नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह

    31-Mar-2025
Total Views |
 
gudipadwa celebration in maharashtra
 
 
मुंबई: ( gudipadwa celebration in maharashtra ) हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. राज्यात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि गुढी उभारण्याची परंपरा आहे. तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरावर प्रथम गुढी उभारण्यात येते. तर, मुंबई- पुण्यासह शहरांमध्ये संस्कृती- परंपरांचे प्रतिक असलेल्या शोभायात्रा काढल्या जातात.
 
राज्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात रविवार दि. 30 मार्च रोजी गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुंबईतील गिरगाव, ठाणे, डोंबिवली, पुणे, यांसह विविध शहरांत शोभायात्रा काढण्यात आल्या. तसेच, यानिमित्ताने महाराष्ट्रात सर्वत्र गुढी उभारुन, गोडाधोडाचे पदार्थ करुन नवीन वर्षाचा आनंद साजरा केला जात आहे. सध्या सर्वत्र चैतन्यमय वातावरण असते.
 
नववर्षाची महाराष्ट्रातील पहिली गुढी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या कळसावर उभारण्यात आली आहे. विधिवत पूजा करत देवीच्या महंत, पुजार्‍यांनी ही गुढी उभारली. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक शुभ मुहूर्त असल्याने आणि मराठी नवीन वर्षाची आज सुरुवात होत असल्याने देवीची शिवकालीन दागिने घालून अलंकार पूजा करण्यात आली.
  
गुढीपाडव्यानिमित्त ठाणे-डोंबिवलीत उत्साह
 
गुढीपाडव्यानिमित्त ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत उत्साह पाहायला मिळला. कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी कौपिनेश्वर मंदिरातून स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शोभायात्रेत सहभागी झाले. या स्वागतयात्रेला जोड म्हणून शहरात 12 उपयात्रा सहभागी झाल्या. केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते गणेश पूजन झाले.
 
गिरणगावात ’अभिजात मराठी’चा जागर
 
गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठाणच्यावतीने आयोजित गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये अभिजात मराठीचा जागर अनुभवायाला मिळाला. या शोभायात्रेचे वैशिष्ठ्य म्हणजे वेगवेगळ्या चित्ररथांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र घडवणार्‍या साहित्यिक, विचारवंत, महापुरूष, यांच्या तसबीरी दर्शनी भागात ठेवण्यात आल्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखाव्याने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले.
 
नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती
 
नागपुरात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम आणि श्रीशिवाची प्रतिकृती असलेल्या रथासह पारंपरिक आदिवासी नृत्य आणि ढोल-ताशा पथकांनी वातावरण भारावून टाकले. या यात्रेचे आयोजन भाजप आमदार संदीप जोशी यांनी केले होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
 
पुण्यात भव्य शोभायात्रा
 
पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तांची मोठी गर्दी उसळली. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचे औचित्य साधत सकाळपासूनच नागरिक बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. मंदिराला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.
 
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात वाहनांच्या नोंदणीत वाढ
 
राज्यामध्ये दुचाकी-चार चाकीसह अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सात दिवसांत मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. नवीन वाहनखरेदीची नोंदणी 2024च्या तुलनेत यावर्षी तब्बल 30 टक्के जास्त वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेकजण नवीन वाहनांची खरेदी करीत असतात. या वाहनांची नोंदणी संबंधित प्रादेशिक परिवहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत करण्यात येते. नागरिकांमध्ये वाहनखरेदीचा उत्साह दिसून येत असल्यामुळे यावर्षी वाहन नोंदणीमध्ये 30 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तब्बल 20 हजार, 57 वाहने मागील वर्षाच्या तुलनेत अधिक खरेदी करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
 
चारचाकी कार प्रकारात 2025 मध्ये 22 हजार, 81 वाहनांची नोंदणी करण्यात आली असून ही मागील वर्षीच्या तुलनेत 4 हजार, 942ने जास्त आहे. याची टक्केवारी 28.84 टक्के आहे. तसेच मोटरसायकल, स्कूटर या दुचाकी वाहनप्रकारात 2025 मध्ये 51 हजार, 756 नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षी हीच खरेदी 40 हजार, 675 एवढी होती. यामध्येही 11 हजार, 81ने वाढ नोंदविण्यात आली असून 27.14 टक्के अधिकची नोंदणी झाल्याचे निदर्शनास येत आहे.
  
पुण्यात सर्वाधिक नोंदणी
 
राज्यात सर्वांत जास्त पहिल्या पाच परिवहन कार्यालयअंतर्गत वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.
त्यामध्ये पुणे परिवहन कार्यालयअंतर्गत 11 हजार, 56, पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालयअंतर्गत 6 हजार, 648, नाशिकअंतर्गत 3 हजार, 626, मुंबई (मध्य) परिवहन कार्यालयअंतर्गत 3 हजार, 154 आणि ठाणे परिवहन कार्यालयअंतर्गत 3 हजार, 107 वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे, असे परिवहन विभागाकडून कळविण्यात आले.