ठाणे : ठाणे पूर्व येथील नावाजलेली व अल्पावधीत आत्यंतिक लोकप्रिय ठरलेली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी ठीक ६.३० वाजता नालंदा शाळा व कोपरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून निघेल व पुढे ठाणेकर वाडी चौक, शिवमंदिर, प्रेम नगर, दौलत नगर, टीजेएसबी बँक, मंगला शाळा, राऊत शाळा, स्वर्गीय नारायणराव कोळी चौक ते नातू परांजपे कॉलनीतील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे विसर्जित होईल.
सदरहू यात्रेला स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभेल व मोठ्या संख्येने लहान थोर नागरिक पारंपारिक वेशभूषेमध्ये सहभागी होतील असा विश्वास आयोजक श्री मिलिंद भाटे यांनी या निमित्ताने व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त औचित्य साधून त्यांच्या जीवनावरील आधारित चित्र प्रदर्शन . : : . हे यावेळच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरेल अशी माहिती आयोजक श्री.भाटे यांनी दिली.
या स्वागत यात्रेसंबंधी अधिक माहिती देण्यासाठी श्री भाटे पुढे म्हणाले की या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ठाण्यातील प्रसिद्ध संजय गुरव ढोल ताशा पथक यामध्ये सहभागी होणार आहे तसेच लेझीम ,दंड, योग आदींची विविध प्रात्यक्षि के यात्रेदरम्यान सादर केली जातील.
ठाणे पूर्व च्या एकतेचे प्रतीक म्हणून निघणाऱ्या या यात्रेमध्ये ठाणे पूर्व येथील विविध समाज घटकांच्या उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगेबाबा छत्रपती शाहू महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर हेडगेवार संत रविदास संत सेवालाल संत आनंद भारती वाल्मिकी ऋषी सरदार आदी श्रद्धेय थोर पुरुषांचे विविध कट आउट या यात्रेदरम्यान प्रदर्शित केले जाणार आहेत.
सदर यात्रेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रचंड पाठिंबा मिळत असून ठीक ठिकाणी यात्रेदरम्यान यात्रेतील सहभागी नागरिकांच्या व अल्पोपहाराची सोय करण्यात आलेली आहे. या यात्रेदरम्यान नाना पालकर स्मृती संस्थेच्या वतीने ठाणे पूर्व भागात नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरचे अनेक डॉक्टर्स सहभागी होणार असून या उपक्रमाची माहिती ते यानिमित्ताने ठाणे पूर्व च्या नागरिकांना देण्याचा प्रयत्न करतील.
परंपरेनुसार पारंपारिक मंगल वेशात सहभागी होणाऱ्या ठाणे पूर्व येथील नागरिकांसाठी फोटोग्राफिक संस्था व स्वागत यात्रा समितीने एक सेल्फी स्पर्धा तसेच वेशभूषा स्पर्धा या स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी आयोजित केलेली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे. यासाठी विविध आकर्षक बक्षिसे आयोजित देखील केली आहेत.
ठाणे शहरात यावर्षी विविध स्वागतयात्रा निघणार असल्या तरी ठाणे पूर्व येथील अभिनव स्वागत यात्रा यावर्षीचे ठाणे शहरातील एक प्रमुख आकर्षण ठरेल असा विश्वास आयोजक मिलिंद भाटे यांनी यावेळी व्यक्त केला.