मराठी नाटकाने अनेक स्थित्यंतरे अनुभवली. मात्र, मराठी सारस्वताचे नाटकावरील प्रेम किंचितही कमी झाले नाही. मराठी नाटकाला जेवढा प्रेमळ प्रेक्षक लाभला, तेवढा रसिकांचा स्नेह खचितच दुसर्या कलेला लाभला असेल. ‘पंचतुंड नररुंडमालधर’ या नांदीला मिळणारी वाहवा तेव्हा जेवढी होतीच, तेवढीच आजही आहे. सध्या मराठी नाट्यक्षेत्रातील एका मोठ्या वैभवाचा उपयोग बालनाट्याच्या विकासासाठी केला जात आहे. मराठी नाटकाच्या स्थित्यंतराचा आणि बालनाट्यातील अभिनव संगीत प्रयोगाचा घेतलेला हा मागोवा...
नाटकाला मरण नाही. नाटकाने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली. नाट्यसंगीत, नृत्य नाट्य, प्रायोगिक, बालनाट्य, व्यावसायिक, महानाट्य, असे हळूहळू टप्पे गाठत, ते आजच्या आधुनिक नाट्य प्रयोगापर्यंत पोहोचले आहे. नाटकांची सुरुवात संगीत नाटकापासून झाली. ज्यात गाणी जास्त महत्त्वाची होती. पुढे जाऊन, नाटकाचा आशय संवादातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार्या नाटकांची संख्या वाढली. मग कालौघात प्रयोगशील नाटके, त्यातील वेगळा विषय, हटके - काळाच्या पलीकडला विचार, वेगळ्या पद्धतीने विचार मांडलेली नाटके आली. तर काही व्यावसायिक नाटके, ज्यात हलके फुलके विनोद, कुटुंबाला एकत्र येऊन पाहता येणारी, निव्वळ मनोरंजन करणारी नाटकेही आपल्याला माहिती असतील. मग बिग बजेट, भव्यदिव्य, 75 कलाकारांचा समावेश असलेली महानाटके प्रचलित झाली. आता वेशभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजनेला आवाहन असलेली नाटके आपल्याला बघायला मिळतात. त्यात आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केलेला दिसतो. नाटकाचा कल सुरुवातीपासूनच चढता राहिलेला आहे. कधी त्याने प्रस्तुतीकरणाची उंची गाठली, तर कधी ते विस्तारित झाले. काही काळ मी नाटक स्थिरावलेले पाहिले आहे. इतका संथ प्रवास की, प्रेक्षक प्रेक्षागृहाकडे कमी फिरकायला लागले.
काही नाटकवेडे कलाकार हा बदल मान्य करायला तयार होताना दिसत होते. तर काही जण काय राहिले आहे रे नाटकात? काहीच वेगळेपणाच नाही. त्यापेक्षा नवीन टीव्ही चॅनेल, मोठमोठे चित्रपट बघण्यात जास्त मजा येते, असे म्हणताना ऐकू येत होते. हलते चित्र पाहण्यात सगळ्यांनाच मजा येते. पण, नाटक एक विचार मांडतो. नाट्यकला जिवंत कला आहे. सारे काही प्रेक्षकांसमोर आता या क्षणी घडत असते. त्याला किती मर्यादा आहेत यावर चर्चा करण्यापेक्षा, नाटकात मांडलेला विचार घरी घेऊन जाण्यातच जास्त मजा आहे. मराठी कलाकाराला सुज्ञ, जाणकार, विचारी आणि सामंजस्य ठेवणारा प्रेक्षक लाभला आहे. पिढ्यानपिढ्या नाटकाला जाणारे प्रेक्षक महाराष्ट्रात आहेत. नाट्यसंस्थेने कात टाकलेली आपण पाहिली आहे. त्यात काळानुरूप बदलदेखील होतानाही आपण अनुभवले आहेत. पण, बालनाट्याने त्या मानाने चढती उंची गाठलेली किंवा ते विस्तारलेले नाही. प्रौढ रंगभूमीच्या तुलनेत ती संकीर्णच राहिली. त्याची कारणेही अनेक आहेत. पण, कारणे शोधत राहण्यापेक्षा उपाय शोधत राहणार्यांमधली मी आहे.
सामाजिक, प्रायोगिक, शैक्षणिक, शालेय आणि व्यावसायिक अशी थोडी फार पुणे, मुंबईकडची नाटके आपल्याला बघायला मिळाली. मात्र, त्यात जुने साहित्य, जुने विषय यांचेच प्रमाण जास्त होते. आधुनिक काळातले बालनाट्य दिग्दर्शक आणि लेखकही, फार नावारूपाला आलेले दिसले नाही. त्याचे एक कारण आहे की, खूप काम झाले नाही. पण, आता काळ बदलतो आहे, तशी प्रेक्षक आणि बालनाट्य रंगकर्मींची मानसिकताही बदलत चाललेली आढळून येते. मागच्या महिन्यात मी 21व्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत परीक्षक म्हणून काम केले. माझ्या निरीक्षणातून मी काही टिप्पण्या काढून ठेवल्या आहेत. ‘बालनाट्याचे बदलते स्वरूप आणि त्यात काम करणारे नव्या दमाचे कलाकार’ याबद्दल मी सविस्तर लेख लिहिणार आहे. पण, तूर्तास असे सांगावेसे वाटते की, खूप काम बाकी आहे आणि अशक्य अशा शक्यताही अनेक आहेत. मला तर बालकलाकारांना घेऊन काय काय करता येईल? याचेच मनोरे बांधता बांधता नवीन स्फुरण चढते. विचार करता करता लक्षात आले की, बालनाट्याला उंची जर गाठायची असेल, तर त्याची खोली मोजणे आवश्यक आहे. संगीत नाटकांपासून नाटकांचा प्रवास सुरू झाला. त्यामुळे आजचा पाया भक्कम करायचा असेल, तर जुनी वीटच उचलावी लागेल.
रानी राधिका देशपांडे