माधव नेत्रालय : एक सेवा प्रकल्प

    29-Mar-2025
Total Views |

Madhav Netralaya
 
वर्ष प्रतिपदा तथा गुढीपाडव्याचे औचित्य साधून आज रविवार, दि. 30 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नागपूर येथे ‘माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर’चा शिलान्यास होणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख पाहुणे म्हणून यांची विशेष उपस्थिती असेल. त्यानिमित्ताने ‘माधव नेत्रालय’ व नेत्रालयाच्यावतीने चालणार्‍या इतर काही सेवा प्रकल्पांचा घेतलेला हा आढावा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य ‘श्रीगुरूजी’ यांच्या पवित्र स्मरणार्थ शनिवार, दि. 25 फेब्रुवारी 1995 रोजी (विजया एकादशी) ‘माधव नेत्रालय’ या सामाजिक प्रकल्पाचा शुभारंभ झाला. ‘माधव नेत्रपेढी’चे काम सुरळीतपणे सुरू होते. पण, कॉर्निया संकलन आणि कॉर्निया प्रत्यारोपणासाठी नेत्र रुग्णालयाची कुठेतरी गरजदेखील भासत होती. त्यामुळे 2014 साली तत्कालीन मा. सरकार्यवाह सुरेश (भैय्याजी) जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना झाली.
 
‘माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून संस्थेचा पहिला सेवा प्रकल्प ‘माधव नेत्रालय सिटी सेंटर’ ज्याचा शुभारंभ दि. 18 मार्च 2018 रोजी पुरुषोत्तम भवन, गजानन नगर टी पॉईंट जवळ, वर्धा रोड, नागपूर येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला. तसेच, ‘माधव नेत्रालया’चा दुसरा सेवा प्रकल्प ‘माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर’ ज्याचे उद्घाटन दि. 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडव्याच्याच दिवशी वासुदेव नगर, हिंगणा रोड, नागपूर येथे करण्यात आले.
 
सेवाभाव आणि जनसेवेच्या भावनेने ‘माधव नेत्रालय’ मध्य भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक नेत्रसेवा आणि नवनवीन आधुनिक उपकरणे, तसेच आधुनिक व्यवस्थापनेसह उच्च श्रेणीतील नेत्र तज्ज्ञांच्या सेवेद्वारे सर्व प्रकारच्या नेत्र शस्त्रक्रिया प्रदान करीत आहे.
 
माधव नेत्रालयास विशेष रूपाने सन्मानित करण्यात आले आहे, जसे की,
आधुनिक पर्यावरण हरित भवन-‘बीएमएस’सह प्रस्तावित ‘प्लॅटिनम ग्रीन बिल्डिंग’ प्रमाणित
‘आयएसओ 9001 : 2015’ द्वारे प्रमाणित
‘नॅशनल एक्रेडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अ‍ॅण्ड हेल्थ केअर’द्वारे प्रमाणित
महाकुंभ मेळा, प्रयागराज (2019) आणि कुंभमेळा, हरिद्वार (2021) येथे आयोजित नेत्रकुंभामध्ये नागपूरच्या ‘माधव नेत्रालया’ने सहभाग घेतला होता. त्याचबरोबर विशेष सहकार्याकरिता त्यास सन्मानितही करण्यात आले होते.
 
दि. 8 एप्रिल 2021 रोजी ‘माधव नेत्रालय सिटी सेंटर’ यास ‘सीएसआर एक्टिव्हिटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट’ (क्रियाकलाप नोंदणी प्रमाणपत्र) प्राप्त झाले
 
‘अल्ट्राटेक सिमेंट’द्वारे ‘प्रथम काँक्रीट बिल्डिंग’ पुरस्कार’
विश्वस्तरीय देणग्या प्राप्त केल्याबद्दल विशेष प्रमाणपत्र प्राप्त
 
वैशिष्ट्ये आणि सुविधा
 
‘ब्लेडलेस रिफ्रैक्टिव’ शस्त्रक्रियेसह अत्याधुनिक फेम्टोसेकन्ड लेझर वैद्यकीय सुविधा
लेझरद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, उपचार
काचबिंदू (ग्लुकोमा) उपचार केंद्र
माधव नेत्र बँक व कॉर्निया प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
रेटिना, व्हिट्रीयस आणि पोस्टरियर सेगमेन्ट रोगांवर अत्याधुनिक उपचार
बाल व शिशु नेत्र उपचार केंद्र
अत्याधुनिक पॅथोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी सेवा
फार्मसी, ऑप्टिकल शॉप आणि कॅन्टीन सुविधा
समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी अनुदानित आणि मोफत उपचार
 
केंद्र सरकारची आरोग्य योजना
 
‘कर्मचारी राज्य विमा महामंडळा’मार्फत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी वैद्यकीय सुविधा
‘मँगनीज ओर (इंडिया) लिमिटेड’द्वारे वैद्यकीय सुविधा
 
एसबीआय जनरल इन्शुरन्ससाठी तरतूद
 
‘स्टार हेल्थ इन्शुरन्स’, ‘एमडी इंडिया हेल्थ इन्शुरन्स’, ‘हेल्थ इन्शुरन्स टिपीए ऑफ इंडिया लि.’ आणि ‘चोला मंडलम् जनरल इन्शुरन्स’द्वारे वैद्यकीय सुविधा.
 
‘माधव नेत्रालय’ विविध सामुदायिक सेवा प्रकल्पांद्वारे नेत्ररुग्णांची सेवा करते, ज्यामध्ये नेत्ररुग्णांना पुढील केंद्रांद्वारे नेत्र तपासणी आणि नेत्र उपचार देऊन त्यांचे जीवन स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
1) माधव नेत्रपेढी (माधव नेत्र बँक)
2) रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी केंद्र (आरओपी)
3) अल्पदृष्टी मूल्यांकन केंद्र
4) दृष्टिहीन पुनर्वसन केंद्र
 
माधव नेत्रपेढी (माधव नेत्र बँक)
 
‘माधव नेत्रपेढी प्रकल्प’ हा राष्ट्रीय स्तरावर सक्षम असलेल्या संस्थेचा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणून सेवा देत आहे. आम्हाला हे सांगताना आनंद होतो आहे की, ‘माधव नेत्रपेढी’ हा ‘माधव नेत्रालया’चा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. याद्वारे नेत्र (कॉर्निया) संकलन, मूल्यमापन आणि यशस्वीपणे प्रत्यारोपणाचे कार्य पूर्णतः निःशुल्क केले जाते. ‘माधव नेत्रालया’च्या माध्यमातून झालेल्या कॉर्नियल प्रत्यारोपणानंतर अनेकांना दृष्टी परत मिळाली आहे.
 
नेत्रदान खरंतर मृत्यूपश्चात केले जाणारे दान. शरीराबरोबर डोळे जाळण्याऐवजी किंवा ते पुरण्याऐवजी त्याचे दान केले, तर लाखो लोकांना कॉर्निया प्रत्यारोपणासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागणार नाही आणि त्यांचे आयुर्मानही वाढेल. त्यामुळे ‘माधव नेत्रालय’ परिवाराने असे आवाहन केले आहे की, प्रत्येक व्यक्तीने किंवा संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन नेत्रदानाचे संकल्प पत्र भरून आपल्या जवळच्या नेत्रपेढीत त्याची नोंद करून ठेवावी. ‘माधव नेत्रालय’ प्रत्येक नेत्रदात्याला नेत्रदान प्रतिज्ञा कार्ड आणि अभिनंदन पत्र प्रदान करते. नेत्रदानाचे कार्ड नेहमी सोबत ठेवावे आणि अभिनंदन पत्र घरात योग्य ठिकाणी ठेवावे, जेणेकरून भविष्यात इतरांना ते वाचून त्यातून प्रेरणा मिळेल.
 
रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी केंद्र (आरओपी)
 
‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’ (आरओपी) हा संभाव्य रूपे अधत्व आणणारा एक नेत्रविकार आहे, जो अकाली जन्मलेल्या बाळांवर विशेषतः परिणाम करतो. खासकरून ती मुले जी गर्भधारणेच्या 32 आठवड्यांपूर्वी जन्मलेली असतील किंवा जन्मावेळी ज्यांचे वजन दोन किलोपेक्षा कमी आहे.
 
‘आरओपी’मध्ये, रेटिनामध्ये रक्तवाहिन्यांची असामान्य वाढ होत असते, ज्यावर वेळेत उपचार न केल्यास संभाव्य अंधत्वाच्या अडचणी वाढू शकतात.
 
‘आरओपी’ प्रकल्पाचे उद्दिष्ट
 
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट हे ‘आरओपीमुक्त विदर्भ’ करणे आहे. हे साध्य करण्यासाठी पुढील काही उपायांद्वारे प्रयत्न केले जात आहेत :
 
जन्माच्या 30 दिवसांपूर्वी नवजात मुलांमध्ये ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’ची तपासणी करणे
नवजात अतिदक्षता विभाग (एनआयसीयू)मध्ये ‘प्रीमॅच्युरिटी’च्या ‘रेटिनोपॅथी’चा उपचार
‘रेटिनोपॅथी’ने ग्रस्त मुलांचे योग्य वेळेपूर्वीच पुनर्वसन
 
‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’च्या तपासणीकरिता नेत्ररोग तज्ज्ञ आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण
अल्पदृष्टी मूल्यांकन केंद्र
 
अल्पदृष्टी केंद्र ‘माधव नेत्रालय’ आणि समदृष्टी, क्षमता विकास तसेच अनुसंधान मंडल (सक्षम) यांचा एक संयुक्त उपक्रम आहे. ‘सक्षम’ ही एक राष्ट्रीय संस्था आहे, जी सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक अपंग व्यक्तींच्या सेवा आणि विकासासाठी समर्पित आहे.
 
विदर्भातील हे एकमेव अल्पदृष्टी सुधार केंद्र आहे, जे अल्पदृष्टी असलेल्या रुग्णांचे मूल्यमापन आणि पुनर्वसनासाठी कार्य करते. अल्पदृष्टी ही अशी स्थिती आहे, जी चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स, औषधे किंवा शस्त्रक्रियेने दुरुस्त केली जाऊ शकत नाही. अल्पदृष्टीमुळे नेत्ररुग्णांना डोळ्यांच्या विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रकारचे चष्मे किंवा इतर उपकरणांच्या साहाय्याने उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो.
 
दृष्टिहीन पुनर्वसन केंद्र
 
दृष्टिहीन पुनर्वसन केंद्रांतर्गत दृष्टिहीन व्यक्तींना स्वतंत्रपणे जीवन जगता यावे, यासाठी अशी काही उपकरणे त्यांना उपलब्ध करून दिली जातात, जेणेकरून त्यांना आपल्या अभ्यासात मदत केली जाते. तसेच, त्यांचे समुपदेशनही केले जाते. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याकरितासुद्धा विशेष मदत केली जाते. तसेच, नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करून अल्पदृष्टी संबंधित सेवा पुरवल्या जातात.
 
श्रद्धा बडकस
माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूरचे ब्रीदवाक्यच आहे... ‘राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदं न मम।’
(लेखिका ‘माधव नेत्रालया’च्या अधिकारी आहेत.)