पालघर: ( Plastic free Palghar district campaign launched by Guardian Minister Ganesh Naik ) जनतेच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी आहोत याचे भान ठेवून अधिकारी आणि कर्मचारी यांनी जनतेची कामे तात्काळ करावी असे निर्देश वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिले.
समाधान शिबराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात करण्यात आले होते. तसेच जनता दरबाराचे आयोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते यावेळी पालकमंत्री श्री. नाईक बोलत होते.
यावेळी आमदार राजन नाईक, आमदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, माजी जि. प. अध्यक्ष प्रकाश निकम,जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे , सहायक जिल्हाधिकारी करिष्मा नायक , सत्यम गांधी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्लास्टिक मुक्त आणि दुर्गंधी मुक्त पालघर जिल्हा मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेऊन दुर्गंधीमुक्त करावा. ही मोहीम प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयाने यशस्वी करावी मोहिमेअंतर्गत रस्त्या लगत असलेल्या दुकानांच्या मालकांसोबत चर्चा करण्यात येणार असून रस्त्या लगत होणाऱ्या कचरा व दुर्गंधी यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये भरीव योगदान देणाऱ्यांना बक्षीस देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
१०० दिवसाचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. या १०० दिवसांमध्ये ७ कलमी मापदंड तयार करण्यात आले आहेत. १०० दिवसामध्ये जिल्हा प्रशासनाला उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
ज्यांनी मागील जनता दरबारामध्ये अर्ज केला होता आणि त्यांच्या प्रश्नांना किंवा समस्यांचा निपटारा होऊन अर्जदाराला समाधान प्राप्त झाले आहे अशा नागरिकांसाठी समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जनता दरबाराची सुरुवात सरकार आपल्या दारी, सरकार आपल्या घरात, सरकार आपल्या अंगणात या संकल्पनेतून पुढे जनतेच्या समस्या जनता दरबारामार्फत सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले.
तालुका पातळीवर तसेच खेड्या-पाड्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा पोहोचली पाहिजे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी अधिक प्रशासन अधिक गतिमानाने काम करेल असा विश्वास पालकमंत्री श्री.नाईक यांनी व्यक्त केला.
मागील जनता दरबारामध्ये ज्या नागरिकांनी निवेदन दिले होते अशा 80 टक्के निवेदनाचा निपटारा करण्यात आला आहे. काही न्यायालयीन प्रकरणे सुध्दा सामजस्यपणाने सोडविण्यात जिल्हा प्रशासनास यश आले. उर्वरित २० टक्के प्रकरणे कौटूंबिक आसून ते सुध्दा आम्ही मार्गी लावू. कोणत्याही प्रतिष्ठित पदावर काम करत असतांना सामान्य जनतेची सेवा करावी. सामान्य जनतेची सेवा केल्याचे समाधान जीवनभर टिकते. कोणतेही पद जीवनभर टिकत नाही.
समाधान शिबिरामध्ये विविध विभागाचे २१ स्टॉल लावण्यात आले.
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते मागील जनता दरबारा मधील समस्यांचा निपटारा झालेल्या नागरिकांना समाधान प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.