नवी दिल्ली: ( protests in Nepal ) नेपाळमध्ये जनता राजेशाहीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली असून त्यामुळे देशात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरक्षा दल आणि राजेशाही समर्थक निदर्शकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर नेपाळमध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी काठमांडूच्या काही भागात राजेशाही समर्थक निदर्शकांनी दगडफेक केली, एका राजकीय पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला, अनेक वाहनांना आग लावली आणि राजधानीच्या टिनकुने भागात दुकाने लुटली तेव्हा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शुक्रवारी संचारबंदी जारी लागू करण्यात आली होती. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर संचारबंदी उठवण्यात आली.
सुरक्षा कर्मचारी आणि राजेशाही समर्थक निदर्शकांमध्ये झालेल्या संघर्षात एका टीव्ही कॅमेरामनसह दोघांचा मृत्यू झाला. नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याला पाचारण करावे लागले. काठमांडू जिल्हा प्रशासन कार्यालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, शुक्रवारी दुपारी ४:२५ वाजल्यापासून लागू केलेली संचारबंदी शनिवारी सकाळी ७ वाजता उठवण्यात आली.
हिंसक निदर्शनादरम्यान घरे जाळल्याच्या आणि वाहनांची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी १०५ निदर्शकांना अटक केली आहे. निदर्शक राजेशाहीची पुनर्स्थापना आणि हिंदू राष्ट्राची मागणी करत होते. निषेध संयोजक दुर्गा प्रसाई यांनी सुरक्षा बॅरिकेड तोडून बुलेटप्रूफ वाहनाने बानेनश्वरकडे जाताना निदर्शनाला हिंसक वळण लागले. नेपाळची संसद भवन बानेश्वर येथे आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे सरचिटणीस धवल शमशेर राणा आणि पक्षाचे केंद्रीय सदस्य रवींद्र मिश्रा यांचा समावेश आहे.
नेपाळच्या माजी राजांनी लोकशाही दिनी (१९ फेब्रुवारी) प्रसारित केलेल्या त्यांच्या व्हिडिओ संदेशात पाठिंबा देण्याचे आवाहन केल्यापासून राजेशाही समर्थक राजेशाही पुनर्स्थापित करण्याची मागणी करत आहेत. देशाच्या विविध भागातील धार्मिक स्थळांना भेट दिल्यानंतर पोखरा येथून त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या समर्थनार्थ ९ मार्च रोजी राजेशाही समर्थक कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती.