मुंबई: ( MMRDA presents budget of Rs 40,187 crore ) ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’चा सन २०२५-२६ साठीचा ४० हजार, १८७.४१ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवार, दि २८ रोजी ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सादर केला.
मुंबई महानगर प्रदेशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार, १५१.१४ कोटी म्हणजेच एकूण खर्चाच्या सुमारे ८७ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. ही तरतूद मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, नवीन बोगदेमार्ग, सागरी मार्ग, जलस्रोत विकास आणि नागरी पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीने आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजात सन २०२५-२६ साठी ३६ हजार, ९३८.६९ कोटी महसूल अपेक्षित आहे.
उपमुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे अर्थसंकल्पाला मान्यता देताना म्हणाले की, “मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण व गतिमान विकास ही आमची सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. ‘एमएमआरडीए’च्या योजनांमुळे मुंबई जागतिक आर्थिक केंद्र म्हणून पुढे येईल. ‘एमएमआरडीए’ने सादर केलेला वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प हा दूरदृष्टी असलेला, व्यापक आणि मुंबई महानगर प्रदेशाचा बहुआयामी विकास साधणारा दस्तऐवज आहे.”
प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले की, “एमएमआरडीए’चा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा दस्तऐवज नसून मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्याचा आराखडा आहे.३५ हजार कोटींपेक्षा अधिक निधी थेट प्रकल्पांसाठी आहे. मेट्रो मार्ग विस्तार, भुयारी मार्ग, जलस्रोत विकास, नवे व्यापार केंद्र हे सर्व मुंबईमहानगर प्रदेशाच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.”