ठाकरे ब्रँड संपला! आम्हाला त्यांच्यावर...; मंत्री संजय शिरसाट यांचा घणाघात
28-Mar-2025
Total Views |
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे ब्रँड संपलेला आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि विचार जिवंत आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही, असा घणाघात मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. शुक्रवार, २८ मार्च रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "सत्तेत ज्यांच्यासोबत युती केली असते त्यांच्याबरोबर राहावे लागते. त्याच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे काही भले होत असल्यास ते करून घ्यावे लागले. तुम्ही ज्यांच्या सोबत राहायचे नाही त्यांच्यासोबत राहत आहात. शरद पवार आणि राहुल गांधींसोबत झालेला निकाह आता देशाने पाहिला आहे. हा निकाह तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तुमचा संसार करा. आम्ही आमच्या प्रेमाच्या माळा एकमेकांच्या गळ्यात घातल्या असून आमचा संसार चांगला सुरु आहे," असा टोला त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, "ठाकरे ब्रँड हा संपलेला आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि विचार जिवंत आहेत. उबाठा गट केव्हाच संपलेला आहे. आम्हाला त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असून शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि पुढे घेऊन जात आहोत. आमच्या या निर्धाराला कुणी आडवे आल्यास त्याला आडवे करण्याची आमच्यात ताकद आहे," असेही ते म्हणाले.