मुंबई: ( Hindu New Year rally ) लालबाग, परळ आणि काळाचौकी या गिरणगाव विभागातील ‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्यावतीने हिंदू नववर्ष शोभायात्रेत यंदा मराठी भाषा ’स्व’त्वाच्या अस्मितेचे आणि संस्कृतीचे प्रतीक यांचा जागर होणार आहे. रविवार, दि. ३० मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त होणार्या या शोभायात्रेत पारंपरिक प्रात्यक्षिकांसह अनेक चित्ररथांचा सहभाग असणार आहे.
सकाळी ८ वाजता परळ येथील श्री स्वामी समर्थ मठातून या नववर्ष स्वागताच्या शोभायात्रेची सुरुवात होणार आहे आणि ’गिरणगावाचा राजा’ चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुक्ता जयहिंद सिनेमागृह येथे समारोप होणार आहे. या शोभायात्रेत शिवकालीन देखावा (गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान लालबाग - परळ), अभिजात मराठी (स्वयंसिद्धा महिला मंडळ परळ), हिंदुपदपातशाही (आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ), अमृत गोडी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी (’आपली सोसल वाहिनी’ अर्थात आसोवा - मराठी युट्यूब चॅनेल), एकमेकां साहाय्य करू। अवघे होऊ श्रीमंत॥ (मराठी उद्योजक - सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट) असे चित्ररथ असणार आहे. तसेच ’भारतमाता पालखी’, पथनाट्य (आसोवा - मराठी युट्युब चॅनेल) महाराष्ट्रातील दांडपट्टा, लाठीकाठी अशा पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके, मल्लखांब, ढोलताशा हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे.
या शोभायात्रेत ‘भारतीय कबड्डी महिला संघा’ची कर्णधार सोनाली शिंगाटे आणि अभिनेता चंद्रकांत ऊर्फ बंटी कानसे यांना ‘गिरणगाव भूषण‘ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’चे अध्यक्ष शशिकांत दळवी यांनी केले आहे.