ईदच्या मुहूर्तावर सलमान नाराज; सिकंदर बॉक्स ऑफिसवर प्रभाव पाडण्यात अपयशी!

31 Mar 2025 11:34:57

sikandar fails to impress at the box office
 
 
मुंबई : सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सिकंदर चित्रपटाने ३० मार्चपासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सुरुवात केली. ए. आर. मुरुगादॉस दिग्दर्शित या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी चित्रपटाचे कौतुक केले असले तरी काहींनी त्यावर टीका केली आहे. सलमान आणि रश्मिकाच्या अभिनयासह चित्रपटाच्या कथानकावरही काही प्रेक्षक नाराज असल्याचे दिसते. मात्र, तरीही पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे? जाणून घेऊया.
 
 
सलमान खानच्या चाहत्यांसाठी सिकंदर हा चित्रपट मोठी पर्वणी ठरली आहे. चित्रपटाचे टीझर, ट्रेलर आणि गाण्यांमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती, विशेषतः कारण गेल्या वर्षी सलमानचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. सिंघम अगेन आणि बेबी जॉन या चित्रपटांमध्ये त्याने केवळ कॅमिओ भूमिका साकारली होती. त्यामुळे सिकंदर चे प्रदर्शन चाहत्यांसाठी मोठा उत्सव ठरणार होते. मात्र, पहिल्या दिवशी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसादाचा परिणाम झाला आहे.
 
 
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, सिकंदर ने पहिल्याच दिवशी २६ कोटी रुपयांची कमाई केली. सकाळच्या शोमध्ये चित्रपटाची सुरुवात संथ होती, जिथे केवळ १३.७६% ऑक्युपन्सी होती. संध्याकाळच्या शोमध्ये काही प्रमाणात वाढ झाली, मात्र रात्रीच्या शोसाठी पुन्हा प्रतिसाद कमी दिसला.
 
 
ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमानच्या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत सिकंदर चा पहिला दिवस काहीसा फिका ठरला. २०१९ मध्ये आलेल्या भारत ने पहिल्याच दिवशी ४२.३० कोटी, २०१६ च्या सुलतान ने ३६.५४ कोटी तर एक था टायगर ने ३२.९३ कोटींची कमाई केली होती.
 
 
यापूर्वी सलमानच्या काही फ्लॉप चित्रपटांनी देखील पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. २०१८ मध्ये रेस ३ ने २९.१७ कोटी, बजरंगी भाईजान ने २७.२५ कोटी, किक ने २६.४० कोटी तर बॉडीगार्ड ने २१.६० कोटींची कमाई केली होती. त्याचप्रमाणे ट्यूबलाइट (२१.१५ कोटी) आणि किसी का भाई किसी की जान (१५.८१ कोटी) या चित्रपटांचीही पहिल्या दिवसाची कामगिरी समाधानकारक होती.
 
 
सिकंदर पुढील दिवसांत किती कमाई करतो आणि प्रेक्षकांकडून कोणता प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




Powered By Sangraha 9.0