मूळ कोकणातील असलेल्या महिला वसुली अधिकारी उज्वला जाधव-अहिरे यांचा जन्म ठाण्यात झाला. आईवडील, लहान भाऊ व बहीण अशा पंचकोनी कुटुंबात त्यांचे बालपण तसे मजेत गेले. उज्वला यांचे वडील सखाराम अहिरे यांचे ठाण्यात छोटेखानी दुकान होते. दुकान सांभाळून त्यांनी उज्वला व त्यांच्या भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. उज्वला यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सावरकर नगर येथे, तर उच्चशिक्षण ठाणे पूर्वेकडील के. बी. गर्ल्स महाविद्यालयामध्ये झाले. शिक्षण सुरू असताना त्यांनी शेअर बाजारातदेखील काम केले. वाणिज्य शाखेतून पदवीधर झाल्यानंतर उज्वला यांनी, अकाऊंटस विषयात करिअर करण्याचे ठरवले. अनेक छोट्या-मोठ्या नोकर्या केल्यानंतर, त्यांना सहकार क्षेत्राची भुरळ पडली. सहकार क्षेत्राशी निगडित प्रथितयश संस्था असलेल्या ‘ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन’मध्ये 2016 साली त्या रुजू झाल्या. पहिल्या दोन वर्षांतच त्यांनी हाऊसिंग फेडरेशन आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजाची संपूर्ण माहिती घेऊन, आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवली. त्यामुळे संस्थेने उज्वला यांच्यावर, हाऊसिंग फेडरेशनच्या कामाच्या विविध जबाबदार्या सोपवल्या.
सहकार कायद्यातील उपविधी ‘कलम 101’चा अंतर्भाव हा मूलतः थकबाकी वसूल करण्यासाठी आहे. गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांकडील थकबाकी वसूल करणे शक्य व्हावे, म्हणून वसुली अधिकारी नेमले जातात. परंतु, थकबाकीदारांची वाढती संख्या लक्षात घेऊन सहकारी गृहनिर्माण संस्थानी नेमलेल्यांना, शासनाने ’विशेष वसुली अधिकारी’ असे पदनाम देऊन त्यांना थकबाकी वसूल करण्याचे अधिकार दिले. सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये सदस्यांकडून थकबाकी वसुलीचे काम करण्यासाठी, जिल्हा उपनिबंधकाकडून विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात आणि त्यानुसारच त्यांना वसुली प्रक्रिया पूर्ण करायची असते. वसुली व विक्री अधिकारी हे जिल्हा उपनिबंधक नेमतात. 2018 साली फेडरेशनच्या कर्मचारी असलेल्या उज्वला यांची, वसुली व विक्री अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. फेडरेशनच्या कार्यालयात काम करीत असताना, कार्यालयीन कामकाजासोबतच थकबाकीदाराला पाठवायच्या नोटिसीचे नमुने अथवा वसुली दाखला मिळविण्यासाठी लागणार्या दस्तऐवजांची माहिती आणि चौकशी शुल्काचे कोष्टक, लेखा-शीर्षक आदी सर्व काही त्यांना मुखोद्गत असल्याने, गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकार्यांना सखोल माहिती देतात. एक महिला असूनही गेली सहा-सात वर्षे त्यांनी, वसुली अधिकारी म्हणून आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
’फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय सीताराम राणे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली, म्हणून मी हे काम उत्तम प्रकारे करीत आहे” असे उज्ज्वला सांगतात. थकबाकीदार सदस्यांना नोटीस देऊन, त्यांच्याकडून थकबाकी वसूल करण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया असते. थकबाकी भरण्यात अयशस्वी झाल्यास कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाते. या पदावर काम करत असताना, थकबाकी वसुलीसाठी आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करताना कधी कधी कटु प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. डोंबिवली येथील एका सोसायटीमधील थकबाकीदारांची सदनिका रिकामी करून सील ठोकण्यासाठी गेले असता, त्यांनी आमच्यावर हल्ला केला. सुदैवानेच आम्ही बचावलो. तर अन्य एका घटनेत ठाण्यातील शिवाईनगर येथील ‘उज्वल सोसायटी’मधील थकबाकीदाराची सदनिका रिकामी करण्यासाठी तलाठी आणि पोलीस यांच्यासोबत गेले असता, संबंधित थकबाकीदाराने अचानक स्वतःवरच हल्ला करून स्वतःचे डोके फोडून घेतले होते. मोठा बाका प्रसंग ओढवला होता, पण डगमगले नाही की खचूनही गेले नाही. उलट अशा अनुभवातून खंबीरच झाले, असे काम करतनाचे विविध अनुभव उज्वला सांगतात.
शिक्षणामुळे आधुनिक काळात स्त्रियांची परिस्थिती सुधारत आहे. आज स्त्रिया घर-गृहस्थी संभाळून, समाजात सबला होऊन वावरत आहेत. काहीजणींनी तर थेट अंतराळापर्यंत आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. गेली 35 वर्षे ठाण्यात वास्तव्यास असलेल्या उज्वला यादेखील सासू-सासरे, पती, दोन कन्या, धाकटे दीर व नणंद अशा एकत्रित कुटुंबाचा गाडा हाकून, आपले वसुली अधिकारीचे जोखमीचे काम नेकीने बजावत आहेत. दैनंदिन कामासोबत वेळ मिळेल, तेव्हा वाचनाची आवडही त्या जोपासतात. विविध गृहनिर्माण सोसायट्यांमधील सदस्यांना माहिती देण्यासाठीही त्या मदत करतात. कुणालाही न दुखावता काम करणे, ही तर त्यांच्यातील विशेष खुबी आहे.
ठाणे जिल्ह्यातील अनेक सोसायट्यांमधील थकबाकीदारांची वसुली मनोज देवरे तसेच माधुरी मोरे या सहकार्यांच्या सोबतीने लवकरात लवकर करून दिल्यामुळे, तसेच रखडलेला कारभार मार्गी लावून दिल्याबद्दल सोसायट्यांनी आमचे वेळोवेळी कौतुक व सन्मान केला आहे. याशिवाय, हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम तसेच सामाजिक कार्यातदेखील आम्ही हिरिरीने भाग घेतो. भविष्यात यापेक्षा अधिक उत्तम काम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही उज्वला आवर्जून नमूद करतात.
आजकाल रोजगार उपलब्ध नसल्याची ओरड सर्वत्र केली जाते. परंतु, आपण केवळ शिक्षण घेऊन नाही, तर इतर कोणतेतरी कौशल्याचे काम शिकून घेणे गरजेचे आहे. किंबहुना, आपल्याला सर्व प्रकारच्या कामांची आवड असणे, फार महत्त्वाचे आहे. यश नक्कीच मिळेल, असा मित्रत्वाचा संदेश त्या युवा पिढीला देतात. अशा या महिला वसुली अधिकारीला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
9920963796