मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Waqf Board Claims on Shivlinga) एकीकडे भारतात वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत कायदेशीर लढाई सुरु असताना दुसरीकडे वक्फ बोर्डाची मनमानी अद्याप सुरूच असल्याचे दिसतंय. मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील एका हिंदू बहुसंख्य गावावर वक्फ बोर्डाने दावा ठोकल्याचे निदर्शनास आलंय. इतकेच नव्हे तर, गावात स्थापन केलेल्या शिवलिंगावरही दावा ठोकला आहे.
हे वाचलंत का : औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आजमीविरोधात सत्ताधारी आक्रमक
मिळालेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्डाकडून रायसेनच्या माखनी गावातील लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये बोर्डाने म्हटले आहे की, ते ज्या जमिनीवर राहत आहेत ती प्रत्यक्षात वक्फ बोर्डाची आहे. त्यामुळे त्यांना गाव रिकामे करावे लागेल. हिंदूंचे वास्तव्य असलेली जमीन प्रत्यक्षात दफनभूमी असल्याचेही नोटीसमध्ये म्हटले आहे. वक्फ बोर्डाने ज्या मालमत्तेवर दावा केला आहे त्यात घरे, जमीन, शेती आणि हिंदूंचे आस्थेचे प्रतीक असलेले शिवलिंग यांचा समावेश आहे. ही जागा मोकळी न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा बोर्डाने दिला आहे. विशेष बाब म्हणजे वक्फकडे असा कोणताही पुरावा नाही की ज्याच्या आधारे ही जमीन आपलीच असल्याचे सिद्ध होऊ शकेल.
वक्फने तीन एकर जमीन स्वतःची म्हणून घोषित केली
वक्फ बोर्डानेही गावाची तीन एकर जमीन स्वतःची म्हणून घोषित केली आहे. या जमिनीची महसूल विभागाच्या अभिलेखात सरकारी मालमत्ता म्हणून नोंद आहे. कादर खान नावाच्या व्यक्तीचे हे गाव असून त्यांनी ही जमीन वक्फला दान केल्याचा वक्फ बोर्डाचा दावा आहे. वक्फ बोर्डाच्या या मनमानी कारभाराला गावातील हिंदूंनी कडाडून विरोध केला आहे. अनेक पिढ्यांपासून ते या गावात राहत असल्याचे लोक सांगतात. वास्तविक गावात कादर खान नावाची व्यक्ती राहातच नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.