मुंबई: ( Jindal Stainless invest Rs 42,886 crore in Maharashtra ) “जिंदाल स्टेनलेस लिमिटेड’ महाराष्ट्रात 42 हजार, 886 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प उभारणार आहेत. यातून सुमारे 15 हजार, 500 रोजगारसंधी उपलब्ध होणार असल्याने, या प्रकल्पाचे महाराष्ट्रात स्वागत आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘जिंदाल स्टेनलेस लिमिटेड’चे अध्यक्ष रतन जिंदाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवार, दि. 27 मार्च रोजी ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत जिंदाल यांनी या प्रकल्पाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर केला. “या प्रकल्पाची उत्पादन क्षमता वार्षिक चार दशलक्ष टन इतकी असणार आहे. या उद्योग समूहाने आणि जिंदाल यांनी महाराष्ट्राच्या क्षमतेवर दाखविलेला विश्वास महत्त्वाचा आहे.
त्यामुळे या प्रकल्पाकरिता सर्वतोपरि सहकार्य केले जाईल,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत नमूद केले. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन आणि ‘जिंदाल समूहा’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.