मुंबई : कुणाल कामराच्या बाबतीत आता पोलिसांच्या थर्ड डिग्रीचा वापर करावा लागेल, असा सूचक इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असेही ते म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे सध्या शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. अशातच पोलिसांनी कुणाल कामराला दोनदा समन्सही बजावलेत. यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, "कुणाल कामराच्या बाबतीत आता पोलिसांच्या थर्ड डिग्रीचा वापर करावा लागेल. कुणाल कामरा कुठल्यातरी बिळात लपून बसला आहे. तो आणखी सापडलेला नाही."
"आमच्या शिवसैनिकांनी त्याला ओपन आव्हान दिलेले आहे. आम्ही मंत्री असलो तरी आधी आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगण्यास सांगितल्याने आम्ही शांत आहोत आम्ही शिवसैनिक म्हणून रस्त्यावर आलो तर या कामराला कुठल्याही बिळात लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून फरफटत आणून आपटण्याची ताकद शिवसैनिकात आहे. मंत्री म्हणून आम्हाला मर्यादा आहेत. पण आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आणि कामराला उचला आणि रपोलिसांच्या टायरमधला प्रसाद द्या, असे आम्ही पोलिसांना सांगणार आहोत," असे ते म्हणाले.