हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांना नुकताच मानाचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर झाला. ‘नौकर की कमीज’, ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या साहित्यकृती. गेली कित्येक दशके हिंदी साहित्यविश्वात त्यांनी आपल्या लेखनशैलीतून स्वतःची वेगळी छाप उमटवली. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्यविश्वाची मुशाफिरी करणारा ‘महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी’चे कार्याध्यक्ष डॉ. शीतला प्रसाद दुबे यांचा लेख...
हिंदी साहित्यसृष्टीतील ज्येष्ठ लेखक विनोद कुमार शुक्ल यांना यंदाचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला. विनोद कुमार शुक्ल यांनी गद्य आणि पद्य यांना समान न्याय देऊन, साहित्य कलेला सहजतेने जोडण्याचे काम केले. आपल्या रचनात्मक कौशल्याने त्यांनी समाजातील दुरवस्थेला सहजतेने लोकांसमोर सादर केले. विनोद कुमार शुक्ल आपल्या कवितेमध्ये जीवनाशी निगडित त्या त्या सर्व मूल्यांचा समावेश करतात, ज्यामुळे माणसात सुधारणा घडेल. त्यांच्या आशयघन कवितेला अधिक फुलवण्यासाठी ते म्हणतात की, “आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी आहेत. परंतु, कुठलीही गोष्ट अतिरिक्त नाही. या पृथ्वीतलावर अशी कुठलीच गोष्ट नाही, जी अनावश्यक आहे.” याच आशयाच्या कवितेमध्ये ते म्हणतात की,
कितना बहुत हैं परंतु,
अतिरिक्त एक भी नहीं।
एक पेड़ में कितनी सारी पत्तियां
अतिरिक्त एक भी नहीं,
एक कोंपल नहीं अतिरिक्त।
एक नक्षत्र भी ऐसा नहीं,
जो अतिरिक्त हो।
आपल्या सृष्टीमध्ये अशी एकही गोष्ट नाही जी अतिरिक्त आहे, हे कवी किती सहजतेने वाचकांना उलगडून सांगतो नाही! आपल्याला काही गोष्टी अतिरिक्त वाटत असल्या, तरीसुद्धा निसर्गामध्ये काही तत्त्वे अनिवार्य असतात. जसे की, झाडाला फुटलेली हिरवी पाने, ही त्या झाडाला एक नैसर्गिक सौंदर्य प्रदान करतात. या पानांमुळे आपल्याला झाडाची सावली मिळते. ही पाने खरं तर झाडाचे अस्तित्वच निश्चित करत असतात. म्हणूनच ही पाने एका अनिवार्य तत्त्वाप्रमाणे आपल्यासमोर येतात. कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की, आपण आपल्या गरजेनुरुप जरी निसर्गाकडे बघत असलो, तरीसुद्धा या निसर्गात काहीच अनावश्यक असे नाही. या अर्थाने विनोद कुमार शुक्ल निसर्गाचे समृद्ध कवी आहेत, हे लक्षात येते.
व्यक्तीची ओळखसुद्धा शुक्ल माणूसपणानेच करून घेतात. शुक्ल यांच्या मते, निराशा आणि उदासीनता माणसाला इतके पोखरते की, त्याचे माणूसपणच नाहीसे होते. म्हणूनच, माणसाच्या ‘सोबती’चे महत्त्व ते प्रकर्षाने अधोरेखित करतात. एका अर्थाने ते ‘संगच्छध्वं संवदध्वं’ हा संस्कार आपण जगताना अंगी बाळगायला हवा, असे सांगतात. व्यक्तीचे एकाकीपण त्याच्या मनुष्यत्वाच्या विरोधात आहे. माणसाची मूळ प्रकृती सहजीवन आहे. तो प्राण्यांसहित नदी, डोंगर, दर्यांमध्ये आपल्या अस्तित्वाची कथाच लिहीत असतो. कवीच्या मते, खरा माणूस तोच, जो भोवताली असलेल्या सर्व तत्त्वांशी समरस होऊन स्वतःकडे बघतो. मानवी जीवनातील व्यवहाराला तो कवितेचा विषय बनवतो.
विनोद कुमार शुक्ल यांचे लेखन केवळ स्वतःपुरते मर्यादित नाही. आपला परिसर, आपला भोवताल यांना सोबत घेऊन त्यांची लेखणी प्रसवते आणि लिहिता लिहिता आपला एक एक अंश त्या त्या परिसरामध्ये ते जणू सोडून येतात. त्यांच्या ‘प्रवास के पहले सोचता हूं’ या कवितेमध्ये याची प्रचिती येते. शुक्ल म्हणतात,
प्रवास के पहले सोचता हूं कि, निवास करता हूं। आकाश को देखता हूं
आंगन को प्रणाम करता हूं।
धरती को देखता हूं
और घर के कोने को
प्रणाम करता हूं,
घर के आगे पिछवाड़े
छानी-छप्पर, आले, बल्ली को,
घर के इस पार उस पार को,
खुली खिड़की दरवाजे को,
दिन और रात को
लोगों को प्रणाम करता हूं कि निवासियों को प्रणाम करता हूं।
सदर काव्याविष्कार म्हणजे शुक्ल यांच्या जीवनातील सहजता दर्शवणारा आहे. विनोद कुमार शुक्ल यांचे आणखीन एक वेगळेपण म्हणजे, ते जिथे जिथे जातात, त्या त्या जागेचा एक अंश ते सोबत घेऊन येतात आणि स्वतःची एक खूण त्या त्या जागेवर सोडून येतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील याच गोष्टीमुळे ते एक उत्तम कवी आहेत. एखादे आंब्याचे झाड आपल्याला रसाळ आंबे देते, म्हणून ते आपल्याला उपयुक्त वाटते. पण, कवीच्या दृष्टीने विचार करता, झाडावरील विविध पक्ष्यांची घरटी, फांद्यांवर धावणारी खारूताई, पानांवर आदळणारा वारा, प्रखर ऊन आणि झाडावरून पडणारी सावली, ही सर्व परिस्थिती त्या झाडाला एकाच वेळी अनुभवायला मिळते. म्हणूनच उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन झाडाची बहुविधता कवी अधोरेखित करतो. हा कवी भारतीय संस्कृतीचा पुरस्कर्ता म्हणून संपूर्ण ऋतुचक्र झाडाच्या साहाय्याने सिद्ध करतो.
विनोद कुमार शुक्ल एक असे साहित्यिक आहेत, ज्यांनी आपल्या जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करीत, आपल्या सृजनाचा मार्ग सुलभ केला आहे. निसर्ग, नदी-नाले, डोंगर-दर्या या सार्यांचा त्यांना मनसोक्त आस्वाद घ्यायचा आहे. जे स्थिर आहे, ते कुठेच जाऊ शकत नाही. पण, माणूस म्हणून आपण या ऊर्जास्रोतांकडे जाऊ शकतो. आपल्या एका रचनेत ते म्हणतात की,
जो मेरे घर कभी नहीं आएंगे
मैं उनसे मिलने
उनके पास चला जाऊंगा।
एक उफनती नदी
कभी नहीं आएगी मेरे घर
नदी जैसे लोगों से मिलने
नदी किनारे जाऊंगा
कुछ तैरूंगा और डूब जाऊंगा।
या काव्यपंक्तींवरुन कवी आपल्या जीवनात प्रवाहीपणाला खूप महत्त्व देतो, असे म्हणता येईल. जीवनात कुठल्याही प्रकारे गाठ निर्माण होऊन, हे प्रवाहीपण खंडित होऊ नये, अशी कवीची मनस्वी इच्छा. ज्ञान, मूल्ये आणि तत्त्वे डोक्यावर ओझ्यासारखी वाहून नेणार्या लोकांना टाळून, कवीला अशा लोकांना भेटायची इच्छा आहे, जे नदीप्रमाणे सर्वत्र हिरवळ पसरवतात. कारण, आपल्याला जर समाजातील जडत्व संपुष्टात आणून तरलता टिकवून ठेवायची असेल, तर प्रवाहीपणाशी जुळवून घेणे अत्यंत आवश्यक. या प्रवाहीपणामुळे माणसाच्या अंतर्गातील व बाह्य जीवनसृष्टी समृद्ध होईल.
विनोद कुमार शुक्ल आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात की, मजूर हे कायम इतरांसाठी काम करत असतात. त्यांना त्यांच्या जीवनात एका क्षणाचीसुद्धा सवड नसते. अशा मजुरांच्या जवळ जाणे, त्यांचे दु:ख समजून घेणे, हे कवीसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि याचे महत्त्व इतके आहे की, तीच कवीच्या जीवनातील शेवटची इच्छा आहे.
जो लगातार काम में लगे हैं
मैं फुर्सत से नहीं
उनसे एक जरूरी काम की
तरह मिलता रहूंगा
इसे मैं अकेली आखिरी इच्छा की तरह सबसे पहली इच्छा रखना चाहूंगा।
रात्रंदिवस मेहनत करणार्या या लोकांना, सवड म्हणून न भेटता, त्यांना प्राधान्य देत भेटायचे, यावरुन कवीची समाजाप्रति असलेली निष्ठा प्रकट होते. शुक्ल यांची अशीच एक कविता आहे, ‘धौलागिरी को देखकर.’ धौलगिरीचा विशाल डोंगर त्याच्या भव्यतेसाठी ओळखला जातो. परंतु, धौलगिरीला बघताना ते डोंगराकडे न बघता, आपल्या पूर्वजांच्या चित्राकडे बघत असतात. त्यांच्या पूर्वजांची अटलता आणि आत्मविश्वास यामुळे प्रभावित होऊन शेवटी कवी म्हणतो की,
धौलागिरी को देखने के बाद
मैं अपने पूर्वजों के चित्र नहीं
पूर्वजों को याद करता हूं।
विनोद कुमार शुक्ल आपल्या जीवनाला एखाद्या खुल्या पुस्तकाप्रमाणे लोकांसमोर ठेवतात. आपण जेवढे स्वतःला बंदिस्त करत जाऊ, तेवढे आपण कमकुवत होत राहू. दुसर्यांसमोर आपण जितके खुलतो, तितके आपण मोठे होत जातो, हा त्यामागील आशय.
साथ में कोई नहीं हैं
दूर तक कोई नहीं
पर कोई इस खुले को खटखटाता हैं
कौन आना चाहता हैं?
मैं कहता हूं
अंदर आ जाईए
सब खुला हैं
मैंने देखा मुझे
हिमालय दिख रहा हैं।
कवीच्या म्हणण्यानुसार, आकाश धरतीला, धरती हवेला आणि हवा जंगलातील हिरव्यागार प्रदेशाला जागे करते. आपण आपल्या आयुष्यात जितके सहज होत जातो ना, तितकेच मोठे होतो. मोठे होण्यासाठी कुठलाही अभिनिवेश अंगी बाणवण्याची आवश्यकता नसते. साधेपणाने जरी आपण समाजात वावरलो, तरीसुद्धा आपली दृष्टी हिमालयाच्या शिखराइतकी उंच राहते.
कवी विनोद कुमार शुक्ल यांची एक कादंबरी आहे जिचे नाव आहे, ‘दीवार में एक खिडकी रहती थी.’ विनोद कुमार शुक्ल म्हणतात की, “भिंतीमध्ये एक खिडकी आहे. जिच्या माध्यमातून बाहेरचे दृश्ये पाहायला मिळते. आकाशात उडणारे पक्षी, जंगल, या सार्यांचे दर्शन आपल्याला होते. परंतु, ज्यांच्या आयुष्यात ही खिडकीच नाही, त्यांनी आपल्या जीवनात व बाहेरच्या जगामध्ये भिंत उभी केली आहे.” हे एकाप्रकारे आपल्या वर्तमानकाळाचेच वास्तव दर्शन. आजचा माणूस स्वार्थामध्ये इतका बुडाला आहे की, खिडकीच्या बाहेर बघण्याऐवजी तो आत्ममग्न झाला आहे. ही भिंत म्हणजे जात, धर्म, वर्ण, वर्ग यांद्वारे माणसामाणसांत भेद करणारी प्रतीके आहे. या भिंतीच्या पलीकडे जेव्हा माणूस या सगळ्या भेदांना मिटवून बाहेर येतो, तेव्हा तो खर्या अर्थाने माणूस होतो.
समाजात चहूबाजूला दिसणारी विसंगती, आणि जीवनाला नष्ट करणार्या शक्ती यांच्यामध्ये विनोद कुमार शुक्ल आशेचा किरण म्हणून समोर येतात. त्यांच्या मते, भलेही माणसाला उद्ध्वस्त करणार्या शक्ती आता कार्यरत असू देत. परंतु, जीवनाला प्रकाशमान करणारे सूर अधिक शक्तिशाली आहेत. याचा संकेत देणारी त्यांची कविता म्हणजे,
प्रत्येक आवाज खटका हैं। बच्चों का मां कहकर पुकारना,
खत्म होती हरियाली में
बीज से अंकुर का निकलना
खाली मुट्ठी में बंद हवा का छूटकर
जमीन पर गिरना खटका हैं
पानी पीना और रोटी चबाना भी...
हो सकता हैं जिंदगी को नष्ट करने के धमाके के पहले
जिंदगी का बड़ा धमाका हो।
विनोद कुमार शुक्ल यांची वरील कविता ही वेळेचे महत्त्व अधोरेखित करणारी. यामध्ये जीवनाला विरोध नसून, जीवनाशी संवाद साधला गेला आहे. भारतीय समाजात मुली-महिलांच्या दुरवस्थेबद्दल शुक्ल खूप दुःखी आहेत. स्त्रियांबद्दलच्या समाजाच्या संकुचित विचारांमुळे त्यांचे मन व्यथित होते. अत्यंत कमी वयात मुलींना जबाबदार स्त्री म्हणून घडवण्यात येते, या वेदनेवर भाष्य करताना ते म्हणतात की,
उछलती कूदती एक लड़की को
फ्रॉक छोड़कर साड़ी पहनने के लिए कहा गया
तो वह दौड़ते हुए लगातार
आड़ में होने लगी ।
पहले एक पेड़ की आड़ हुई
तो पेड़ कट गया,
जंगल के आड़ में हुई
तो जंगल कट गया,
धान के खेतों के अंदर घुसकर
धान के आड़ में हुई,
धान के कट जाने के बाद
तालाब में कूद कर पानी की आड़ में हुई, तालाब सूखा तो
घाटियों से उतरकर
पहाड़ के आड़ हुई,
पहाड़ टूटा तो
इसके बाद दूर तक मैदान था, वहां आड़ में होने के लिए कुछ भी नहीं था।
विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड, उद्ध्वस्त होणारी वनराई, डोंगरांनाच जमीनदोस्त होणे, या सार्या विसंगतीला कवीने आपल्या कवितेत उचित स्थान दिले आहे. या कवितेमध्ये एकाच वेळी आणि स्त्री आणि निसर्ग यांच्यासोबत असलेला व्यवहार चितारलेला आहे. यातली स्त्री म्हणजे केवळ स्त्री नसून, ती आपल्या अस्मितेचे प्रतीक आहे. भाष्य करण्यासाठी खूप सार्या गोष्टींचा व्यवहार सांगण्यापेक्षा अगदी सहजपणे स्त्री आणि निसर्ग यांना एका धाग्यात कवीने गुंफले आहे. विनोद कुमार शुक्ल म्हणजे केवळ शब्दांचा खेळ करणारे लेखक नसून, ते शब्दांचे साधक आहेत. कवितेमध्ये मोजून-मापून शब्दांचा वापर करण्याची त्यांची हातोटी वाखणण्याजोगी आहे. अशा या ‘शब्दसाधका’चे ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळाल्याबद्दल अभिनंदन!