मुंबई : विवादित स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आज मुंबई पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्याला दुसऱ्यांदा समन्स पाठवले असून, यापूर्वीही त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्याने सात दिवसांचा वेळ मागितला होता. हे प्रकरण खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लब मध्ये झालेल्या त्याच्या स्टँड-अप शोशी संबंधित आहे. या शोमध्ये कामराने एक पॅरोडी गाणं सादर केलं होतं, ज्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
कामराला तात्पुरती अटकपूर्व जामिनाची मंजुरी:
मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला ७ एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. हा जामिन त्याच्या ‘नया भारत’ या यूट्यूबवरील स्टँड-अप कॉमेडी व्हिडिओशी संबंधित वादग्रस्त विनोद प्रकरणात देण्यात आला आहे. कामराने शुक्रवारी न्यायालयात सांगितले की, तो २०२१ मध्ये मुंबईहून तामिळनाडूला स्थलांतरित झाला आणि तेव्हापासून तो तिथेच वास्तव्यास आहे. तसेच, मुंबई पोलिसांकडून अटकेची भीती असल्याचं त्याने नमूद केलं. यापूर्वी, महाराष्ट्र विधान परिषदेत कामराविरोधात विशेषाधिकारभंग प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. सध्या तो पाँडीचेरी मध्ये असल्याची माहिती त्याच्या इन्स्टाग्राम बायोवर नमुद केलेली आहे.
कुणाल कामरा प्रकरणावरून भाजपवर विरोधकांचा हल्लाबोल:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “कुणाल कामराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली, तेव्हा भाजप गप्प राहिला. मात्र, एकनाथ शिंदे यांचं नावही नसलेल्या एका पॅरोडी गाण्यावर मात्र त्यांनी संताप व्यक्त केला. असं वाटतं की, भाजप कामराला लक्ष्य करण्यासाठी शिंदे यांना पुढे करत आहे.”