आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस. एरवी इंग्रजी नववर्षाच्या स्वागतापूर्वी अनेकांकडून विविध संकल्प सोडले जातात. तसेच हिंदू नववर्षारंभीही वैयक्तिक आणि सामूहिक उन्नतीसाठी नवसंकल्पाची गुढी उभारायला हवी. हे नवसंकल्प केवळ वैयक्तिक, कौटुंबिक अथवा सामाजिक हिताचेच नाही, तर यात व्यापक राष्ट्रहिताचा संदेशही अनुस्यूत आहे.
भारतीय कालगणनेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला विक्रम संवत 2082चा आरंभ होत आहे. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार हा दिवस आज, रविवार, दि. 30 मार्च 2025 रोजी येतो आहे. भारतीय स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांच्या आठवणी, या पवित्र दिवसाशी जोडल्या गेल्या आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीमुळे पृथ्वी संवत, सृष्टीच्या प्रारंभामुळे सृष्टी संवत, प्रभु श्रीरामांचा राज्याभिषेक, कलियुग संवत, युधिष्ठिर संवत, तसेच विक्रम संवत 2082, शालिवाहन शक संवत 1947, युगाब्द 5127, मालव संवत यांसारख्या कालगणनेतील महत्त्वाच्या घटना या दिवसाशी निगडित आहेत. तसेच, या मंगलदिनी गुढीपाडवा, आर्य समाजाची स्थापना, उगादी, श्री गुरू अंगद देव यांचा जन्मदिवस आणि झूलेलाल यांचा प्रकटदिन यांसारखे प्रेरणादायी प्रसंगही साजरे केले जातात. शक्ती उपासनेचे प्रतीक असलेल्या नवरात्रोत्सवाचा प्रारंभदेखील याच दिवशी होतो. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांचा जन्मही याच पवित्र दिवशी झाला आहे.
भारतीय स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत भारताची प्रगती, आर्थिक समृद्धी आणि निसर्गातील वसंत म्हणजेच सम्यक परिवर्तनाचा संदेश चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून संपूर्ण मानवतेला कायमच मिळतो. भारतीय समाजात वैयक्तिक आणि सामूहिक उन्नतीसाठी, नववर्षाच्या प्रारंभी नवसंकल्प करण्याची परंपरा आहे. या विक्रम संवतच्या आगमन प्रसंगी, आपण हर्षोल्हासात नववर्षाचे स्वागत करतानाच, भविष्यात समाजरक्षणाचा नवीन संकल्पही करण्याचा निर्धारही करूया.
शारीरिक (आरोग्य) : ‘शरीरमाध्यम्खलु धर्म साधनम्’ अर्थात, धर्माचरणासाठी शरीर हेच मुख्य साधन आहे. गाफील राहिल्यामुळे भारतीयांच्या आहारशैलीमध्ये मोठा बदल झाला आहे. यामुळे शरीरातील स्थूलता वाढत आहे. परिणामस्वरूप, अनेक आजारांनी आपल्या शरीराचा ताबा घेतला आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे गंभीर आजारांचे प्रमाण अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना, ‘फिट इंडिया’चा संदेश दिला होता. या नववर्षाच्या निमित्ताने जर आपण दैनंदिन जीवनशैलीत संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग यांना महत्त्वाचे स्थान देण्याचा संकल्प केल्यास, तरच आपले आरोग्य उत्तम राहील. कारण, नागरिकांचे आरोग्य हेच राष्ट्राच्या आरोग्याशीही जोडलेले असते. त्यामुळेच वरील संकल्प हा आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग झाला पाहिजे.
कौटुंबिक : भारतीय समाज चिरंजीव असण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, आपली कुटुंबव्यवस्था! संपूर्ण जग आजमितीला याच भारतीय कुटुंबव्यवस्थेचा अभ्यास करून, तिच्या वैशिष्ट्यांचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय कुटुंब व्यवस्थेमुळे कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये सामूहिकता, सुरक्षितता, परस्पर प्रेम आणि आत्मीयता यांचा विकास होतो. आज जगातील अनेक देशांत कुटुंबव्यवस्था ढासळल्यामुळे, त्यांच्या अर्थसंकल्पाचा मोठा भाग सामाजिक सुरक्षेवर खर्च करावा लागत आहे, तर तुलनेने भारतात ही गरज कमी आहे. म्हणूनच, आपण आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांना सन्मान द्यावा, त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम करावे. कारण, आधीच्या पिढीचे हेच संस्कार, पुढच्या पिढीत आपसूकच दिसतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी वर्षातून एक-दोन वेळा सामूहिक भोजन, भजन आणि विशेष प्रसंगी संपूर्ण कुटुंबाच्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन असे कार्यक्रम करण्याचा संकल्प करावा. यामुळे आपली कौटुंबिक व्यवस्था अधिक सुदृढ आणि बळकट होण्यास सहकार्य होईल.
भाषा शिकूया : आपल्या विस्तीर्ण देशात अनेक भाषा आणि बोली प्रचलित आहेत. या सर्व भाषांमध्ये एक अंतर्निहित ऐक्यही आहे. ते समजण्यासाठी आपण आपल्या मातृभाषेसोबतच, इतर प्रदेशातील एक भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा. यामुळे आपल्याला त्या भाषेतील साहित्य, तत्त्वज्ञान, महापुरुषांचे विचार आणि परंपरा समजण्यास मदत होईल. याचा एक महत्त्वाचा फायदा असा की, आपण राष्ट्रीय ऐक्याच्या बळकटीकरणासाठीही आपला सक्रिय सहभाग देऊ शकतो.
नागरी शिस्त : देशाच्या संविधानाबद्दल आदर आणि श्रद्धा, देशाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी तयार केलेल्या नियमांचे काटेकोर पालन, राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण तसेच, प्रत्येक नागरिकाने कर्तव्यनिष्ठेचे शुद्ध अंतःकरणाने पालन केल्यावरच देशात शिस्त निर्माण होते. नागरिकांमध्ये असलेली हीच शिस्त, कोणत्याही देशाच्या महानतेची ओळख असते. समाजातील पीडित आणि मागास लोकांना शिक्षण, पोषण आणि त्यांच्यातील कौशल्य विकासाने समृद्ध करावे. आपल्या आजूबाजूला घडणार्या घटनांविषयी सजग राहून, समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करावे. नवीन प्रयोग आणि संधी निर्माण करून रोजगार वाढवणे, भारताला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे आणि विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी योगदान देणे, हे प्रत्येक भारतीयाचे ध्येय असले पाहिजे.
संयमित आणि साधी जीवनशैली : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार, खर्च करताना संयम बाळगणे आणि उत्पादनात वाढ करणे, हा मार्ग आपल्या सर्वांसाठीच मार्गदर्शक असाच. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे, हे कोणत्याही समाजात भ्रष्टाचाराला चालना देऊ शकते. आज समाजात एकमेकांकडे पाहून अनावश्यक खर्च करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. लग्नसमारंभ आणि शुभप्रसंगी होणारी अन्नाची नासाडी हे तर प्रत्यक्षात राष्ट्रसंपत्तीचेच नुकसान. यासंदर्भात जागरूकता ठेवत वैयक्तिक जीवनात साधेपणा आणि संयम अंगीकारल्यास, समाजाला योग्य दिशा देता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील अन्नाच्या अपव्ययाविषयी संपूर्ण देशाला वेळोवेळी सजग केले आहे.
महिला सशक्तीकरण : आपल्या धर्मग्रंथांमध्ये स्त्रीला उच्च स्थान देण्यात आले आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ असे म्हणताना, कायमच स्त्रीची पूजा भारतीय संस्कृतीने केली आहे. परंतु, कालांतराने भारतीय समाजात अनेक अन्यायकारी प्रथा सुरू झाल्या. आजही समाजात हृदय पिळवटून टाकणार्या असंख्य घटना घडताना दिसतातच. महिलांवरील हिंसा आणि दुराचाराचा पूर्णतः अंत केला पाहिजे. महिलांना समाजात समान स्थान, समान संधी आणि निर्णयप्रक्रियेत समान सहभाग मिळावा, यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा.
पर्यावरण संरक्षण : "The Earth has enough resources for our need but not for our greed,” हे महात्मा गांधीजींचे प्रसिद्ध वाक्य आहे. परंतु, आजकाल बळावलेली भोगवादी जीवनशैली आणि निसर्गसंपत्तीवर अधाश्यासारखा ताबा मिळवण्याच्या वृत्तीमुळे, आपण पर्यावरणाचा र्हास केला आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रदूषण आणि तापमानवाढीचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या संकटाविषयी अनेक शास्त्रज्ञ आणि पर्यावरण संस्था प्रसिद्ध करत असलेले अहवाल, मानवाच्या चिंतेचा विषय ठरत आहेत. भविष्यात माणसाचे जीवन सुरक्षित राहील का? हा प्रश्नच आता आपल्यासमोर उभा आहे. या नववर्षी आपण आपला जीवनक्रम पर्यावरणपूरक ठेवण्याचा निर्धार करूया आणि पाणी, अन्न, हवा आणि वनस्पती शुद्ध राहतील, यासाठी ठोस पावले उचलूया.
संस्कृती-स्वाभिमान : आपल्या संस्कृतीमध्ये त्यागाचे महत्त्व अधिक असून, सर्वांच्या कल्याणाचा विचार त्यात सामाविष्ट आहे. त्यामुळेच जगात खर्या अर्थाने शांतता नांदवण्याची हमी, भारतीय संस्कृतीच देऊ शकते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस, आपल्याला या सांस्कृतिक गौरवाची आठवण करून देतो. आपण स्वतः करतानाच, येणार्या पिढ्यांमध्येही आपल्या महापुरुषांविषयी अभिमान, आपल्या परंपरांबद्दल आदर जागृत करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला केवळ वैयक्तिकच नव्हे, तर सामाजिक उत्सव बनवताना, स्वतःच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठीही नववर्षदिनी दृढ संकल्प करून या उत्सवाला खर्या अर्थाने सार्थक करूया!
शिवप्रकाश
(लेखक भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सह महामंत्री (संगठन) आहेत.)