मुंबई: जर दिशा सालियानच्या आईवडीलांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे तर आदित्य ठाकरेंचीदेखील नार्कोटेस्ट व्हायला हवी. त्यानंतर दुध का दुध पानी का पानी होईल, अशी मागणी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
रामदास कदम म्हणाले की, "मुलाला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्यात आले का हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणे गरजेचे आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. हे प्रकरण सीबीआयकडे दिले पाहिजे. या प्रकरणात कुणी हस्तक्षेप केला का? कुणी रिपोर्ट बदण्याचे काम केले का? आमच्या माजी महापौर दिशा सालियानच्या वडीलांकडे का जात होत्या? हे प्रकरण बॅलेन्स करण्याचा प्लॅन होता का? या सगळ्या बाबी समोर येणे अत्यंत आवश्यक आहे. जर दिशा सालियानच्या आईवडीलांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे तर आदित्य ठाकरेंचीदेखील नार्कोटेस्ट व्हायला हवी. त्यानंतर दुध का दुध पानी का पानी होईल," अशी मागणी त्यांनी केली.
हे वाचलंत का? - लाडक्या बहिणींनी २१०० रुपये कधी? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती
'त्या' नेत्यांना उद्धवस्त करण्याची ठाकरेंनी सुपारी घेतली!
"शिवसेना प्रमुखांसोबत जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना राजकारणातून आणि आयुष्यातून कायमचे उध्वस्त करण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तेच उद्धव आता उध्वस्त होणार आहेत. लाखों लोकांमध्ये शिवाजी पार्कच्या सभेतून मनोहर जोशी यांना अपमानित करून व्यासपीठावरून हाकलून लावले. मनोहर जोशी यांचे शिवसेना मोठी करण्यात योगदान नव्हते का?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हमाले की, "माझीदेखील आमदारकी काढली आपल्या मुलाच्या मतदारसंघात दिली. माझे मंत्रीपद आदित्यला देऊन मला घरी बसवले. गजानन कीर्तीकर मंत्रालयात भेटालया गेले असता उद्धव ठाकरेंनी दोन तास त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यांनी शरमेने मान खाली घातली आणि निघून आले. शिवसेनाप्रमुखांसोबत असलेल्या नेत्यांना संपवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. एकनाथ शिंदेंना अपमानित केल्याने ते बाजूला निघून गेले. या पापाची फळे त्यांना भोगावीच लागतील. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना आहे. काँग्रेससोबत जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना काळीमा फासण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. त्यामुळे आता राजकारणासाठी शिवसेनाप्रमुखांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही," अशी टीकाही रामदास कदम यांनी केली.