भारताचा सांस्कृतिक वारसा हा तिमिराकडून तेजाकडे नेणारा अद्भुत प्रवास. या धार्मिक, सांस्कृतिक वारशाच्या प्रतिकांमधील एकी आणि त्यातून प्रतित होणारा आशावादी, प्रेरणादायी विचारांचा अंत:प्रवाह हा थक्क करणारा आहे. या अंत:प्रवाहाला समृद्ध करणारा उत्सव म्हणजे हिंदू नववर्ष होय. चला नववर्षाचे स्वागत करूया...
प्रभू श्रीरामचंद्रानी बालीचा वध करून सज्जनशक्तीचा विजय केला. तसेच, ब्रह्मानेही सृष्टी निर्माण केली, तो हाच दिवस... यानिमित्ताने हिंदू समाज नववर्ष साजरे करतो. महाराष्ट्राचा ‘गुढीपाडवा’, गोव्याचा ‘संवत्सर पाडवो’, उत्तर भारतासह गुजरातचा ‘चैत्र नवरात्री उत्सव’, दक्षिण भारतातील ‘उगादी’, काश्मीरमध्ये ‘नवरेह’, मणिपूरमध्ये ‘साजिबू नोंगमा पानबा’, पंजाबमध्ये ‘वैशाखी’, प. बंगालमध्ये ‘पोहला बैशाख’ आणि अशाच प्रकारे देशभरात विविध राज्यांत विविध नावाने साजरे होणारे हे हिंदू नववर्ष. याबाबत इंडोनेशिया देशातील हिंदूबहुल बाली बेटमध्ये हिंदू नववर्ष कसे साजरे करतात? तर आपल्या महाराष्ट्रात जेव्हा गुढीपाडवा असतो, तेव्हा बाली बेटामध्ये गावात अग्नी पेटवला जात नाही. वीज बंद केली जाते. त्यामुळे विजेची उपकरण आणि मोबाईलही बंद. घरातले कुणीही बाहेर जात नाही. सगळी यातायात बंद. सार्वजनिक आणि खासगी वाहनांना विश्रांती. अन्न शिजवले जात नाही. आदल्या रात्रीच स्वयंपाक बनवून तो त्या दिवशी ग्रहण करतात. सगळ्यांनी मौनव्रत ठेवायचे. अगदी त्या दिवशी त्या परिसरावरून विमान, हेलिकॉप्टर वगैरेही जात नाहीत. सगळीकडे शांतीच शांती... लोक केवळ निसर्गाचा ध्वनी ऐकतात. मौनासोबतच ध्यानधारणा करतात आणि हिंदू नववर्षाचे स्वागत करतात. इंडोनेशिया देशाच्या एकमेव हिंदूबहुल बेटावर असा गुढीपाडवा साजरा होतो. या सणाला तिथे ‘न्येपी’ म्हणतात. अंतर्बाह्य स्वतःला शुचिर्भूत करून निसर्गाच्या लयीनुसार जगण्यास योग्य करणे, अशीही बालीतल्या हिंदूंची नववर्ष संकल्पना. या ‘न्येपी’ सणाची सुरुवात तिथे दोन दिवस आधीपासून होतो. त्या आधी ‘मेलास्ती’ आणि ‘मेकारू’ उत्सवाची तयारी असते. ‘मेलास्ती’ समारोहामध्ये लोक समुद्र तटावर जातात. पवित्र जलाची पूजा करतात. मानवी शरीर आणि पृथ्वी दोघांवरची नकारात्मक ऊर्जेचा नाश व्हावा, म्हणून हे करतात. त्यानंतर दुसर्या दिवशी ‘मेकारू’ समारोह असतो. आपल्याकडे जसे ‘दशावतार’ किंवा ‘बोहाडा’ असतो, तशाच पद्धतीचे पौराणिक मुखवटे घातले जातात. हे मुखवटे घातलेल्या लोकांची मिरवणूक होते, त्याला ‘ओगोह ओगोह’ म्हणतात. या मुखवटे घालणार्या लोकांची मिरवणूक का काढली जाते? तर त्यांना पाहून परिसरातील नकारात्मक शक्ती दूर जाईल. मग त्यानंतर ‘न्येपी’ म्हणजे हिंदू नववर्ष साजरे करायचे.
बाली बेटातील हिंदूचे नववर्ष त्यातील रितीरिवाज पाहून चटकन आठवण येते, ती पालघर जिल्ह्यातील काही आदिवासीबहुल गाव-पाड्यांची. इथे गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा या दिवसाच्या आगेमागे ‘बोहाडा’ उत्सव साजरा केला जातो. संध्याकाळ झाली, शेतीभातीतून कामातून लोक घरी परतले की, मग त्यातले नेमाने ठरलेले लोक देवदेवतांचे निसर्गप्रतीकांचे आणि अगदी राक्षसाचेही मुखवटे घालतात. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचाही मुखवटा घातला जातो. त्यावेळी ते म्हणजे मुखवटा धारण केलेल्या प्रतीकांचे सजीव रूपच बनतात. मग मुखवटाधारी लोकांची मिरवणूक रात्रभर संपूर्ण गावातून फिरते. पहाटे पहाटे ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये ही मिरवणूक येते. पूजा प्रार्थना होते. ग्रामदेवतेच्या पूजनाने अमंगल दूर झाले, आता नव्या मंगल काळाची सुखाची सुरुवात होणार, असे संकल्पित केले जाते, तर मध्य प्रदेशाच्या दुर्गम खेड्यापाड्यात गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीरामासह हनुमान आणि सगळी सेना तसेच, रावणाचाही मुखवटा घालून मिरवणूक काढली जाते. मग प्रभू रामाचे आणि रावणाचे तुंबळ युद्ध होते. त्यात रावणावर प्रभू राम मात करतात, विजयी होतात. मग सारा गाव हर्षोल्लास करत रामराज्याचे स्वागत करतो. थायलंडमधला मुखवटे घालून नकारात्मक शक्तींचा विनाश करून मंगल शक्तींची स्थापना करणारा ‘न्येपी’ नावाचा गुढीपाडवा काय आणि आपल्या पालघरचा ‘बोहडा’ काय? या सगळ्यांमध्ये संदेश आहे तो नकारात्मक ऊर्जा, दुष्ट शक्ती यांचा विनाश करून मांगल्य, सुखाच्या नववर्षाचे स्वागत करणे. भारताच्या धर्मसंस्कारांची, निसर्ग संवर्धनाची आणि पूजनाची आणि या सगळ्यात्ाून समृद्ध होत गेलेल्या भारतीयत्वाची साक्ष देणारा उत्सव म्हणजे हिंदू नववर्ष दिन होय. आक्रमक विनाशी मुस्लीम आक्रमणकर्त्यांनी आणि त्यानंतर इंग्रजांनी या देशातील हिंदूंची वाताहत करण्याचा चंग बांधला असतानाही आपल्या पूर्वजांनी हे सण-उत्सव रितीरिवाज कसे बरे जपले असतील? आज नागरी भागांत किंवा सधन कुटुंबातच गुढीपाडवा साजरा होतो का? तर नाही. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये हातावर पोट घेऊन चालणार्या बांधवाच्या घरीही या नववर्षाचे स्वागत होतेच होते. गुढी उभारण्यासाठी साहित्य नसले, तरी प्रतिकात्मक गुढी उभारून सण गोड केला जातोच. नवे वर्ष नव्या आशा, सुख, समाधान घेऊन येईल, या स्वप्नांनी दिवस साजरा होतो.
पण, नेहमीप्रमाणे हिंदूंच्या कोणत्याही घटनेवर अतर्क्य, पण समाजात भेद पाडणारे विकृत विचार करणारे आणि विधान करणारे विघ्नसंतोषी विकृत लोक आहेतच. ते गुढीपाडव्याचा अर्थ त्यांच्या विकृत बुद्धीने विकृतच लावतात. महाराष्ट्रात बहुजन म्हणजे, ब्राह्मण सोडून इतर समाजाने हा सण साजरा करून नये, असे हलकट (हलकटच!) विधान ते करतात. त्यांचे म्हणणे, छत्रपती संभाजी महाराजांचे प्रभुत्व, शक्ती आणि ज्ञान याबद्दल भीती आणि मत्सर असलेल्या तत्कालीन ब्राह्मणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खून घडवून आणला. महाराजांच्या मृत्यूने ते आनंदी झाले आणि त्या आनंदाच्या प्रतिकासाठी त्यांनी गुढी उभारली. अर्थात, दुधामध्ये मिठाचा खडा कसा घालावा, हे यांच्याइतके कुणालाच जमत नाही म्हणा. पण, खर्या इतिहास संशोधकांनी पुराव्यानिशी हे धांदात खोटे विधान खोडून टाकले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत रामदास स्वामी या संतांच्या अभंगामध्ये गुढीचा उल्लेख आला आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील नोंदीमध्येही गुढीपाडव्याचा स्पष्ट उल्लेख आहे, हे त्यांनी सिद्ध केले. या गुढीबाबत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
अधर्माची अवधी तोडी। दोषांची लिहिली फाडी।
सज्जनांकरवी गुढी। सुखाची उभवी॥
याचा अर्थ- अधर्म दोष तोडा आणि सज्जनांकरवी सुखाची गुढी उभारा. संतश्रेष्ठीच्या या ओवीचा अर्थ आपण घेऊया की देशद्रोही, समाजविघातक, अधर्मींच्या दुष्ट विचारांचा कृतींचा आणि शक्तींचाही बिमोड करून सज्जनशक्तीने एकत्रित येत, देश-समाज सुरक्षिततेची, समृद्धीची आणि प्रगतीची गुढी उभारूया.
9594969638