ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. धुळे शहरानजीकच्या गोंदूर या लहानशा गावचे मूळ रहिवासी असलेल्या राम सुतार यांची शिल्पकलेतील कामगिरी मात्र जागतिक. प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक भव्य शिल्पकृती सुतारांनी अगदी सूक्ष्म बारकावे टिपून खुबीने साकारल्या आहेत. वयाची 100 वर्षे पूर्ण केलेले राम सुतार हे आजही तितक्याच ऊर्जेने राजधानी दिल्लीत कार्यरत आहेत. अशा या सातासमुद्रापार भारतीय शिल्पकलेला सन्मान प्राप्त करुन देणार्या राम सुतार यांच्याशी आज हिंदू नववर्षारंभानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद...
आपले बालपण हे धुळ्यातल्या गोंदूर गावात गेले. बालपणीचे दिवस कसे होते?
धुळे शहराला अगदी लागूनच असलेले गोंदूर हे माझे गाव. माझा जन्म 1925 सालचा. माझे वडील सुतार आणि लोहारकामात पारंगत होते. त्यामुळे लहानपणापासूनच सुतारकाम, लोहारकामाशी माझा परिचय झाला. अनेकदा वडिलांसोबत त्यांच्या कामाच्या ठिकाणीही मी जात असे. इयत्ता चौथीपर्यंत मी तेथेच शिकलो. त्यानंतर पाचवीसाठी जवळच्याच निमडाळे गावात मी जात असे. पुढे सहावीसाठी मी आर्वी मोगल या गावात आलो.
त्याची तर एक कहाणीच आहे. मला गोंदूरमध्ये शिकवणार्या शिक्षकांची मी सेवाही करत असे. त्यामुळे त्यांनी विचार केला की, विद्यार्थी अतिशय हुशार आहे, याला आपल्यासोबतच बोलावून घ्यावे, जेणेकरून त्याच्या शिक्षणाची आबाळ होणार नाही. त्यामुळी पुढचे शिक्षण घेण्यासाठी मी धुळे शहरात चालत चालत आलो. योगायोगाने धुळ्यात माझ्या बहिणीच्या यजमानांचे भाऊ मला भेटले. त्यांनी माझी चौकशी करून त्यांच्या मावस बहिणीकडे मला नेले. मग उमराणकर कुटुंबाने माझी चौकशी केली आणि त्यांच्या घरीच मला ठेवून घेतले.
शाळा, चित्रकला आणि ‘जे.जे.स्कूल ऑफ आर्ट’ हा प्रवास कसा होता?
सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर मी इंग्रजी शाळेत जाऊ लागलो. तेथे चित्रकला हा विषय आम्हाला होता. इंग्रजी शाळेत आम्हाला श्रीरामकृष्ण जोशी नावाचे शिक्षक होते. ते चित्रकला अतिशय छान शिकवत असत. मी त्यांना जाऊन भेटलो आणि माझी कामे त्यांना दाखवली. त्यांना ते फार आवडले. त्यांना मला एकदा महात्मा गांधींचा पुतळा बनविण्यास सांगितले. त्यांच्या सुचनेनुसार मी तो पुतळा बनवला. ही गोष्ट आहे 1948 सालची. जोशी सरांनीच मला ‘जे.जे.स्कूल ऑफ आर्ट’मध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यांचे एक नातेवाईक माटुंगा येथे राहात असत. त्यांच्याकडे माझी राहण्याची सोयही करून दिली. जे.जे.स्कूलमध्ये माझे काम पाहून मला थेट डिप्लोमाच्या दुसर्या वर्षाला प्रवेश देण्यात आला. त्यानंतर पाच वर्षांचा अभ्यासक्रम मी चार वर्षांत पूर्ण केला. प्रत्येक वर्षी मी पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो आणि ‘मेओ मेडल’ही मी प्राप्त केले.
तुमच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात कशी झाली?
मुंबईमध्ये एलिफंटा अर्थात घारापुरीच्या लेणी आहेत. तेथे मी अनेकदा जात असे. त्यामुळे भारतीय लेण्याविषयी मला अतिशय जवळून अभ्यास करता आला. पुढे योगायोगाने ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणा’तर्फे (एएसआय) मला बोलावणे आले आणि अजिंठा-वेरूळ येथील लेणी दुरुस्तीच्या कामामध्ये मला सामील करून घेण्यात आले. त्यानिमित्ताने 1954 ते 1958 सालची अशी सलग चार वर्षे वेरूळच्या लेणी दुरुस्तीच्या कामात मी होतो.
महाराष्ट्रातून पुढे देशाच्या राजधानीत अर्थात दिल्लीत कसे आलात?
1959 साली केंद्र सरकारच्या जाहिरात आणि दृश्य प्रसिद्धी संचालनालय अर्थात ‘डीएव्हीपी’मध्ये ‘प्रदर्शनांसाठी तांत्रिक साहाय्यक’ असे पद रिक्त असल्याचे मला समजले. त्यासाठी मी अर्ज केला. त्यात माझी निवडही झाली आणि मी दिल्लीत आलो.
दिल्ली आणि शिल्पकला हा प्रवास कसा सुरू झाला?
‘डीएव्हीपी’द्वारे आयोजित होणार्या विविध प्रदर्शनांसाठी मी काम केले. अर्थात, हे सर्व होत असतानाही माझी मूळ शिल्पकलेची आवड मला शांत बसू देत नव्हती. त्यामुळे मी विविध शिल्पे तयार करतच असे. दिल्लीत त्याचदरम्यान कृषी विभागाचे एक प्रदर्शन होते. त्यावेळी माझ्या विभागातील मंडळींना माझ्या शिल्पकलेविषयी माहिती होतीच. त्यांनी मला या प्रदर्शनासाठी शेतकर्यांशी संबंधित एखादे शिल्प बनवता आले तर पाहा, अशी सूचना केली. त्यानुसार, मी प्रगती मैदानात होणार्या त्या प्रदर्शनस्थळी जाऊन आयोजकांना माझे काम दाखवले आणि त्यांना अर्थातच ते खूप आवडले. त्यांनी मला मुख्य प्रवेशद्वारासाठी दोन शिल्पे करण्याचे काम दिले. मात्र, त्यावेळी मी ‘डीएव्हीपी’मध्ये काम करत होतो. तेथे काम करताना मला दुसरे काम करता येणार नाही, असा नियम वरिष्ठांनी सांगितला. त्यामुळे मी अखेरीस माझ्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ शिल्पकलेसाठी काम करू लागलो.
दिल्लीत तुमची शिल्पकला कशी बहरली गेली?
दिल्लीत मी पूर्णवेळ शिल्पकला सुरू केली. त्याचदरम्यान जोगळेकर नावाच्या एका स्थापत्य अभियंत्यांशी माझा परिचय झाला. त्यावेळी संसदेत असलेले ब्रिटिशांची प्रतीके हटवून त्याजागी अशोकस्तंभ लावण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. हे काम मला जोगळेकरांच्या सहकार्याने मिळाले. त्यासाठी सहा फुटांचा अशोकस्तंभ आग्र्याहून विशिष्ट दगड आणून कोरला. अर्थात, हे काम सोपे नव्हते. त्यासाठी 30 ते 40 फुटांचे मचाण प्रथम बांधावे लागले. त्यानंतर भिंतीत असलेली ब्रिटिश प्रतीके काढणे आणि नंतर त्याच जागेत अशोकस्तंभ बसविणे अशी प्रक्रिया करावी लागली. अर्थात, हे काम करत असतानाच देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याशी माझा परिचय झाला. माझे काम सुरू असताना ते संसदेत आले होते. त्यावेळी त्यांनी माझ्याजवळ येऊन माझी आणि कामाची चौकशी केली. या कामासाठी मला तीन हजार रुपये मिळाले होते.
पुढे गोविंद वल्लभ पंत यांचा दहा फूट उंचीचा कांस्य पुतळा मी उभारला. व्यावसायिक शिल्पकार म्हणून हा माझा पहिलाच पुतळा होता. त्यासाठी दिल्लीतील ‘साऊथ एक्सटेन्शन’मध्ये एक घर भाड्याने घेतले आणि त्याच्या अंगणात पुतळ्यावर काम केले होते. हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यानंतर दिल्लीतल्या इंडिया गेटवरील कॅनोपीमधील पंचम जॉर्जचा पुतळा काढून तेथे महात्मा गांधी यांचा पुतळा बसविण्याचे सरकारतर्फे ठरविण्यात आले होते. तो पुतळा बनविण्याचीही संधी मला मिळाली. त्यासाठी मी दोन पुतळे तयार केले. पहिला म्हणजे, गांधी उभे असलेले आणि दुसरा म्हणजे, ध्यानमुद्रेत बसलेले. अर्थात, त्यावेळी ब्रिटिशांनी उभारलेल्या कॅनोपीमध्ये महात्मा गांधी यांचा पुतळा बसविणे योग्य ठरणार नसल्याचा मतप्रवाहही होता. परिणामी, कॅनोपीमध्ये महात्मा गांधींचा पुतळा बसवू नये, अशा निष्कर्षाप्रत सरकार आले. त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. अर्थात, त्यानंतर ध्यानमुद्रेतील महात्मा गांधी यांचा पुतळा आता देशाच्या संसदेत स्थापन करण्यात आला असून, तो जागतिक आकर्षण ठरला आहे. पुढे देशाच्या संसदेत मला पं. नेहरू, सरदार पटेल, इंदिरा गांधी, मौलाना आझाद असे जवळपास 16 पुतळे साकारण्याची संधी मला मिळाली आणि मी दिल्लीत खर्या अर्थाने स्थिरावलो.
जगातील सर्वांत उंच ठरलेल्या गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा भव्य पुतळा साकारतानाच्या आठवणींविषयी काय सांगाल?
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक उभारण्यास प्रारंभ केला होता. त्यासाठी सरदार पटेल यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा (159 मीटर्स) उभारावा, अशी त्यांची योजना होती. त्यातही एक वैशिष्ट्य होते. सरदार पटेल यांनी देशातील 600 हून अधिक संस्थाने एकत्र करून देशाला एकसंध केले होते. त्यामुळे त्यांचा भव्य पुतळाही तशाच प्रकारे 600 भाग जोडून तयार करण्याची कल्पना होती. त्यासाठी देशात विविध शिल्पकारांनी तयार केलेले सरदार पटेलांचे पुतळे अभ्यासण्यात आले. त्यामध्ये मी केलेला पुतळा सर्वांच्या पसंतीस उतरला आणि सरदार पटेलांचा भव्य पुतळा मी साकारणार; हे निश्चित झाले.
काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वच जण कामाला लागलो होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात पुतळ्याचे कास्टिंग भारतात करणे शक्य नव्हते. त्यासाठी ते काम परदेशात करण्याचा निर्णयही आम्ही घेतला. त्यानुसार, पुतळ्याचे 90 टक्के काम आम्ही भारतात पूर्ण केले आणि उर्वरित दहा टक्के काम परदेशात करून घेतले.
सरदार पटेलांच्या पुतळ्यासह आणखीन काही भव्य पुतळेही आपण साकारले आहेत.
होय, अरबी समुद्रात प्रस्तावित असलेल्या शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (122 मीटर्स) साकारण्याची संधी मला मिळाली आहे. त्याचप्रमाणे इंदू मिल येथील ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही पुतळा (106.68 मीटर्स) साकारला आहे. त्याचप्रमाणे, प्रभू श्रीरामचंद्रांचा अयोध्या येथील 183 मीटर्सचा पुतळादेखील साकारण्याचे भाग्य मला लाभले आहे.
एकूणच भारतातील शिल्पकला-मूर्तिकला याकडे तुम्ही कसे बघता?
शिल्पकलेत भारतात पूर्वीच्या पिढीने जे काम केले आहे, ते अनन्यसाधारण आहे. अर्थात, त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी हवी. भारतातील मंदिरे असतील, लेणी असतील; हे सर्व बघितल्यावर शिल्पकलेचे मूळ भारतच असल्याचे जाणवते. भारतातील मंदिरांचे कोरीव काम, अखंड पाषाणातून साकारलेले वेरूळचे कैलास लेणे, हे सर्व अतिशय प्रेरणादायी आहे. जगात अशी कामे अन्य कोणत्याही देशात झालेली दिसत नाहीत. त्यामुळे अर्थातच भारतीय शिल्पकलेचे भवितव्य उज्ज्वलच आहे.
मुळात एखादे शिल्प साकारताना त्यासाठी तयारी कशी सुरू होते? नेमकी कोणकोणती आव्हाने असतात?
कोणत्याही व्यक्तीचे शिल्प साकारण्यापूर्वी मी त्या व्यक्तीचा संपूर्ण अभ्यास करतो. त्याचे कार्य, त्याच्या सवयी, त्याची बोलण्याची पद्धती, त्याची हसण्याची पद्धत, त्याची विचार करण्याची पद्धती आदि. उदाहरणार्थ, महात्मा गांधींचा पुतळा साकारायचा असेल, तर ते नेहमी देत असलेले शांतीचा संदेश, त्यांची ध्यानास बसण्याची पद्धत हे बघून त्यांचा चेहरा कसा असेल, डोळे कसे असतील, याचा अभ्यास मी करतो. कारण, चेहर्यातील अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म हावभावही शिल्पामध्ये उतरविण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे, सरदार पटेल म्हटले की करारीपणा, पं. नेहरू म्हटले की विचारवंत आणि इंदिरा गांधी म्हटले की ‘एकला चलो रे...’ अशा विविध बाबींचाही अभ्यास मी करतो. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी सामाजिक क्रांती भारतात घडवली, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या शिल्पामध्ये कसे येईल; याचाही मी विशेष अभ्यास केला.
शिल्पकारांच्या नव्या पिढीस तुम्ही काय संदेश द्याल?
अलीकडे लोक मेहनत करण्यास तयार नाहीत, असे मला दिसते. ‘मॉर्डन आर्ट’ म्हणून एक प्रकार अशा मेहनत न करणार्या मंडळींनी निर्माण केला की काय, असे त्यामुळे वाटते. कारण, ‘मॉडर्न आर्ट’च्या नावाखाली थोडक्यात काहीतरी करायचे आणि त्यास ‘शिल्पकला’ म्हणायचे, असे प्रकार होताना दिसतात. मात्र, हा प्रकार म्हणजे फसवणूक असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. अर्थात, यामध्ये काही सन्माननीय अपवादही आहेत. त्यामुळे नव्या पिढीने भारतीय शिल्पकारितेचा देदीप्यमान वारसा अभ्यासून मेहनत करणे, अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पैशांसाठी नव्हे, तर तुमची पॅशन जपण्यासाठी काम करा, असे मी नव्या कलाकारांना नेहमी सांगत असतो.
‘पद्म’ सन्मान
शिल्पकार राम सुतार यांना यापूर्वी दि. 23 मार्च 1999 रोजी ‘पद्मश्री’ आणि दि. 12 एप्रिल 2017 रोजी ‘पद्मभूषण’ या नागरी सन्मानांनी केंद्र सरकारतर्फे गौरविण्यात आले आहे.
सातवीत असताना साकारले पहिले शिल्प
“मी सातवीत असतानाची गोष्ट. त्यावेळी शाळेत आम्ही दगडी पाटी वापरत असू. तर त्या पाटीवर कोरीवकाम करून मी भवानीमाता छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भवानी तलवार’ देत आहे, असे शिल्प तयार केले होते. ते माझे पहिले शिल्प, ते मी अजूनही जपून ठेवले आहे. विशेष म्हणजे, तेव्हा आमच्या जोशी गुरूजींनी ते शिल्प मुंबईत एका प्रदर्शनात पाठवले होते आणि मला त्यासाठी रौप्यपदकही मिळाले होते. तेव्हापासून मी खर्या अर्थाने शिल्पकलेकडे ओढला गेलो.”
सुतार म्हणजे सूत्रधार!
“आम्ही सुतार आहोत. सुतार म्हणजे सूत्रधार, ज्याच्या हाती सूत्र आहेत तो! त्यामुळे माझ्या अंगातील कला ही आमचा वारसाच आहे, असे मी मानतो. त्यामुळे लोहकाम, सुतारकाम, स्थापत्त्य हा आम्हा सूत्रधारांचा वारसा. माझे वडील सुतारकाम आणि लोहारकाम करत असत. मी लहानपणापासून त्यांचे काम बघत असे. त्यामुळे आमच्या कामातील हत्यांरांशी माझा लहानपणापासूनच संबंध आला. त्यामुळे आपसूकच माझ्या अंगात ही कला आली.”