भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राची भूमिका बदलत आहे – आशिषकुमार चौहान

भांडवली बाजाराच्या बदलत्या भूमिकेचे विश्लेषण

    29-Mar-2025
Total Views |

 

mukund and ashish
 
 
 
मुंबई : भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राची भूमिका ही फक्त व्यवसायातून भांडवल निर्मिती एवढ्यावरच मर्यादित न राहता त्यात बदलत्या काळानुसार नवीन आयामांचाही समावेश होत आहे, असे प्रतिपादन करत एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी भारतातील कॉर्पोरेट जगतातील समाजाभिमुख बदलांना अधोरेखित केले. भारतातील नावाजलेली सनदी लेखापाल संस्था मुकुंद चितळे अँड कंपनीचा ५१ वा वर्धापनदिन नुकताच संपन्न झाला. या समारंभात भारत तसेच जागतिक पातळीवरील आव्हाने आणि संधी या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन केले होते. यात कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि भांडवल निर्मिती या विषयावर आशिषकुमार चौहान यांनी मार्गदर्शन केले.
 
भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताने समाजवादी विचारसरणीवर आधारित अर्थव्यवस्था स्वीकारली परंतु त्यातही भांडवली बाजारांना उत्तेजन देण्यात आले. भांडवली बाजाराने देशातील कानाकोपऱ्यातील जनतेला गुंतवणुकीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. १९९० च्या आर्थिक संकटानंतर भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. सुरुवातील याचा परिणाम म्हणून भांडवली बाजारांत मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक दिसायला लागली. तरी १९९२ सालच्या हर्षद मेहता घोटाळ्यानंतर या बाजाराला नियंत्रित करणाऱ्या सेबी या नियामक संस्थेचा जन्म झाला. त्यातून आता या संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण मिळत चालले आहे. असे आशिषकुमार चौहान यांनी भारतातील भांडवल निर्मितीच्या इतिहासाबद्दल सांगीतले.
 
बदलत्या काळात भांडवली बाजाराची भूमिका ही फक्त नफा – तोट्याचा व्यवहार करणारी संस्था न राहता गुंतवणुकीचे प्रशिक्षण देणारी संस्था अशी बनत चालली आहे. हे महत्वाचे आहे असे सांगत आशिषकुमार चौहान यांनी भांडवली बाजाराच्या बदलत्या भूमिकेचे विश्लेषण केले. या कार्यक्रमात मुंबई शहरातील मोठे उद्योगपती उपस्थित होते. मुकुंद चितळे अँड कंपनीशी तसेच मुकुंद चितळेंशी असलेल्या व्यक्तिगत नात्याच्याही आठवणी आशिषकुमार चौहान यांनी सांगितल्या.