मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देशातील महत्वाची खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी काढलेल्या परिपत्रकात एचडीएफसी बँकेला केवायसी प्रक्रियेतील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एचडीएफसी बरोबर पंजाब अँड सिंध बँकेवरही अशीच कारवाई करत, ६८.२ लाखांचा दंड ठोठावला आहे. पंजाब अँड सिंध बँकेवरील कारवाई ही गुंतवणुकीचे तसेच बचत खात्यांचे अपेक्षित प्रमाण न राखल्याबद्दल झाली आहे. या दोन्ही कारवायांमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ माजली आहे.
भारतीय रिझर्व बँकेकडून एचडीएफसी बँकेत तपासणी करण्यात आली होती. त्यात ३१ मार्च २०२३ पर्यंत बँकेने केवायसी प्रक्रियेसंदर्भातील रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आले. याबाबत रिझर्व्ह बँकेकडून बँकेला एचडीएफसी बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्याला बँकेकडून मिळालेल्या उत्तरात तसेच रिझर्व्ह बँकेकडून तपासणीमध्ये समोर आलेल्या निष्कर्षांमध्ये विसंगती आढळून आली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून एचडीएफसी बँकेवर कारवाई करण्यात आली.
या विसंगतींमध्ये प्रामुख्याने एचडीएफसी बँकेकडून खातेदारांचे त्यांच्या जोखीमेनुसार वर्गीकरण केले नव्हते. त्याच बरोबर बँकेने ग्राहकांना युनिक आयडेंटीफिकेशन क्रमांक न देता, अनेक आयडेंटीफिकेशन क्रमांक जाहीर केले असल्याचेही आढळून आले होते. यासर्व बाबी रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या विरुध्द होत्या म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
पंजाब अँड सिंध बँकेवरील कारवाई ही प्रामुख्याने बँकेतील ठेवींच्या तुलनेत गुंतवणुकदार तसेच ठेवीदार ग्राहकांची माहिती योग्य त्याप्रमाणात न राखल्याने तसेच बँकेतील बचत खात्यांचे अपेक्षित प्रमाण न राखल्याने बँकेवर ही कारवाई भारतीय रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आली आहे. या कारवायांमुळे बँकिंग क्षेत्रात रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या पालना बद्दलची जागरुकता वाढेल असे सांगितले जात आहे.