मॉस्को : ( Explosion in Vladimir Putin car ) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या ताफ्यातील एका आलिशान कारमध्ये रविवार, दि. 30 मार्च रोजी स्फोट झाला. हा स्फोट रशियन गुप्तचर संस्था ‘एफएसबी’च्या मुख्यालयाजवळ झाला असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात येत आहे. पुतीन यांच्या ताफ्याच्या कारमध्ये झालेल्या स्फोटामुळे रशियन सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, अलीकडेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांनी पुतीन यांच्या ‘मृत्यूची भविष्यवाणी’ केल्यानंतर हा स्फोट झाला आहे. स्थानिक वृत्तानुसार, ‘मध्य मॉस्कोमध्ये व्लादिमिर पुतीन यांच्या ताफ्यातील एका आलिशान लिमोझिनमध्ये स्फोट झाला.
मात्र, हा एखाद्या कटाचा भाग आहे की गाडीतील काही बिघाडामुळे आग लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रपतींच्या गाडीत झालेल्या स्फोटानंतर, पुतीन यांच्या सुरक्षेबाबत एजन्सी सतर्क झाल्या आहेत. क्रेमलिनमध्ये त्यांच्यावर हल्ल्याचा धोका वाढला आहे. ‘लिमोझिन’ कार ही रशियन राष्ट्राध्यक्षांची आवडती लक्झरी कार आहे. त्यांना अनेकदा ही गाडी वापरताना पाहिले गेले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी ही कार त्यांच्या मित्रांनाही भेट दिली आहे.
त्यांनी ही कार उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनाही भेट दिली. युक्रेन युद्धापासून रशियन एजन्सी पुतीन यांच्या सुरक्षेबाबत सतर्क होत्या. परंतु, अलीकडेच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही त्यांच्या ’मृत्यूची भविष्यवाणी’ केली होती. त्यानंतर पुतीन यांना त्यांच्याच लोकांकडून धोका असल्याची भीती होती. दरम्यान, घटनेवेळी गाडीत कोण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.