सध्या सोशल मीडियावर ‘घिबली’ स्टाईलने आपल्या फोटोंना इफेक्ट देण्याच्या एका ट्रेंडची चांगलीच चलती आहे. पण, नेमका हा ‘घिबली’ प्रकार तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडलेला दिसतो. तर जपानमधील ‘स्टुडिओ ‘घिबली’ हा केवळ एक स्टुडिओच नाही, तर ती एक संकल्पना आहे, एक अनुभव आहे. ‘स्टुडिओ घिबली’च्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने जपानी संस्कृती, समृद्ध निसर्ग, मानवी भावना आणि कल्पनारम्य कथांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते. तेव्हा, या ट्रेंडच्या निमित्ताने अॅनिमेशनची जादूई नगरी असलेल्या ‘स्टुडिओ घिबली’च्या दुनियेची ही सफर...
‘घिबली’ स्टुडिओ’च्या खास अॅनिमेशन शैलीत आपला फोटो बदलण्याची क्रेझ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आणि ट्रेंडिग दिसते. अभिनेत्यांपासून ते अगदी राजकारण्यांपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर आपले फोटो ‘घिबली’ स्टाईलमध्ये कन्व्हर्ट करून शेअर करताना दिसतो. पण, हा बदल करण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? तर ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने हे आता अगदी सोपं झालं आहे. ‘ड्रीम बाय वोमबो’ ((Dream by Wombo), ‘डीप आर्ट’ (DeepArt), ‘टूनमी’ (ToonMe) यांसारख्या अॅप्सचा वापर करून काही सेकंदांतच तुमचा फोटो ‘घिबली’ अॅनिमेशनसारखा दिसू शकतो. यासाठी वापरकर्त्यांना आपला फोटो अपलोड करून ’स्टुडिओ घिबली’ किंवा ’अॅनिमे स्टाईल’ फिल्टर निवडावा लागतो. अधिक ओरिजिनल लूक हवा असल्यास, ‘अॅडोब फॉटोशॉप’ (Adobe Photoshop), ‘प्रो क्रियेट’ (Procreate) ‘किंवा क्रीटा’ (Krita) यांसारख्या सॉफ्टवेअरमध्ये डिजिटल पेंटिंग करून फोटोला हळूवार ‘घिबली’ टच देता येतो. काहीजण यासाठी ‘ब्लेंडर’ (Blender) किंवा ‘आफ्टर इफेक्ट’ (After Effects) सारख्या अॅनिमेशन सॉफ्टवेअरचा देखील वापर करून हलत्या प्रतिमा (animated images) तयार करतात.
अॅनिमेशन ही केवळ मनोरंजनाची कला नाही, तर ते एक सशक्त अभिव्यक्तीचं साधन आहे. जगभरातील अनेक देशांनी आपल्या संस्कृतीनुसार अॅनिमेशनचे तंत्र विकसित केले. अमेरिकेत ‘वॉल्ट डिझ्नी’, युरोपमध्ये ‘अॅस्टेरिक्स’ आणि ‘टिनटिन’, तर जपानमध्ये अॅनिमेशनच्या दुनियेत सर्वांत प्रभावशाली नाव म्हणजे ‘स्टुडिओ घिबली.’ हा स्टुडिओ फक्त जपानी अॅनिमेशनचं प्रतिनिधित्व करत नाही, तर त्याने जागतिक स्तरावर एका अनोख्या कथाकथन शैलीला जन्म दिला आहे. ’घिबली’हा जपानमधील सुप्रसिद्ध अॅनिमेशन स्टुडिओंपैकी एक आहे. ’स्टुडिओ घिबली’ची स्थापना 1985 मध्ये दिग्गज अॅनिमेटर आणि दिग्दर्शक हायाओ मियाझाकी, इसाओ ताकाहाता, आणि तोशियो सुझुकी यांनी केली. हा स्टुडिओ त्यांच्या सुंदर हाताने रेखाटलेल्या अॅनिमेशनसाठी आणि मनाला भिडणार्या कथाकथनासाठी ओळखला जातो. ’स्टुडिओ घिबली’ची तुलना ‘डिझ्नी’, ‘पिक्सार’ आणि ‘ड्रीमवर्क्स’ यांसारख्या पश्चिमी अॅनिमेशन स्टुडिओंशी केली जाते. परंतु, त्यांचा विशिष्ट जपानी स्पर्श आणि कलात्मक दृष्टिकोन हा अगदी वेगळाच...
1984 मध्ये हायाओ मियाझाकी यांनी दिग्दर्शित केलेल्या ’नॉसिका ऑफ द व्हॅली ऑफ द विंड’ या चित्रपटाने जपानी अॅनिमेशन जगतात खळबळ उडवली. याच घवघवीत यशामुळे ‘स्टुजिओ घिबली’ची स्थापना झाली. त्यानंतर त्यांनी एकाहून एक उत्कृष्ट चित्रपट दिले, जसे की, ‘माय नेबर टोटोरो’ (1988), ‘किकीज डेलेवरी सरविस’ (1989), ‘प्रिन्सेस मोनोनोके’ (1997) आणि विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणजे ‘स्पिरीटेड अवे’ (2001) हा ऑस्करवर नाव कोरणारा पहिला जपानी अॅनिमेशन चित्रपट ठरला. त्याचप्रमाणे ‘हाऊल्स मुविंग कास्टल’ (2004), ‘द विंड राइज’ (2013) हे सर्व चित्रपट त्यांच्या जादूई कथांसाठी आणि अप्रतिम अॅनिमेशनसाठी ओळखले जातात.
‘स्टुडिओ घिबली’ने जपानमध्ये मोठे यश मिळवले, पण जागतिक स्तरावर 2000च्या दशकात त्याचा प्रभाव जाणवायला सुरुवात झाली. विशेषतः ‘स्पिरीटेड अवे’ने ऑस्कर जिंकल्यानंतर, ‘नेटफ्लिक्स’ आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘घिबली’चे चित्रपट उपलब्ध झाले. जगभर त्यांचा चाहतावर्ग प्रचंड प्रमाणात वाढू लागला. सुरुवातीला ‘घिबली’ हा प्रकार भारतात तितकासा चर्चेत नव्हता. भारतात जपानी अॅनिमेशनला आधी फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. पण, 2010 नंतर ‘अॅनिमे’ आणि ‘मांगा’ यांचा प्रभाव वाढू लागला. कालांतराने ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘प्राईम व्हिडिओ’सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘घिबली’चे चित्रपट उपलब्ध झाले.
भारतात ‘स्पिरीटेड अवे’, ‘माय नेबर टोटोरो’ आणि ‘प्रिन्सेस मोनोनोके’ यांसारखे चित्रपट लोकप्रिय होऊ लागले. मग हळूहळू भारतात सोशल मीडियावर 'Ghibli-esthetic', 'GhibliVibes' आणि 'GhibliFood' यांसारखे हॅशटॅग्स ट्रेंड करू लागले. भारतात ‘घिबली’ ट्रेंड होण्याची मुख्य कारणे तरुणांमध्ये ‘अॅनिमे’चा वाढता प्रभाव. ‘नरूटो’, ‘अटॅक ऑन टायटन’, ‘डेथ नोट’ यांसारख्या ‘अॅनिमे’ने भारतात आधीच चाहतावर्ग तयार केला होता. ‘डिझ्नी’ आणि ‘पिक्सार’ हे 'CGI' तंत्रज्ञानाकडे झुकले, तर ’स्टुडिओ घिबली’ने पारंपरिक हाताने काढलेल्या फ्रेम्सवर भर दिला. त्यांची चित्रपटनिर्मिती प्रक्रिया ही स्टोरीबोर्डपासून पूर्णतः हाताने रेखाटलेल्या फ्रेम्सपर्यंत पोहोचणारी असते. त्यामुळे त्यात एक वेगळा जिवंतपणा आणि आपलेपणा जाणवतो. स्टुडिओ ‘घिबली’चे चित्रपट हे नुसते मनोरंजन करणारे नाहीत, ते आपल्याला एका नवीन जगात नेऊन सोडतात. त्यात जादू आहे, पण ती ’फॅन्टसी’सारखी अविश्वसनीय वाटत नाही, तर ती आपल्या आयुष्याशी जोडली गेलेली असते.
‘स्टुडिओ घिबली’ केवळ जपानपुरती मर्यादित राहिलेली अॅनिमेशन शैली नाही, तर त्याचा प्रभाव संपूर्ण जगभर पडला आहे. ‘घिबली’ या स्टुडिओने केवळ तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट अॅनिमेशन दिले नाही, तर मानवी मनाच्या भावनिक प्रवासालाही स्पर्श केला. जॉन लॅसेटर आणि अनेक हॉलीवूड दिग्दर्शकांनी मियाझाकी यांच्या चित्रपटांमधून प्रेरणा घेतली आहे. जपानमध्ये असलेलं ‘घिबली’ संग्रहालय अॅनिमेशनप्रेमींसाठी एक तीर्थस्थान मानलं जातं. हायाओ मियाझाकी यांच्या चित्रपटांमधून केवळ कल्पनारंजन नाही, तर भावनिक अनुभव मिळतो. त्यामुळे जसे अॅनिमेशन विकसित होत आहे, तसे ’घिबली’चा प्रभाव पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत राहील, हे मात्र नक्की.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.