मी कठोर परिश्रम, इमानदारी आणि समर्पण यावरच सतत विश्वास ठेवत, काम करत गेलो असे म्हणत दिल्ली न्यायालयाचा स्वत:च्या बाजूने लागलेला निकाल विनम्रपणे स्वीकारणारे आणि एकाचवेळी भारतीय हॉकी आणि आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये विविधपदे सांभाळत हॉकीमध्ये आधुनिकता आणणार्या नरिंदर बत्रा यांच्याविषयी...
जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले दोन नरेंद्र आपल्याला सुपरिचित आहेत. आधीच्या कालखंडातले नरेंद्रनाथ नरेंद्र किंवा ‘नरेन’ असे संक्षिप्त नाव असलेले विवेकानंद, तर खेळांना महत्त्व देणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यातील विवेकानंद त्यांच्या युवाकाळात क्रीडापटू होते, ते फूटबॉल खेळत. या नरेंद्र नावावरून मला तीन नरेंद्र आठवतात. हे तिसरे नाव आहे, हॉकी खेळाशी संबंधित नरिंदर बत्रा यांचे. या तिसर्या नरेंद्रची कथा क्रीडाप्रेमींनी जाणून घेण्यासारखीच आहे. अनेकदा नरिंदर आणि नरेंद्र यांचे उच्चार एकसारखेच होताना आढळतात. या तिसर्या नरेंद्र यांची थोडक्यात ओळख करून घेत, आज ते परत लोकांच्या मुखी का व कसे आले ते पाहूयात. नरिंदर धृव बत्रा यांनी अमर सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, जिथे त्यांनी १९७७ साली कला शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी ‘काश्मीर विद्यापीठा’त कायद्याचा अभ्यास केला. १९८१ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. २०१२ साली ‘तीर्थंकर महावीर विद्यापीठा’तून आणि २०१९ साली ‘मानव रचना शैक्षणिक संस्थां’कडून त्यांना तत्त्वज्ञान विषयात दोन मानद डॉक्टरेट मिळाल्या.
बत्रा १९७० ते १९८० सालापर्यंत प्रत्यक्ष मैदानात हॉकी खेळले, जिथे त्यांनी विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये भाग घेतला. २०१४ ते २०१६ सालापर्यंत ते हॉकी इंडियाचे अध्यक्ष होते. २०१२ ते २०१६ सालापर्यंत ते हॉकी इंडिया लीगचेही अध्यक्ष होते आणि २०१२ ते २०१५ सालादरम्यान भारतात झालेल्या नऊ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांच्या आयोजन समितीचे नेतृत्त्व त्यांनी केले. बत्रा २००३ ते २०१३ सालापर्यंत दिल्ली आणि ‘जिल्हा क्रिकेट असोसिएशन’चे खजिनदार आणि २००३ ते २०१३ सालापर्यंत ‘आशियाई हॉकी फेडरेशन’चे उपाध्यक्ष होते. २०१८ मध्ये, ते ‘कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष, नॅशनल अॅन्टी-डोपिंग एजन्सीच्या गव्हर्निंग बोर्डचे सदस्य आणि भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या ‘सीएसआर समिती’चेही सदस्य होते. त्यांनी भारतीय हॉकी महासंघात विविध पदांवर काम केले. ज्यामध्ये २००२ ते २०१२ पर्यंत उपाध्यक्ष, २०१२ ते २०१४ पर्यंत स्पर्धा समितीचे सदस्य, २०१४ ते २०१६ पर्यंत कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि २०१६ पासून अध्यक्ष या पदांचा समावेश आहे. ‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन’साठी ते २०१२ ते २०१४ पर्यंत उपाध्यक्ष होते. तर २०१३ ते २०१७ पर्यंत सहयोगी उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते, त्यानंतर त्यांची अध्यक्ष म्हणूनही निवड झाली. २०१९ साली ते ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’चे सदस्य झाले आणि २०२० मध्ये ‘आयओसी ऑलिम्पिक चॅनल कमिशन’चे सदस्यपदही त्यांच्यकडे होते.
दिल्ली उच्च न्यायालयाने बत्रा यांचे हॉकी इंडियामधील आजीवन सदस्यत्व रद्द केले, कारण, ते पद अवमानित मानले गेले. ज्यामुळे त्यांना २०२२ साली ‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन’तसेच ‘आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन’चे अध्यक्षपद सोडावे लागले. त्याचवेळी त्यांनी ‘आयओसी’चे सदस्यपदही सोडले. त्यांच्या राजीनाम्यानंतर, लगेचच केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने हॉकी इंडियाच्या निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली, त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. एका काळ्या कालखंडानंतर भारतात हॉकीचे पुनरुज्जीवन होताना आज आपण बघत असू,तर त्यापाठीमागे एका व्यक्तीचा खूपच मोठा हातभार आपल्याला आढळेल आणि तो म्हणजे एका हॉकीपटू/क्रीडाप्रेमी नरेंद्रचा अर्थात नरिंदरचा. २००८ साली हॉकी इंडिया ‘भारतीय हॉकी फेडरेशन’च्या काळ्या राखेतून बाहेर पडली आणि पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आणि अखेर मैदानावरील कामगिरीपर्यंतच्या गोष्टींमध्ये सुधारणा होऊ लागल्या. या सर्व घडामोडींचे सूत्रधार दुसरा-तिसरा कोणी नसून, नरिंदर बत्राच होते. नरिंदर बत्रा यांच्यातही अनेक त्रुटी होत्याच. पण, भारतीय हॉकी, खेळाडू आणि खेळासाठी त्यांनी केलेले चांगले काम दुर्लक्षित करता येणार नाही. बत्रा संबंधीची एक ताजी बातमी त्यांच्या विरोधकांना एक चपराक देऊन जाते.
पुराव्या अभावी ‘सीबीआय’ने, नरिंदर बत्रा भ्रष्टाचाराची चौकशी बंद केली असल्याची ती बातमी. सीबीआयने ‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन’चे माजी अध्यक्ष नरिंदर ध्रुव बत्रा आणि हॉकी इंडियाचे कार्यकारी संचालक कमांडर आरके श्रीवास्तव, यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास जवळजवळ दोन वर्षांनी पूर्ण केला आहे. अधिकार्यांनी खुलासा केला की, त्यांच्याविरुद्ध गैरव्यवहाराचे पुरावे सापडले नाहीत. हा खटला जुलै २०२२ सालचा आहे. जेव्हा ‘सीबीआय’ने प्राथमिक चौकशी अहवालात कटकारस्थान, विश्वासघात आणि बत्रा यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार यांसारख्या संभाव्य दखलपात्र गुन्ह्यांचा उल्लेख केल्यानंतर ‘एफआयआर’ दाखल केला होता. हत्यांसोबतच, हॉकी इंडियाच्या इतर अधिकार्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामध्ये माजी अध्यक्ष राजिंदर सिंग आणि माजी सरचिटणीस मोहम्मद मुश्ताक अहमद यांचाही समावेश होता. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार दोन वर्षांहून अधिक काळ तपास केल्यानंतर, सीबीआयला बत्रा, सिंग, अहमद आणि श्रीवास्तव यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी ठोस पुरावे सापडले नाहीत. परिणामी, एजन्सीने नवी दिल्लीतील विशेष न्यायालयात या प्रकरणात ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला.
बत्रा यांचा ‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन’च्या कार्यालयातील अनधिकृत नूतनीकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून, हा खटला सुरू झाला होता. ‘एफआयआर’मध्ये त्यांच्यावर पूर्वपरवानगीशिवाय नूतनीकरण केल्याचा आणि बनावट खर्च लपवण्यासाठी, नोंदींमध्ये खोटेपणा केल्याचा आरोप करण्यात आला होता. दि. २५ मे २०२२ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने हॉकी इंडियामधील ‘आजीवन सदस्य’ पद अवैध ठरवल्यानंतर, बत्रा यांनी ‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन’चे अध्यक्षपद सोडले. त्यांनी पत्रांमध्ये वैयक्तिक कारणे देऊन ‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन’, ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’ आणि ‘आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन’मधून अधिकृतपणे राजीनामा दिला.
बत्रांबाबत मुख्य मुद्दा असा होता की माजी ऑलिम्पिक खेळाडू अस्लम शेर खान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात, नरिंदर बत्रा आणि एलेना नॉर्मन यांच्या अनुक्रमे आजीवन सदस्य आणि ‘सीईओ’ म्हणून झालेल्या आजीवन नियुक्तीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. आजीवन सदस्य असल्याने, बत्रा यांना मतदानाचा अधिकार आणि अमर्यादित कार्यकाळ देण्यात आला. भारतीय क्रीडा संहितेनुसार, राष्ट्रीय क्रीडा महासंघांमध्ये ‘आजीवन अध्यक्ष’ आणि ‘आजीवन सदस्य’ अशी पदे बेकायदेशीर आहेत. त्यामुळेच दिल्ली उच्च न्यायालयाने ही पदे रद्द केली. बत्रा यांनी हॉकी इंडियाचे आजीवन सदस्य म्हणून राजीनामा दिल्याने, ‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन’ अध्यक्ष आणि ‘आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन’ अध्यक्ष म्हणून त्यांची संघटना धोक्यात आली. कारण, या सर्व संघटना हॉकी इंडियामुळेच होत्या. दबाव वाढत होता आणि त्यामुळे बत्रा यांना राजीनामा द्यावा लागला.
बत्रा यांनी भारतीय हॉकीसाठी खूप काही केले आहे. ‘आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन’चे अध्यक्ष म्हणून ते करू शकले किंवा भारतात त्यांचा प्रभाव होता म्हणून नाही. बत्रा त्यांच्या नेटवर्किंगसाठी ओळखले जातात. त्यांच्या नेटवर्किंगमुळेच, भारतात हॉकी प्रभावीपणे चालविण्यात मदत झाली. अर्थात ते हॉकी जागतिक स्तरावर ते वाढवू शकले नाहीत. प्रत्येक देशाच्या गरजेनुसार, जागतिक हॉकी आणि भारतीय हॉकी चालवणे वेगळे आहे. बत्रा हॉकीचे व्यापारीकरण करण्यासाठी प्रयत्नशील होते, जे हॉकीच्या शुद्धीकरणाच्या चाहत्यांना अयोग्य वाटले. आज ‘आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन’कडे फक्त तीन प्रायोजक आहेत, जे ‘आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन’ला रोख पैसे देत आहेत आणि तिघेही भारतातीलच आहेत. त्यापैकी दोन बत्रा यांनी आणले आहेत. आशियाई आणि आफ्रिकन हॉकी अजूनही संघर्ष करत आहे. फक्त युरोपियन हॉकी वाढत असून, बत्रा ‘आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन’चे अध्यक्ष होण्यापूर्वीही ते असेच करत होते. दिल्ली न्यायालयाने माजी ‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन’चे अध्यक्ष नरिंदर ध्रुव बत्रा यांच्या प्रकरणात ‘क्लोजर रिपोर्ट’ स्वीकारल्यानंतर, दुसर्या दिवशी त्यांनी सांगितले की, ”त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करणार्यांबद्दल त्यांचा कोणताही राग नाही. कारण, त्यांचे कोणतेही राजकीय गॉडफादर नव्हते. आपल्या व्यवस्थेत असे म्हटले जाते की, मजबूत पाठिंब्याशिवाय कोणीही मोठे स्वप्न पाहू शकत नाही. तथापि, मी नेहमीच कठोर परिश्रम, सचोटी आणि समर्पणावर विश्वास ठेवला आहे,” असे ते म्हणाले.
या प्रकरणाची सुनावणी करताना, विशेष न्यायाधीश मुकेश कुमार यांनी पोलीस अहवाल स्वीकारला आणि सांगितले की, ते तपास अधिकार्यांनी केलेल्या चौकशीवर समाधानी आहेत. न्यायालयाने अहवाल स्वीकारला, तर त्यांना कोणताही आक्षेप नाही, ही तक्रारदाराची विनंतीही न्यायाधीशांनी नोंदवली. तपास अधिकर्याने या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली आहे आणि या न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर, तपास अधिकार्याने केलेल्या तपासाबाबत कोणत्याही मुद्द्यावर शंका नाही, असे न्यायाधीश म्हणाले. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना नरिंदर बत्रा सांगत होत कीे, गेल्या वर्षी मे महिन्यात दाखल झालेल्या या प्रकरणाच्या दोन वर्षांच्या चौकशीनंतर सीबीआयने ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला आणि त्यात आरोपींविरुद्ध कोणत्याही गैरकृत्याचा पुरावा आढळला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मी कठोर परिश्रम, ईमानदारी आणि समर्पण यावरच सतत विश्वास ठेवत, काम करत गेलो. डॉ. नरिंदर ध्रुव बत्रा हे न्यायालयाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देताना सांगत होते.
सदस्य, अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (२०१९-२०२२)
अध्यक्ष, अंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (२०१६-२०२२)
अध्यक्ष, भारतीय ऑलिम्पिक संघ (२०१७-२०२२)
अध्यक्ष, राष्ट्रमंडल खेल संघ (२०१७-२०२२)
या पदांचे राजीनामे देते वेळी असलेले नरिंदर ध्रुव बत्रा पुढे सांगतात की, “एकाच वेळी ही चारही पदे सांभाळणारा, त्यावेळी मी एक भारतीय आणि खेळांप्रति भावुक समर्थक असा जगातील एकमेव असेन. क्रीडाप्रशासनाला समर्पित केलेले माझे कार्य मला सतत प्रेरित करत आले आहे.”
“टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षांनंतर भारताने हॉकीचे मिळवलेले कांस्यपदक, ३२ क्रीडाप्रकारांपैकी विक्रमी १८ प्रकारांत घेतलेला सहभाग आणि सात पदके प्राप्त करणे हा केवळ योगायोग नव्हता. तर सगळ्या संबंधितांनी केलेले सामूहिक प्रयत्न उत्तम नियोजन, रणनीतिक क्रियान्वयन याचा तो परिपाक होता. २००९ सालापासून २०२२ सालापर्यंतच्या काळात भारतीय क्रीडाविश्वाला सतत अग्रेसर ठेवण्यासाठी, आठवड्यातील सातही दिवशी रोज १८-१८ तास काम केले, याचा मला अभिमान वाटतो.”असे नरिंदर म्हणतात.
नरिंदर हे नरेंद्र यांना अभिवादन करत स्वतःला भाग्यशाली समजत म्हणतात की, “भारताला नरेंद्र मोदी यांच्यासारखा खेळांना महत्त्व देणारा पंतप्रधान ज्या काळात मिळाला आहे, त्याच काळात मी कार्य करू शकलो. ऍथेलेटिक्सच्या कल्याणाला प्राथमिकता देणारा, क्रीडाविश्वात लैंगिक समानतेचा पुरस्कार करणारा, खेळांची जागतिक स्तरावर भारताची वकिली करणारा, दूरदर्शिता आणि समर्पण वृत्तीचा पंतप्रधान मला मिळत गेला, ही माझ्या भाग्याचीच गोष्ट आहे.” नरिंदर बत्रा पुढे म्हणतात की, “जसे की मी प्रारंभीच म्हटले आहे की, मी कोणाप्रतिही द्वेष बाळगत नाही. नियती तिच्या तिच्या मार्गाने जात असते, अशा नियतीचा विनम्रतेने स्वीकार करतो. भगवान अशांना आशीर्वाद देवो ज्या लोकांनी मला सतत साथ दिली, माझे समर्थन केले आणि अशादेखील लोकांना भगवान आशीर्वाद देवो की, ज्यांनी माझ्या विरोधात काम करत मला हाकलण्याचे काम केले.”
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४