पंढरपूर कॉरिडॉरचे काम तीन महिन्यात सुरु करणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
29-Mar-2025
Total Views |
पंढरपूर : पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्वांना विश्वासात घेऊन करणार असून पुढील तीन महिन्यांत जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, २९ मार्च रोजी केली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मागच्या काळात पंढरपूरमध्ये मंदिराचे काम सुरु केले असून अतिशय चांगल्या प्रकारे हे काम सुरु आहे. यातील जास्तीत जास्त काम आषाढीच्या आधी पूर्ण करू शकू, तर काही काम आषाढीनंतरही होईल. याव्यतिरिक्त कॉरिडॉरच्या कामाचाही आराखडा तयार केला आहे. यासाठी जमीन संपादन करावी लागेल. पण लोकांना कुठल्याही प्रकारे विस्थापित न करता त्यांना सरकारकडून योग्य मोबदला दिला जाईल. ज्यांची दुकाने आहेत त्यांना दुकाने देण्यात येईल. आतापर्यंत कुठल्याही प्रकल्पात मिळाला नाही असा चांगला मोबदला आम्ही देणार असून लोकांना विश्वासात घेऊन हे काम करणार आहोत."
"जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात एक चांगला आराखडा तयार केला आहे. लोकप्रतिनिधी आणि त्या भागातील लोकांशी या आराखड्यावर चर्चा करून आपण त्यांना काय देणार आहोत हे सांगा, अशा सूचना मी दिल्या आहेत. यामध्ये कुठेही लपवालपवी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरु करायचे आहे. पुढील तीन महिन्यांत जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असे नाही
रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "याबाबत सगळ्यांशी चर्चा करावी लागेल. शेवटी त्याकरिता होळकरांनी पैसे दिलेले आहेत. त्यामुळे तो असा कसा काढून टाकणार याबाबत मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष आहे. इतकी वर्षे झाली त्याठिकाणी वाघ्याच्या पुतळा किंवा समाधी आहे. त्यामुळे या प्रकरणात सगळ्यांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असे काही आहे का? त्यामुळे वाद करण्याचे काहीही कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात. इकडे धनगर समाज वेगळा आणि मराठा समाज वेगळा असे काही नाही. सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत. त्यामुळे याबाबतीत वाद करणे अयोग्य आहे. यावर बसून मार्ग काढला पाहिजे," असेही ते म्हणाले.
"संभाजीराजे यांना मी अनेकवेळा वेळ दिलेली आहे. पण त्यांना असे का वाटते माहिती नाही. मी दरवेळी त्यांना वेळ देतो. ते माझ्याशी फोनवरही बोलतात, मला येऊनही भेटतात. त्यामुळे वेळ न मिळण्याचे काहीही कारणच नाही," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.