उद्योगक्षेत्रातील आव्हानांतही भारत आपले स्थान बळकट करेल – एस एन सुब्रमण्यन

29 Mar 2025 17:50:32

चितळे
 
मुंबई : येणाऱ्या काळात भूराजकीय तसेच उद्योग क्षेत्रातील समीकरणे बदलणार असली तरी भारत आपले स्थान बळकट करेल असा विश्वास एल अँड टी समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस एन सुब्रमण्यन यांनी व्यक्त केला आहे. सनदी लेखापाल क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेली मुकुंद एम चितळे अँड कंपनीचा ५१ वा वर्धापनदिन मुंबईत संपन्न झाला. या कार्यक्रमास मुंबई शहरांतील उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात भूराजकीय क्षेत्रांतील आव्हाने आणि उद्योग क्षेत्रातील वाढत्या संधी याविषयावर आयोजित चर्चासत्रात एस एन सुब्रमण्यन यांनी सादरीकरण केले.
 
येणाऱ्या काळात तीन क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करावे लागेल, ती म्हणजे ऊर्जा क्षेत्र, कृत्रिम बुध्दीमत्ता, लोकसंख्यावाढ. या तीन क्षेत्रांतील घडामोडी जगाच्या अर्थकारणाची दिशा ठरवतील. ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतरांबद्दल बोलायचे झाले तर येत्या काळात विविध उद्योग समुह हे हरित ऊर्जेच्या क्षेत्रांत गुंतवणुक करतील. हरित ऊर्जा क्षेत्रातील उत्पादन खर्च कमी करणे, त्यांच्या वापराबद्दल जनतेला प्रोत्साहित केले पाहिजे, येत्या काळात भारतातील एकूण ऊर्जेच्या गरजेपैकी ५० टक्के ऊर्जा ही हरित ऊर्जा असेल. असे सुब्रमण्यन यांनी आपल्या सादरीकरणात सांगीतले.
 
कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्र हे वेगाने विस्तारत आहे. त्यात रोजगाराच्या तसेच गुंतवणुकीच्याही संधी उपलब्ध होत आहेत त्यामुळे कुठलेच क्षेत्र हे या क्षेत्राच्या वापरापासून अलिप्त राहू शकत नाही. यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसंख्यावाढ, येत्या काळात जगातील दर १ हजार बालकांमध्ये १७२ बालके ही भारतातील असणार आहेत. त्यामुळे भारतासारख्या देशाने या संधींचा फायदा कसा करुन घेता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे सुब्रमण्यन म्हणाले.
 
सुब्रमण्यन यांनी आपल्या सादरीकरणात फक्त भारताच्याच दृष्टीने नव्हे तर जगाच्या दृष्टीनेही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली आणि त्यातील आव्हानांसोबतच संधींबद्दलही चर्चा केली. या समारंभात शेवटी मुकुंद चितळे अँड कंपनीचे अध्यक्ष मुकुंद चितळे यांनी आभार प्रदर्शन केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0