ग्राहक हेच आमचे खरे गुरु आणि त्यांचा विश्वास हेच यशाचे गमक – मुकुंद चितळे
मुकुंद एम चितळे आणि कंपनीचा ५१ वा वर्धापनदिन संपन्न
29-Mar-2025
Total Views |
मुंबई : सनदी लेखापाल क्षेत्रातील देशपातळीवरची अग्रगण्य नाव मुकुंद एम चितळे अँड कंपनीचा ५१ वा वर्धापनदिन मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे संपन्न झाला. या समारंभास मुंबईच्या उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान आणि एल अँड टी समुहाचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यन यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात १९७० च्या दशकापासून सुरु झालेल्या कंपनीच्या प्रवासाबद्दल चित्रफित दाखवण्यात आली.
या कार्यक्रमात भारत तसेच जागतिक पातळीवरील उद्योग क्षेत्रासमोरची आव्हाने, संधी तसेच भारताचे जागतिक स्थान या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. एस एन सुब्रमण्यन यांनी भू – राजकीय क्षेत्रातील आव्हाने आणि उद्योग क्षेत्रातील कल यांवर उपस्थितांना संबोधित केले. भारतीय उद्योगक्षेत्रातील कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि भांडवल निर्मिती या विषयावर आशिषकुमार चौहान यांनी उपस्थितांना संबोधित केले.
ग्राहक हेच आमचे खरे गुरु आणि त्यांचा विश्वास हेच यशाचे गमक – मुकुंद चितळे
१९७० च्या दशकात सुरुवात केली तेव्हा मी एकटाच या कंपनीचा भाग झालो होतो. परंतु हळूहळु करत ग्राहकांचा विश्वास संपादन करत आज हा पन्नास वर्षांपेक्षा जास्त प्रवास आम्ही करु शकलो अशा शब्दांत मुकुंद एम चितळे अँड कंपनीचे अध्यक्ष मुकुंद चितळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ग्राहक हेच आमचे गुरु आहेत, कारण तेच आम्हांला शिकवतात की आमच्या सेवेत कुठे कमी आहे आणि सुधारणा कशी केली पाहिजे, त्यांच्यामुळेच आम्ही इथवरचा प्रवास करु शकलोय. आपल्या कामावरची निष्ठा हे आमचे सुत्र आहे, आमच्या ग्राहकांनी अशीच साथ देत रहावी अशा शब्दांत अपेक्षा व्यक्त करत मुकुंद चितळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.