नवी मुंबई: ( Panvel RTO office shifted to Kharghar ) सध्या कळंबोली येथील इमारतीतून कार्यरत असलेले ‘पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय’ (आरटीओ) एप्रिलमध्ये खारघरच्या सेक्टर-३६ येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृह विभागाने गेल्या आठवड्यात अधिकृत आदेश जारी करून या स्थलांतरासाठी प्रशासकीय आणि आर्थिक आवश्यकतांना मान्यता दिली आहे.
गेल्या १४ वर्षांपासून, ‘आरटीओ’ कार्यालय कळंबोली येथील सामायिक इमारतीतून कार्यरत आहे. मात्र, पनवेल महानगरपालिकेने (पीएमसी) ही इमारत धोकादायक घोषित केली होती. त्यामुळे अनेक सरकारी कार्यालये स्थलांतरित करण्यात आली. कर्मचार्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत असल्याने वरिष्ठ ‘आरटीओ’ अधिकार्यांनी पनवेल तहसीलदार, पीएमसी आणि ‘सिडको’ यांना पर्यायी जागेची विनंती केली.
विनंतीला प्रतिसाद देत, ‘सिडको’ने खारघरमधील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेत आठ व्यावसायिक युनिट्स भाड्याने दिले आहेत. औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात स्थलांतर प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे.