केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची तत्परता! अपघाग्रस्त पुणेकराला तातडीने मिळाले उपचार
28-Mar-2025
Total Views |
पुणे : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त पुणेकराला तातडीने पोर्ट ब्लेअरहून पुण्यात आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सर्व यंत्रणा युद्धपातळीवर राबवत त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. मंत्री मोहोळ यांनी ग्रीन कॉरिडॉर करण्याच्या सूचना दिल्याने एअर एम्बुलन्सने अवघ्या १३ मिनिटांत पुणे विमानतळ ते पूना हॉस्पिटलचे अंतर कापले.
सिंहगड रोड येथील लोहपात्रे कुटुंबीय पती, पत्नी, मुलगा असे सहपरिवार अंदमान निकोबार/ पोर्ट ब्लेअर येथे फिरायला गेले होते. दरम्यान, दिनांक २६ मार्च रोजी संध्याकाळी शोभना मंगेश लोहपात्रे यांचा एका छोट्या बेटावर जबरदस्त अपघात झाला. त्यांच्या दुचाकीला एका भरधाव वाहनाने उडवले. प्रसंगी त्या छोट्या बेटावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने रात्री २ वाजता त्यांना उपचारासाठी एअरफोर्सच्या मदतीने अंदमान, पोर्ट ब्लेयर येथे आणण्यात आले. रुग्णाच्या डोक्याला मोठा मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला.
त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने एक एअर अॅम्बुलन्स उपलब्ध झाली आणि ९ वाजता ती पुणे विमानतळावर पोहोचली. त्यानंतर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना ग्रीन कॉरिडॉर करण्याच्या सूचना दिल्याने अवघ्या १३ मिनिटांत अॅम्बुलन्सने पुणे विमानतळ ते पूना हॉस्पिटलचे अंतर कापले. मंत्री मोहोळ यांच्या तत्परतेमुळे लोहपात्रे कुटुंब सुखरुप आपल्या घरी परतले.