रियाधचे हरित भविष्य

Total Views |

ग्रीन रियाध प्रकल्प
जगातील सर्वांत महत्त्वाकांक्षी शहरी वनीकरण प्रकल्पांपैकी एक म्हणजे ‘ग्रीन रियाध प्रकल्प.’ दि. 19 मार्च 2019 रोजी सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ यांनी रियाधच्या चार मेगा प्रोजेक्ट्सपैकी एकाचे अनावरण केले. या प्रकल्पासह रियाधला जगभरातील ‘टॉप 100’ राहण्यायोग्य शहरांच्या यादीत नेणे, हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट. तसेच शहरातील हिरवळीचे प्रमाण वाढवणे, तापमान कमी करणे आणि रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा करणे, ही देखील अन्य उद्दिष्टे. हा हरितीकरण उपक्रम विशेषतः शहरातील कार्बन उत्सर्जन आणि तापमान कमी करेल. याव्यतिरिक्त, हा प्रकल्प रियाधच्या नागरिकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करेल, जो देशाच्या ’व्हिजन 2030’चा भाग आहे.
 
पुढील दहा वर्षांसाठी प्रकल्पाचे नियोजन करत ‘एगिस’ या कंपनीने प्रकल्प आराखडा तयार केला. एक सुपर टूल या विशाल हरित कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते, ज्यामध्ये मातीच्या गुणवत्तेच्या अभ्यासापासून ते पाण्याच्या उपलब्धतेपर्यंत, जंगलाच्या प्रकारांची व्याख्या करण्यापर्यंत शेकडो प्रकल्पांचा समावेश आहे.
 
जगातील सर्वांत मोठ्या शहरी हरित प्रकल्पांपैकी एक म्हणून, सौदीच्या राजधानीतील ग्रीन रियाध हिरव्यागार जागांच्या विविधतेमध्ये भर टाकत आहे. रस्त्यांच्या कडेला, बागांमध्ये, उद्यानांमध्ये (शहरी आणि नैसर्गिक), धार्मिक स्थळांवर, शाळा आणि विद्यापीठांमध्ये, सार्वजनिक इमारतींभोवती, आरोग्य सुविधांमध्ये, पार्किंग क्षेत्रात एक कोटींहून अधिक वृक्षलागवड करण्यात आली आहे. रियाध शहराच्या रॉयल कमिशन आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या निगराणीत शुष्क हवामानाला तोंड देऊ शकणार्‍या वृक्ष प्रजाती (प्रामुख्याने बाभूळ झाडे) निवडण्यास ‘एजिस’ने मदत केली. त्यासाठी वृक्ष रोपवाटिकादेखील स्थापन केल्या आहेत. वनस्पतींचे आच्छादन आणि सावली, देखभालीची सोय, पाण्याचा वापर आणि सुशोभीकरण यांमध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमता प्राप्त करणे, हे उद्दिष्ट आहे.
‘ग्रीन रियाध प्रोग्राम’मध्ये विविध पार्क यांसह शहरातील मोठी उद्याने आहेत. ही उद्याने या कार्यक्रमाचे प्रमुख घटक आहेत, जी शहराच्या ‘ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर’ला उभारी देतात. शहरातील सर्वांत मोठ्या उद्यानांपैकी एक असलेले अल-उरुबा पार्क 7 लाख, 54 हजार चौ. मीटर क्षेत्रफळाचे आहे आणि ते प्रिन्स तुर्की बिन अब्दुलअझीझ अल-अव्वल रोड आणि अल-उरुबा रोडच्या चौकात मोक्याच्या ठिकाणी स्थित आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांतील रहिवाशांना सहज प्रवेश मिळतो.
 
उद्यानाच्या 65 टक्के क्षेत्रफळ व्यापून सहा लाखांहून अधिक झाडे आणि झुडुपे लावली जातील. याव्यतिरिक्त, सुरुवातीच्या डिझाईन टप्प्यात कायमस्वरूपी जलकुंभांचा विकास केला जाईल. ज्यामध्ये या उद्यानात 14 किमी लांबीचा पादचारी मार्ग अल लेसन व्हॅली पार्कमधून जातो. ग्रीन टेरेस, मोकळ्या जागा आणि कार्यक्रम आणि उत्सवांसाठी थिएटरदेखील आहेत.
 
या प्रकल्पासाठी वापरात येणारे सर्व पाणी (दररोज सिंचनासाठी वापरले जाणारे एक दशलक्ष घनमीटर पाणी) हे पुनर्वापर केलेले पाणी आहे. या प्रकल्पात सांडपाण्याचा वेळेवर आणि नियंत्रित पुनर्वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, जेणेकरून नवीन तयार झालेल्या ‘ग्रीन झोन’ला राखण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पाणी उपलब्ध होईल. या उपक्रमामुळे 2030 पर्यंत शहराचे वनस्पती आच्छादन 1.5 टक्क्यांवरून 9.1 टक्क्यांपर्यंत वाढेल, जे अंदाजे 541 चौ. किमी इतके आहे. त्यामुळे ‘ग्रीन स्पेस’चे प्रमाण प्रतिव्यक्ती 28 चौ. मीटर (सध्याच्या 1.7 चौ. मीटर)च्या उल्लेखनीय आकड्यावर पोहोचेल, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या नऊ चौ. मीटर प्रतिव्यक्ती शिफारसीपेक्षा खूपच जास्त आहे.
 
‘ग्रीन रियाध’सह चार विकास प्रकल्पांवर आधारित हा कार्यक्रम रियाधला जगातील राहण्यासाठी सर्वांत आल्हाददायक शहरांपैकी एक बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतो. ’सौदी व्हिजन 2030’ उपक्रमाच्या चौकटीत तयार केलेला हा प्रकल्प जीवन गुणवत्ता कार्यक्रमाशी सुसंगत आहेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशीदेखील सुसंगत आहेत. याआधारे देशात अधिक शाश्वत शहरे तयार होतील. याचसोबत, जागतिक तापमानवाढीचा सामना करण्यासाठी शहरी उपाययोजनांचा नवा राजमार्ग निश्चित करतील.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.