पुणे : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले राज्यातील सर्व गडकोट किल्ले कायमचे अतिक्रमणमुक्त करण्याला प्रधान्य देण्यात येईल. तसेच गोसेवा करणाऱ्या गोरक्षकांना गरज लागेल तेव्हा संरक्षण दिले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार, दि. २९ मार्च रोजी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पुण्यातील वढू येथे आले असता ते बोलत होते.
'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजां'च्या बलिदान दिनानिमित्त त्यांनी महाराजांच्या समाधीवर फुले अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. तसेच तुळापूर येथील त्यांचा स्मारकाला आणि कवी कलश यांच्या समाधीचे देखील त्यांनी दर्शन घेऊन त्यांनाही विनम्र अभिवादन केले. यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजां'च्या नावे दिला जाणारा 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार' यंदा परमपूज्य रामगिरी महाराजांना शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी इतर पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना, शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले म्हणून आज हिंदू धर्म शाबूत आहे. आज त्याच कर्तव्यभावनेतून आपण सारे इथे त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत असे सांगितले. आजच्या शुभदिनी रामगिरी महाराजांना हा पुरस्कार मिळाल्याने हिंदू धर्मासाठी त्यांनी सुरू केलेल्या लढ्याला अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. मी मुख्यमंत्री असताना मी नाशिक येथील त्यांच्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा प्रचंड गदारोळ झाला होता. मात्र तेव्हाही राज्यात जोवर महायुती सरकार आहे तोपर्यंत साधू-संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही असे मी सांगितले होते त्याची आठवण शिंदे यांनी करून दिली. देशात गोमातेला 'राज्य माते'चा दर्जा देणारे पहिले राज्य आपले होते. गोसेवा करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय देखील महायुती सरकारनेच घेतला होता. यापुढे गोरक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी देखील दूर करून त्यानाही गरज पडेल तेव्हा संरक्षण दिले जाईल असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
याठिकाणी आज 'जय श्रीराम'च्या घोषणा देखील दिल्या गेल्या, मात्र देशात राम मंदिर बांधण्याचे स्वप्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. काही जण तेव्हा 'मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे' म्हणत त्यांची खिल्ली उडवली मात्र पंतप्रधानांनी तारीख जाहीर करून मंदिर उभारून दाखवले असेही यावेळी शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.