मुंबई: ( nashik trimbakeshwar temple ) प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यानंतर २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने जोरदार तयारी सुरू केली असून, त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मंदिराच्या विकासाला चालना मिळेल आणि भाविकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होतील.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी तीर्थक्षेत्राची पाहणी करून प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर आता सरकारने त्र्यंबकेश्वर मंदिराला ‘अ’ दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी महिन्यात विभागीय आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. त्यास नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.
‘अ’ दर्जा मिळाल्याने मंदिराच्या विकास आराखड्याला गती मिळेल. भाविकांना चांगले रस्ते, स्वच्छता, पाणी आणि इतर सुविधा मिळतील. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी घेतलेला हा निर्णय नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला आणखी उजाळा देणारा ठरेल. या निर्णयाचे त्र्यंबकेश्वर देवस्थानने स्वागत केले आहे.
स्वागतार्ह निर्णय
त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग दर्जा मिळाल्यामुुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला संयुक्तरित्या काम करता येणार असून विकासकामे वेगाने होतील. भाविकांना प्राधान्य देत आणखी सुविधा वाढविता येतील. लवकरच अन्नछत्रदेखील सुरू करण्यात येणार असून ‘अ’ दर्जा मिळाल्यामुळे त्यात आणखी सुधारणा करणे शक्य होईल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने हा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे.
- स्वप्निल शेलार, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्र
मुख्यमंत्र्यांच्या दौर्यानंतर आठवडाभरात घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच आपल्या नाशिक दौर्यात 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेत विधिवत महापूजा केली. यानंतर कुशावर्त येथे पाहणी करत उपस्थित साधू, महंत यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना “कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी स्वतंत्र १ हजार, १०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशप्रमाणेच कुंभमेळ्यासाठी कायदा तयार करण्यात येणार आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर आता आठवडाभरातच त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचे मार्ग खुले झाले आहेत.