हिंदुत्व केवळ उपासना नसून विचारांचा प्रवाह : इंद्रेश कुमार
05 Mar 2025 16:27:30
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Indresh Kumar on Hindutva) प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभात स्नान करून आलेल्या भाविकांचे एकत्रिकरण नुकतेच जोधपूरच्या प्रताप नगर आदर्श विद्या मंदिर शाळेत संपन्न झाले. राष्ट्रीय जनचेतना ट्रस्ट, जोधपूर आयोजित 'महाकुंभ : हिंदुत्वाचे विराट दर्शन' या कार्यक्रमात मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी उपस्थितांना संबोधित केले. हिंदुत्व केवळ उपासना नसून विचारांचा प्रवाह असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान व्यासपिठावर सैनाचार्य अचलानंद गिरीजी महाराज देखील उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत इंद्रेश कुमार म्हणाले, मकरसंक्रांती ते महाशिवरात्री पर्यंतचा काळ कुम्भचा असतो. मकर संक्रांतीच्या माध्यमातून धर्म आणि समाजाशी मैत्रीपूर्ण राहण्याचे प्रशिक्षण मिळते. हा उत्सव एकत्र राहण्याचा संदेश देतो. महाशिवरात्री हा शिवाच्या उपासनेचा दिवस आहे.
महाकुंभाविषयी बोलताना ते म्हणाले, "कुंभ हे मानसिक विकार दूर करण्याचेही माध्यम आहे. कुंभाचे आयोजन केवळ मानवाने मानव रहावे आणि राक्षस बनू नये यासाठी केले जाते. राम आणि रावण अनेक प्रकारे सारखेच होते, जसे दोघेही राजे होते, दोघेही शिवभक्त होते, दोघेही चारही वेदांचे जाणकार होते. पण फरक आचार आणि चारित्र्याचा होता, आचार आणि चारित्र्य यांच्या श्रेष्ठतेमुळे रामाची पूजा केली जात असे. रामाने शबरीची बेरी खाऊन समरसतेचा संदेश दिला होता.