मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (BAPS Hindu Mandir South Africa) बॅप्स स्वामीनारायण संस्थेने अबू धाबीनंतर दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे भव्य हिंदू मंदिर बांधण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. हे मंदिर दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आणि सांस्कृतिक केंद्र असल्याचे सांगितले जात आहे. हे मंदिर जोहान्सबर्गच्या सर्वात व्यस्त आणि सुंदर लॅन्सेरिया कॉरिडॉरमध्ये ५.९ हेक्टर क्षेत्रफळात पसरले असून त्याचे बांधलेले क्षेत्र ३७ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आहे. आफ्रिकेत हिंदूंची लोकसंख्या २% आहे, पण तिथल्या लोकसंख्येचा प्रभाव खूप जास्त असल्यानेच एवढ्या मोठ्या मंदिराचे बांधकाम शक्य झाले.
हे वाचलंत का? : बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण; बलिदान मास पाळल्याने सरपंचाला पोटशूळ
महंत स्वामीमहाराज यांच्या नेतृत्वाखाली मंदिरात नुकत्याच झालेल्या पवित्र अभिषेक सोहळ्यास दक्षिण आफ्रिकेचे उपाध्यक्ष पॉल माशाटाइल यांनीही या समारंभाला हजेरी लावली आणि सांस्कृतिक विविधतेत मंदिराच्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी मंदिराच्या बहुसांस्कृतिक आणि आंतरधर्मीय सौहार्दाच्या योगदानाची प्रशंसा केली आणि दक्षिण आफ्रिकेच्या सांस्कृतिक विविधतेला सामर्थ्य देणारे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून वर्णन केले. त्यांनी मंदिराची स्थापना समाजातील विविध समुदायांमध्ये परस्पर समंजसपणा आणि सहकार्य वाढवणारी म्हणून पाहिली.
मंदिराचे उद्घाटन आणि अभिषेक समारंभ हा केवळ हिंदू समुदायासाठीच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या बहुसांस्कृतिक वारशासाठीही महत्त्वाचा क्षण होता. बॅप्स आयोजित होप अँड युनिटी फेस्टिव्हल अंतर्गत १२ दिवस याठिकाणी उत्सव साजरा केला जाणार आहे. कला, संस्कृती आणि वारसा यांचा समावेश असलेल्या भारतीय आणि आफ्रिकन परंपरांमधील खोल संबंध प्रदर्शित करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
मंदिर आणि सांस्कृतिक संकुलाच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पुढील तीन वर्षांत म्हणजेच २०२७ पर्यंत ते पूर्णतः तयार झालेले असेल. अबुधाबीतील हिंदू मंदिराच्या लोकार्पणानंतर दक्षिण आफ्रिकेतील या मंदिराचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. गेल्या महिन्यात, मंदिराच्या ३३ हजार चौरस मीटरच्या सांस्कृतिक संकुलाचे विद्यमान गुरु महंत स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आणि आता २,५०० चौरस मीटरच्या पारंपरिक मंदिर संकुलाचे काम दुसऱ्या टप्प्यात सुरू होणार आहे. सुंदर लॅन्सेरिया कॉरिडॉरमध्ये बांधण्यात आलेले हे मंदिर बहुसांस्कृतिक देवाणघेवाण, विविध धर्मांमधील संवाद आणि दक्षिण आफ्रिकेतील बॅप्सच्या मानवतावादी कार्याचे केंद्र बनेल.
मंदिराची वैशिष्टे
या मंदिरात एक मोठा असेंब्ली हॉल, बँक्वेट हॉल, सात्विक भोजनासाठी शायोना रेस्टॉरंट, मंदिर हॉल आणि विविध उपक्रमांसाठी २० खोल्या असतील. भारतात जयपूर, तिरुपतीसह विविध शहरांतून देवतांच्या मूर्ती आणूनही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मंदिर परिसर हिंदू धर्म, कला, संस्कृती आणि अध्यात्माचे केंद्र आहे, जे केवळ हिंदू परंपरांचा वारसाच दाखवत नाही तर अनेक धर्मांमधील संवाद आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन देते. त्याच्या उभारणीत शेकडो स्वयंसेवकांनी आपली निस्वार्थ सेवा आणि समर्पण दाखवले. बॅप्सने मंदिर परिसराला पर्यावरणाच्या दृष्टीने देखील जबाबदार बनवण्यासाठी १०० हून अधिक झाडे लावली आहेत.