मुंबई: ( 64 lakh farmers in the state will get insurance compensation of Rs 2555 crores ) राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकर्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट २ हजार, ५५५ कोटी विमा नुकसानभरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून २ हजार, ८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून, शेतकर्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत खरीप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ या हंगामांसाठी २.८७ कोटी, खरीप २०२३ साठी १८१ कोटी, रब्बी २०२३-२४ साठी ६३.१४ कोटी आणि खरीप २०२४ साठी २ हजार, ३०८ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकर्यांना वितरित होणार आहे. एकूण २ हजार, ५५५ कोटी रकमेचा लाभ राज्यातील 64 लाख लाभार्थी शेतकर्यांना मिळणार आहे.शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून, नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकर्यांच्या खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळेल, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.