मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vidya Bharati Karyakarta Abhyas Varga) आपल्या समाजात अनेक विचारधारा आहेत. जे लोक आपल्या विचारांशी सहमत नाहीत त्यांनाही बरोबर घेऊन जावे लागेल. कोणाचेही मत वेगळे असू शकते, पण कामाची दिशा एक आणि योग्य असली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. विद्या भारती आयोजित पाच दिवसीय अखिल भारतीय पूर्णकालिक कार्यकर्ता अभ्यास वर्ग (०३ ते ०८ मार्च) मध्यप्रदेशच्या सरस्वती विद्यामंदिर, भोपाळ येथे होत आहे. त्याच्या उद्घाटन सत्रात सरसंघचालकांनी उपस्थितांना संबोधित केले.
हे वाचलंत का? : अबू आझमींच्या फळीतले आणखी औरंगप्रेमी...
सरसंघचालक पुढे म्हणाले, आपले प्रयत्न केवळ एका वर्गाच्या किंवा समूहाच्या कल्याणापुरते मर्यादित नसावेत, तर संपूर्ण समाजाचे कल्याण व्हावे, हे आपले ध्येय आहे. आपली ऊर्जा आणि संसाधने केवळ आपल्यासाठीच नसून संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित असली पाहिजेत. विद्या भारती केवळ शिक्षणच देत नाही तर समाजाला योग्य दिशा देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या शिक्षणाचे कार्य व्यापक आहे, जे केवळ ज्ञान देण्यापुरते मर्यादित असू शकत नाही, तर समाजाला नैतिकदृष्ट्या समृद्ध बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
भारताच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यावर भर देताना ते म्हणाले की, आपल्याला विविधतेत एकता जपायची आहे. भारतीय संस्कृतीने नेहमीच सर्वांना जोडण्याचे काम केले. ती टिकवणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीने समजून घेतले पाहिजे की तो समाजाचा अविभाज्य घटक आहे आणि समाज देखील त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. या दृष्टिकोनातून आपण आपली कृती केली पाहिजे.
विद्या भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डी. रामकृष्ण राव यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, विद्या भारतीच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे, जेणेकरून ते शिक्षणाद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या सर्व मुद्यांचा समावेश करून, संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये काही नवीन गोष्टी जोडण्याची तरतूदही करण्यात आली आहे. सदर अभ्यासवर्गाला देशभरातून आलेले ७०० हून अधिक कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित आहेत.
काळानुरूप बदल आवश्यक
काळानुरूप बदल आवश्यक आहे, पण यात निष्क्रिय होऊन बसणे योग्य होणार नाही. माणूस आपल्या विचारांच्या जोरावर समाजात बदल घडवून आणतो आणि हा बदल सकारात्मक आहे, याची खात्री त्याने घेतली पाहिजे. आजच्या काळात तंत्रज्ञान समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला प्रभाव पाडत आहे. तंत्रज्ञानासाठी मानवीय धोरण बनवावे लागेल. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जे काही चुकीचे आहे ते सोडून द्यावे लागेल आणि जे चांगले आहे ते स्वीकारून पुढे जावे लागेल, असे सरसंघचालक म्हणाले.