेक्ष वाचन त्यातून त्या प्रवासवर्णनांना संदर्भ संपृक्तता आली आहे. त्यातून लेखिकेचा असणारा अफाट व्यासंग, प्रवासात नियमितपणे लिहिलेल्या नोंदी, माणसे जोडण्याचा स्वभाव, हरहुन्नरी वृत्ती यातून लेखिकेच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची ओळख होते.प्रवासात भेटलेल्या काही व्यक्तिरेखा वाचणार्याच्या मनाचा ठाव घेण्याइतक्या प्रत्ययकारी ठरतात. त्या त्या देशातील भाषा, स्थापत्य, लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती, त्यातील वैविध्यपूर्ण अनुभव प्रवासवर्णनातून त्या देताना दिसतात. डॉ. मीना प्रभु यांनी ’केल्याने देशाटन’ या उक्तीचा सार्थ प्रत्यय त्यांच्या लेखनातून दिला आहे, असे जाणवते. अशी ही प्रवासिनी अंतराळाच्या प्रवासासाठी निघून गेली आणि वाचकांसाठी उघडलेली जगप्रवासाची खिडकी कायमची मिटून गेली.